बाधा | Badha Marathi Katha | Marathi Story

Badha Marathi Katha: “कोल्हापूर शहराला लागुनच असलेले एक छोटेसे गाव. पूर्वी जेमतेम पन्नास साठ घरे असलेले हे गाव काळानुसार पूर्ण बदललेले. शहराजवळ असल्याने जमिनीला चांगला भाव आला. हळू हळू छोटे मोठे कारखाने, भट्ट्या आणि इतर व्यापारही या गावात जम बसवू लागली. मग ओघाने लोकसंख्याही वाढली, घरांची संख्या वाढली. लोकांना रोजगार मिळू लागला. एक सधन गावांपैकी एक अशे ते गाव नावाजले जाऊ लागले.

तर हे झाल गावाबद्दल, आता वळुया मुख्य गोष्टीकडे. गावात तश्या दोन शाळा होत्या, पण शिकवण्या हव्या तश्या चालू झाल्या नव्हत्या. आठवी पर्यंतच्या एक दोन घरगुती शिकवण्या सोडल्या तर गावात इतर शिकवण्या सुरु झाल्या नव्हत्या, त्यामुळे काही मुले कोल्हापुरातील ट्युशन क्लासेस मध्ये जाऊ लागलीत. नववी नाहीतर निदान दहावीत तरी क्लासेस ला जावे म्हणून गावातील मुलांची कोल्हापूरला पीटाळणी होऊ लागली.

दहावीचे वर्ग सकाळी सात वाजता भरत असत. दुपारी बारा वाजेपर्यंत शाळा सुटल्यावर मुले दुपारी एक वाजता परत ट्युशन क्लास साठी कोल्हापूरला जात असत.

गणेश, अजय, समीर आणि प्रशांत हे चौघे अगदी पक्के मित्र. लहानपणापासून एकत्र खेळलेले, वाढलेले. नववी पूर्ण केल्यावर चौघांनीही एकत्रच कोल्हापूरच्या साठे क्लासेसला जाण्यास सुरु केले. दहावीचे वर्ष सुरु झाले होते. गणेश, अजय, समीर आणि प्रशांत चौघेही अभ्यासात हुशार आणि चुणचुणीत, थोडा अवखळपणाहि होता.

दिवस अगदी सामान्य चालले होते. दहावीचे वर्ष सुरु होऊन दोन महिने उलटले होते. सकाळी शाळेत जाणे दुपारी दोन तास क्लास आणि मग साडेतीन पर्यंत घरी येणे असा चौघांचाही दिनक्रम चालू होता. गावातून कोल्हापूरला जायला एस.टी बस मिळत असे. गावातील मुले क्लासला जाण्यासाठी एस.टी बस पकडून कोल्हापूरला जात, गावापासून दोन किलोमीटर एस.टी ने गेल्यावर एक अरुंद पूल लागत असे, नदीवरून जाणारा. तो पूल ओलांडून पलीकडे गेल्यावर सरळ पुढच्या थांब्याला गाडी थांबली कि समोरच साठे क्लास होता.

तिमाहीची परीक्षा सुरु झाली होती. एक एक करून सर्व परीक्षा पार पडल्या. परीक्षा संपल्यावर क्लासला यावे असे सांगण्यात आले होते. त्या दिवशी शेवटचा पेपर संपवून मुले क्लासला दुपारी एक वाजता गेली. क्लास मध्ये मास्तरांनी सर्व मुलांच्या परीक्षेचा आढावा घेतला, पुढील तयारी आणि वेळापत्रक सांगितले आणि साधारण अडीजच्या सुमारास मुलांना घरी जाण्यास सोडले.

गणेश, अजय, समीर, प्रशांत आणि गावातील इतर मुल मुली बस थांब्यावर येऊन थांबले. बस येण्यास थोडा अवकाश होता.

“एवढ्यात घरी जायला नग, चला नदीवर जरा फिरून जाऊ मग”, गणेश.

“नदिव… नग रे गण्या, पाऊस बिउस पडला म्हंजी पुस्तक भिजत्यात”, अजय.

