हस्तिनापुरात पांडवांचे आगमन| Hastinapurat padvache aagmna Marathi Katha | Marathi Story

हस्तिनापुरात पांडवांचे आगमन| Hastinapurat padvache aagmna Marathi Katha

हस्तिनापुरात पांडवांचे पर्दापण होत आहे, ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.

हस्तिनापुर मध्ये चर्चा चालू होती की, “पांडव हे कौरवेश्वर पंडू राजाचे पुत्र आहेत. ते सगळेजण अतिशय चांगले आहेत. त्यांच्यातील मोठा युधिष्ठिर हा आपला राजा होणार आहे. आता आपण त्यांच्या स्वागताची तयारी करू या.”
असे म्हणत सर्व लोकांनी रस्त्यावर कमानी उभारल्या, रस्ते सजवले, रांगोळया काढल्या. ते सर्वजण येताच नगारे वाजवले. तुताऱ्या फुंकल्या गेल्या. त्यांच्यावर त्यांनी फुलांचा व लाहयांचा वर्षाव केला. काही स्त्रियांनी त्या राजपुत्रांना ओवाळले. अशा रीतीने सर्व लोकांनी त्यांचे अतिशय उत्तम प्रकारे स्वागत केले.

त्या लोकांमधील एक म्हातारी त्या मुलांना पाहून म्हणाली, “ही मुले किती छान आहेत जशी ती कमळाची फुलेच जणू!”

त्यावर दुसरी म्हणाली, “खरोखरेच हे शूर असून पंडूचे पुत्र शोभत आहेत.”

तेवढयात तेथे त्यांच्या आईचे म्हणजे कुंतीचे आगमन झाले. तेव्हा तिसरी म्हणाली, “ती बघा, यांची आई कुंती देखील आली.

कुंतीला बघून एक म्हातारी तिला म्हणाली, “तुझ्या पतीचा मृत्यू झाला असे समजल्यावर आम्हाला फार वाईट वाटले. पण तू येथे आलीस, हे फार बरे केलेस. कारण आता त्यामुळे आम्ही सुखी होऊ.”

तेव्हा कुंतीने तिला विचारले – “बाई, तुम्हाला काही दुःख आहे का?”

त्यावर ती बाई हळू आवाजात कुंतीला म्हणाली, “महाराणी कुंती, आता मी तुम्हाला कसे सांगू, तुमचे दीर आंधळे आहेत, आणि त्यातून ते त्यांच्या मुलाच्या सांगण्याप्रमाणेच वागतात. त्यांचा मुलगा स्वभावाने अतिशय अहंकारी व स्वार्थी आहे. आणि त्यांच्या ताब्यात आम्ही सापडलो आहोत.”

पंडुपुत्र पुढे चालत होते. त्यांच्याच मागे कुंती होती व त्यामागे ऋषिमुनी चालले होते. मागून हस्तिनापूरचे असंख्य नागरिक येत होते. सर्वजण ओरडून घोषणा देत होते, “महाराणी कुंतीदेवी आणि पंडुपुत्रांचे स्वागत असो. कौरवेश्वर युधिष्ठिराचा विजय असो!”

या सर्वांची मिरवणूक धृतराष्ट्राच्या महालाजवळ आली. त्यांचा आवाज ऐकून धृतराष्ट्र व गांधारी हे दोघेही बाहेर आले. गांधारीच्या डोळयावर पट्टी बांधलेली होती. त्यांनी ऋषिमुनींचे, कुंतीचे व पंडुपुत्रांचे सर्वांचे स्वागत केले.
त्यांच्याकडे बघून कुंती व तिच्या पुत्रांनी त्यांना प्रणाम केला.

कुंतीला गांधारीने जवळ घेऊन आपल्या हृदयाशी धरले. तेव्हा त्या दोघींच्याही डोळयातून अश्रू वाहत होते.

नंतर ऋषिंमधील सगळयात मोठे जे ऋषि होते ते धृतराष्ट्राला म्हणाले, “हे धृतराष्ट्रा, हे पांडव पुत्र अतिशय सज्जन व चांगले असून ते आम्ही तुझ्या स्वाधीन करत आहोत. पंडू आणि विदुर हे दोघे तुझे भाऊ. त्या सर्वांमध्ये तू मोठा आहेस, परंतु तू अंध असल्यामुळे पंडु हा गादीवर बसला. पंडु राजाने मात्र मोठे मोठे पराक्रम करून अनेक देश-विदेश जिंकले. सगळीकडे नाव कमावले व कीर्ती मिळविली. जसे तुमचे थोर पूर्वज कुरू, भरत, नहुष यांनी मोठे नाव कमावले तसेच पंडुने देखील कमावले. पंडुला वनात राहण्याची इच्छा झाल्यामुळे तो कुंती व माद्री या त्याच्या दोन बायकांना घेऊन हिमालयात आमच्या आश्रमाजवळ येऊन राहू लागला.

तेथे त्याला कुंतीपासून युधिष्ठिर, भीम व अर्जुन; व माद्रीपासून नकुल व सहदेव ही मुले झाली. त्यातील युधिष्ठिर हा बारा वर्षाचा असून अत्यंत शांत व विचारी आहे. दुसरा भीम हा अकरा वर्षाचा असून तो बलवान आहे. तसेच अर्जुन हा दहा वर्षाचा असून तो धनुर्विद्या, गायन आणि नृत्य जाणतो. आणि नकुल व सहदेव हे जुळे भाऊ असून ते नऊ वर्षाचे आहेत. ते दोघे तलवार अतिशय चांगल्या पध्दतीने चालवतात. त्या दोघांचे वैशिष्ट म्हणजे त्या दोघांना पशुवैद्यक आणि वनस्पतीचे विशेष असे ज्ञान आहे.

परंतु एक महिन्यापूर्वी पंडू राजा अचानक मृत्यू पावला. त्याबरोबर माद्री सती गेली. त्यामुळे आता कुंती व पाच पंडुपुत्रांना आम्ही तुमच्या स्वाधीन करत आहोत. तरी तुम्ही त्यांना नीट सांभाळा. आता आम्ही निघतो.”

एवढे सांगून ते सर्वजण तेथून निघून गेले.

Leave a Comment