अडला हरी, गाढवाचे पाय धरी | Marathi Katha | Marathi Story

दुष्ट धनगर
एका गावात एक अतिशय भडक व तापट डोक्याचा धनगर रहात होता. एकदा हा धनगर त्याच्या मेंढीच्या अंगावरील सर्वच्या सर्व लोकर कातरून घेत होता, म्हणून ती बिचारी मेंढी त्या धनगराला विनवणी करून म्हणाली, “धनी, हे थंडीचे दिवस आहेत. या थंडीत मला थोडीशी तरी ऊब मिळावी यासाठी तुम्ही माझ्या अंगावरची सर्व लोकर न काढता, तिचा थोडासा तरी थर माझ्या कातडीवर राहू द्या.”

मेढींचे ते बोलणे ऐकून तो तापट असलेला धनगर अजूनच चिडला व तिला म्हणाला, “मला अक्कल शिकवतेस काय? थांब आता मी देखील तुझ्या लक्षात राहील असा धडा तुला शिकवतो.”

असे म्हणत त्या धनगराने त्या मेंढीचे एक अतिशय कोवळ व लहान असलेले कोकरू दगडावर आपटून ठार मारले. आपल्या कोकराला विनाकारण मारलेले बघून ती मेंढी दुःखाने अजूनच बेभान झाली व धनगराला म्हणाली, “धनी, तुम्ही किती क्रूर आहात! माझ्यावरील राग तुम्ही माझ्या निरपराध असलेल्या लेकरावर काढलात?”

मेंढीचे ते बोलणे ऐकून तो उलटया काळजाचा धनगर तिला म्हणाला, “मी बघतो आहे की, मी दिलेल्या धडयापासून तू काहीच बोध घेतलेला दिसत नाही; तेव्हा आता तुझे तोंड कायमचे बंद करण्यासाठी, तुझ्यासमोर तुझे दुसरे कोकरूही आपटून मारले नाही, तर मी नावाचा धोंडू नाही.”

धनगराने ती दिलेली क्रूर अशी धमकी ऐकून ती मेंढी आधीच आपल्या लेकराच्या विरहाने दुःखी झालेली होती. तेव्हा ती स्वतःशीच म्हणाली, ‘हा क्रूर असलेला तापट डोक्याचा धनगर बोलल्याप्रमाणे वागल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आपल्या दुसऱ्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी आपल्याला ‘अडला हरी, गाढवाचे पाय धरी’ या म्हणीप्रमाणेच वागले पाहिजे.’

मनाशी असा निश्चय करून ती दुबळी असलेली मेंढी त्या धनगरापुढे आपले मस्तक वाकवून, अतिशय गयावया करीत त्याला म्हणाली, “धनी, खरेच, मीच महामुर्ख असून, आपल्यासारखे चांगले आपणच आहात. तेव्हा खरोखरच मला क्षमा करा व माझ्या दुसऱ्या लेकराला कृपा करून जीवदान द्या.”

मेंढीला आता आपली थोर योग्यता कळून आली आहे असा गैरसमज झाल्याने, त्या धनगराने तिचे ते दुसरे कोकरू मारण्याचे रद्द केले आणि मेंढीचा हेतू साध्य झाला.

हे देखील वाचा

प्रसिद्ध मराठी म्हणी

Leave a Comment