“आज काय पाऊस पडत न्हाय लेका, चांगल ऊन पडलंय”, समीरने गणेशला दुजोरा देत नदीवर जाण्यास संमती दर्शविली.

“तू काय म्हणतोस परश्या…”, गणेशने प्रशांतला विचारले.

प्रशांत गप्प उभा होता. थोडा अस्वस्थ झाल्यासारखा वाटला. “न… नदिव न्हाय बा म्या आता, आणि तुमीबी जाऊ नगा ह्या येळेला”, प्रशांतचा थोडा घाबरलेला स्वर.

सर्व एकमेकांकडे बघू लागले. “का रे परश्या एवढा काय घाबरतुयास मुलीवाणी”, समीर.
“छ्या… घाबरत न्हाय ल्येका… पण दुपारच तीन वाजत आल्याती, आणि म्हणतात दुपारी तीन नंतर पुलाच्या नदीकड जाऊ नये”, प्रशांत.

“काय ते सरळ सांग कि गड्या”, गणेश.

“आर… नदी कडला एका बाजूला स्मशान हाय, दुपारी तीन नंतर कायतरी असतंय तिथ, लागीरतंय म्हण”, प्रशांत.

सर्वजण एकमेकांकडे बघू लागली. कोणी काहीच बोलले नाही, आणि गणेश जोरजोरात खो खो करीत हसू लागला. त्याला हसताना बघून सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटले.

“आर ल्येका कोणत्या जगात रहातुयास, आता भूता बितास्नी जागा न्हाय या जगात, आर इथ मानसास्नी ऱ्हायला जागा न्हाय आणि भूत…”, असा म्हणत गणेश आणखीनच हसू लागला.

झाल तर मग, चौघेही बस थांब्यावरून निघाले, हळू हळू चालत पुलापाशी आले. पुलापासून उजव्या बाजूने नदीवर जाण्यास रस्ता होता. रस्ता ओलांडून चौघेही उजवीकडच्या रस्त्यावर आले. समोरच खालच्या बाजूला एक मंदिर होते. मंदिरात उतरून जाण्यास पायऱ्या होत्या. चौघेही पायऱ्या उतरून मंदिरात गेले. थोडा वेळ गेल्यावर पुन्हा वरती आले आणि समोरील रस्त्यावरून पुढे चालू लागले.
वातावरण तसे आल्हाददायक होते. हवेत गारवा पसरला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच उंच झाड होती आणि त्यांची घनदाट सावली रस्त्यावर पसरली होती. चौघांच्या हातात बारीक काटक्या होत्या. रस्त्यावरून त्या घासत आपटत ते पुढे पुढे चालले होते. रस्त्याच्या डाव्या बाजूला कठडे बांधले होते. काही मुले, माणसे तेथे बसली होती. थोड पुढे गेल्यावर नजरेस पडली ती स्मशान भूमी. स्मशान भूमीच्या बाजूच्या मोकळ्या जागेत लाकडाचे मोठ मोठे ओंडके रचून ठेवले होते.

“परश्या हीच काय तुझ्या भुताची समशान भूमी”, गणेश फिदीफिदी हसला.

“गप रे ल्येका, चला पुढ नदीकड जाऊ”, असे म्हणत प्रशांतने गणेशला पुढ ढकललं.

पुढेच डाव्याबाजुने खाली जाण्यास जागा होती. मोठ मोठ्या पायऱ्या खाली उतरून नदीकडे जात होत्या. चौघेही खाली उतरले. नदीपाशी आले आणि एका कठड्यावर बसले. तसे चौघांनाही पोहायला येत होते. पण आता पाण्यात उतरण्याची हिम्मत नव्हती, पाऊस चांगला पडून गेला होता, आणि नदीलाही भरपूर पाणी लागल होत. खळखळ करीत वाहणाऱ्या पाण्याला खोल हि चांगलाच होता, तसेच नदीत घडलेले काही विचित्र अपघातहि सर्वांना ज्ञात होते.

काही वेळ नदीच्या पाण्यात काठावरच चौघेही पाय सोडून बसले. एकमेकांवर पाणी उडवत दंगा मस्ती करण्यात बराच वेळ निघून गेला. दुपारचे आता साडेतीन वाजले होते, पावसाच्या हलक्या सरीही पडून गेल्या होत्या. चौघेही तेथून उठले. हात पाय थोडे कोरडे करून पाच मिनिटांनी तेथून निघाले. पायऱ्या चढून वरच्या बाजूला रस्त्यावर आले. समोर विस्तीर्ण असा परिसर होता, स्मशानपासून थोड्या अंतरावर. मोठ मोठी झाड होती. छोटी मोठी झुडूप आणि रान फुले उगवली होती. चौघांनाही त्या समोरील परिसरात फिरण्याचा मोह आवरला नाही. धावतच सगळे एकामागोमाग एक करीत तेथे गेले.

परिसर फारच शांत होता. हवा कुंद आणि गार होती. पावसाने ओलसर झालेल्या मातीचा एक हवाहवासा सुगंध पसरला होता. निरनिराळ्या रंगाची फुले आणि तितकीच किंबहुना अधिक आकर्षक अशी फुलपाखरे इकडून तिकडे उडत होती.

चौघेही इकडून तिकडे बागडत होती. फुलपाखरांमागे पळत होती. परिसर मोठा असला तरी एका नजरेत भरत होता, त्यामुळे कोणी हरवण्याची शक्यता कमीच. तेथेच एक जांभळाचे झाड होते. प्रशांत आणि समीर जांभळ पाडत होती. गणेश आणि अजय हातात बारीक काठी घेऊन उगाच काहीतरी झुडुपात शोधत होती.

असाच काही वेळ निघून गेला…

गणेश चालत होता, एका झाडाखालून जाताना खट असा आवाज आला. पायाखाली काहीतरी मोडल्यासारखा. गणेश थांबला मान वळवून त्याने खाली पाहिले. एक कच्चे पिवळसर अंडे त्याच्या पायाखाली फुटले होते. त्याचा पिवळा पांढरा बलक पसरला होता, बाजूला एक लिंबू चिरून ठेवला होता, त्यात हळद कुंकू भरला होता.

“मायला सुधारायची नाहीत लोक”, अस म्हणत गणेश ने आणखी एक लाथ मारून लिंबू जागेवरून उडवला. समोरचे चिंचेचे झाड स्थब्ध उभे होते.

सर्वजण आता एकत्र जमले होते. दप्तर जांभळान्नी भरली होती. चौघेही तेथून निघाले. रागाच्या भरात गणेशने लिंबू लाथाडला होता खरा, पण मनात उगाचच एक अस्वस्थता दाटली होती त्याच्या. त्याबद्दल तो तिघांना काही बोललाहि नाही.

एस.टी पकडून सर्व गावात आले. आपआपल्या घरी गेले. अंगात बराच शीण आला होता. गणेशने घरी आल्या आल्या काहीतरी खाऊन अंग आडवे केले.

‘भयाण असा अंधार पसरला होता, धुरकट वातावरणात मोठ मोठी झाड अस्पष्ट दिसत होती. मध्येच कोल्हेकुई तर कुत्र्यांचे रडणे ऐकू येत होते. समोरच एक मोठे चिंचेचे झाड दिसत होते. घोंगावणारा वारा सैरवैर फिरत होता. वाऱ्याने होणाऱ्या पानांची सळसळ वाढत होती. आणि इतक्यात दिसले चिंचेच्या झाडामागून दिसणारे दोन मोठे पांढरे डोळे’

एक मोठी किंकाळी फोडत गणेश अंथरुणात उठून बसला. संध्याकाळचे सात वाजले होते. गणेशचे संपूर्ण अंग घामाने थबथबले होते. अंगात ताप भरला होता. घशाला कोरड पडली होती.
गणेशच्या आई वडिलांनी तातडीने त्याला दवाखान्यात नेले. तपासणी केली आणि औषध घेऊन गणेश घरी आला. अंगात अजूनही ताप होता. जेवणही फारसे खाल्ले नाही. औषध घेऊन गणेश झोपण्याचा प्रयत्न करीत होता. ताप थोडा उतरला, गणेश अंथरुणात पडून होता. अचानक त्याला भयंकर अस्वस्थ वाटू लागले. तोंड फुगवत उचक्या देत गणेश जागेवरचा उठून पळत मोरीत पळला. काही कळायच्या आत भडाभडा उलट्या होऊ लागल्या…

रक्ताच्या…

गणेश आता पुरता घाबरला होता. गणेशचे आई वडील तर भांबावून गेले होते. असे अचानक काय झाले होते गणेशला. दुपारी जे घडले होते ते गणेशने त्याच्या मनातच ठेवले होते, कोणापुढेही त्याने वाच्यता केली नव्हती. त्या रात्री कोणालाच नीट झोपही लागली नाही.

सकाळ झाली. अर्धवट झोपेतून गणेशची आई उठली. उठल्या उठल्या तिने गणेशकडे पाहिले आणि तिच्या हृदयाचा ठोकाच चुकला. गणेशची अवस्था फारच भयंकर झाली होती. चेहरा लालभडक झाला होता. चेहऱ्यावर, हातावर, पायावर काळपट पट्ट्या उमटल्या होत्या. गणेशचे वडीलही हा प्रकार पाहून भयभीत झाले. काय कराव आणि काय नाही अशी अवस्था झाली होती. सकाळी साधारण दहाच्या सुमारास डॉक्टर बोकळे गणेशला तपासण्यास आले. औषधाचा काहीच परिणाम दिसत नव्हता. अंगात ताप भरला होता. त्यांनी गणेशला इंजेक्शन दिले आणि निघून गेले.

दिवसभर गणेशची आई गणेशजवळच बसून होती. संध्याकाळी गणेशचे वडील लवकरच घरी आले. न्याहारीनंतर गणेशला थोडी हुशारी आल्यासारखी वाटली पण अशक्तपणा खूप होता. गणेशचे आई वडील त्याच्या जवळ येऊन बसले.

“पोरा, बाहेर काही खाल्ल हुतस का?”, गणेशच्या वडिलांचा काळजीचा स्वर.

“नाही बाबा…पण काल”, गणेशचे शब्द ओठांवरच थांबले.

“काय झाल गणेश, खर खर सांग बघू”, आईचा चेहरा रडवेला झाला होता.

“आई काल मी, अजय, समीर आणि प्रशांत नदीवर गेलो हुतो”, गणेश सांगू लागला. त्याच्या आई वडिलांचा चेहरा चिंताग्रस्त झाला होता.

“तिथ नदीसमोरच्या वावरात आम्ही खेळलो, खेळता खेळता माझा पाय एका अंड्यावर पडला. तिथ एक लिंबू बी होत. लाल पिवळ केल्याल…”, गणेश.

गणेशच्या आईने पदर तोंडाला लावला आणि ती रडू लागली. काय झालय हे गणेशच्या वडिलांच्या लक्षात आल होत, पण आता पुढे काय? हा प्रश्न पडला होता.

गावात गोदाक्काला देवाची बाई म्हणून सगळे ओळखत असत. रात्रीचे नऊ वाजले होते. गणेशचे वडील गोदाक्काच्या घराच्या दारात उभे होते.

“गोदाक्का हाय काय”

“आई मधल्या घरात हाय, काय काम काढलं मामा”, गोदाक्काची सून.

“जरा तातडीच काम हाय येऊ काय घरात…”

“ये किसन.. आत ये सरळ, मधल्या घरात”, आतून गोदाक्काचा आवाज.

गणेशचे वडील मधल्या घरात आले. घर कसले एखादे देऊळच वाटत होते ते. खोलीच्या तिन्ही बाजूला ओळीने देव देवतांच्या मुर्त्या ठेवल्या होत्या. निरांजन, पणत्या, दोन तीन कसल्याशा बुट्ट्या तेथे ठेवल्या होत्या. गोदाक्का समोरच आई नीलाइच्या फोटोला पाया पडत होती. गोदाक्काने गणेशच्या वडिलांना बसण्यास सांगितले. गणेशचे वडील खाली मांडी घालून बसले.

“बोल किसन काय झाल, कुठंच काम आडलय का कसला तंटा?”

“गोदाक्का गणेश कालपासन लई आजारी हाय. कालपासन अंगात ह्यो ताप भरलाय, उतरतच न्हाय, रक्ताची उलटी झाली, सकाळी तर पुऱ्या अंगावर काळ चट्ट उठल्यात…”, गणेशचे वडील हात जोडूनच बोलत होते.

“काही बोल्ला का त्यो”

“पुलाकडल्या नदीवर गेला हुता, तिथल्या वावरातल्या एका चीचच्या झाडाखाली एक अंड तुडीवल…लिंबू हुता भरल्याला…ssssss”, गणेशच्या वडिलांचा हात थरथरत होता तोंडातून शब्द फुटत नव्हते.
गोदाक्काने डोळे विस्फारले.

“किसन तुला म्हाईत हाय न्हव ती जागा लई वंगाळ हाय…. तुला म्हायीत हाय कि न्हाय कुणास ठाऊक, त्या जागेवर जीमिनी खाली प्रेत पुराल्याती, अमुशेला निवद ठेवत्याती तिथ, चीचेच एकच झाड हाय तिथ मधी. परवा अमूशा हुती…आणि त्या चीच खालचच लागीरलय त्येला”, गोदाक्का.

“गोदाक्का, आता काय करायचं तूच सांग..”, गणेशच्या वडिलांचा चेहरा रडवेला झाला होता.

“निवद जसाच्या तसा करून ठीवायचा. एक अंड, भरल्याला लिंबू, वर आणि नारळ पान सुपारी ठीवाय लागल. येळ घालवून चालायचं न्हाय, आजची रात्र हाय उद्या काय हुईल सांगता याचं न्हाय, एकटाच जाव लागल तुला”, गोदाक्का.

गोदाक्काने तिच्याजवळचा अंगारा दिला.

“गणेशला लाव ह्यो अंगारा, निवद तयार कर आणि लागलाच भायेर पड”, गोदाक्का.

गणेशचे वडील गोदाक्काने दिलेला अंगारा हातात घेऊन घरी जाण्यास वळले.

“आणि एक गोष्ट लक्षात ठेव… निवद ठेऊन झाल्यावर तडक निघून ये, कसलाही आवाज आल्यास माग वळून बघू नगस”, गोदाक्काचा निर्वाणीचा इशारा.

गणेशचे वडील घरी आले. रात्रीचे दहा वाजून गेले होते.गोदाक्काने सांगितलेलं सर्व काही त्यांनी गणेशच्या आईला सांगितलं. दिलेला अंगारा त्यांनी गणेशला लावला. नैवेद्याची सर्व तयारी करून घेतली.

“कोणास घेऊन जाता बरोबर? वाटल्यास निवद ठेवाय एकटाच जा…”, गणेशच्या आईने काळजीने विचारले.

“काळजी करू नगस, मला काही होत न्हाय”, असे म्हणून गणेशचे वडील घराबाहेर पडले.

पुलाजवळील एस.टी थांब्याजवळ बस थांबली. गणेशचे वडील खाली उतरले. एव्हाना पावसाची रिप रिप हळू हळू चालू झाली होती. एका हातात नैवद्याच सामान आणि एका हातात छोटेखानी छत्री घेऊन ते डाव्या बाजूच्या रस्त्याकडे वळले. एस.टी निघून गेली.

रस्त्यावरील दिव्याचा खांब अंधुक मिणमिणता प्रकाश पाडीत होता. समोरचा रस्ता संपूर्ण निर्जन दिसत होता. गणेशचे वडील रस्त्यावरून चालत सरळ निघाले. सकाळची मोहक हिरवी झाड रात्रीच्या अंधारात भव्य आणि भीतीदायक वाटू लागली होती. वारा घोंगावत होता. एक सोसाट्याचा वारा आला आणि छत्री उलटी पालटी करून निघून गेला. गणेशच्या वडिलांनी स्वतःला सावरले. नैवद्य पोटाशी घट्ट धरून ते झपझप पावलं टाकीत पुढे निघाले.

मंदिर मागे पडले तसे समोरची स्मशान भूमी नजरेस पडली. स्मशानासामोरील मोडकळीस आलेल्या लाकडी प्रवेशद्वारावरून सहज नजर आत गेली. एक चिता जळत होती. आजू बाजूला कोणीच नव्हते. पण आतून रडण्याचा आवाज येत होता. का कुणाश ठाऊक पण गणेशच्या वडिलांना खूप अस्वस्थ वाटू लागले. अंगाला वारा झोंबत होता.

स्मशान मागे टाकून गणेशचे वडील पुढे चालत गेले. नदीकडे जाणाऱ्या पायऱ्याजवळ जाऊन उभे राहिले. समोरचा परिसर भीतीदायक होता, अंधारात बुडालेला. मोठ मोठी झाड वेड्या वाकड्या अंगांनी उभी होती. जणू एकाच्या मागून एक वळून बघतंय. गणेशच्या वडिलांनी निर्धार केला आणि झपझप चालत ते आवारात शिरले. आवारात निळसर गडद अंधार पसरला होता. पाऊस आता पूर्ण थांबला होता. जमिनीवर चिखल पसरला होता. गणेशचे वडील हळू हळू चालत पुढे जात होते.

अचानक….

टीव टीव टीव टीव … करीत वटवाघुळ डोक्यावरून निघून गेलीत. गणेशच्या वडिलांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांनी स्वतःला सावरले. भर भर चालत ते आवाराच्या मध्यभागी आले. समोर एक मोठ चिंचेच झाड होत. मनावर एक अनामिक दडपण येत होत, त्यांनी मन घट्ट केल. समोर हळूवार पावलं टाकीत ते झाडाजवळ गेले. पिशवीतील नैवद्य त्यांनी बाहेर काढला. खाली केळीचे पान ठेवले आणि त्यावर आणलेला नैवद्य त्यांनी पसरून ठेवला. उभ राहून त्यांनी झाडावरून एक नजर फिरवली. झाडासमोर त्यांनी हात जोडले काहीतरी पुटपुटले आणि परत जाण्यास मागे वळले.

मागून वाऱ्याचा एक झोत त्यांच्या अंगाला भिडला, त्यांना गोदाक्काने सांगितलेले शब्द आठवले काहीही झाल तरी मागे वळून पाहायचं नाही…

दोन चार पावलं आणखी चालल्यावर झाडाची सळसळ त्यांच्या कानावर पडली. नेहमीची सळसळ नव्हती ती. त्यात काही इशारा होता का… गणेशचे वडील जागीच थांबले, मागे वळून त्यांनी पहिले नाही. अंगाला दरदरून घाम फुटला होता. हवेतला गारवा अंगाला टोचत होता. का कुणाश ठाऊक पण आपल्या मागे कोणीतरी आहे… आपल्याकडे रोखून बघत आहे असा भास झाला. झाडाची सळसळ आता थांबली होती.

गणेशचे वडील तेथून निघाले. मागे पुढे न बघता ते थेट चालत रस्त्यावर आले. नदीकडील रस्त्यावरून पुलाजवळ येईपर्यंत कोणीतरी आपल्या मागे आहे असा भास त्यांना होत राहिला. रात्रीचे बारा वाजून गेले होते. एस.टी थांब्यावर गणेशचे वडील येऊन थांबले. मनात नाना विचार येत होते. समोरून शेवटची एस.टी आली, ती पकडून ते थेट घरी आले.

दुसऱ्या दिवशीची सकाळ काळजी मिटवनारी ठरली. गणेशचा ताप पूर्ण उतरला होता. अंगावरील काळे पट्टे निघून गेले होते. एका मोठ्या संकटातून बाहेर पडल्याचा निश्वास त्याच्या आई वडिलांनी सोडला.

Leave a Comment