बाजीला अद्दल घडविली | Bajila Addal Ghadavali Marathi Katha | Marathi Story

बाजीला अद्दल घडविली | Bajila Addal Ghadavali Marathi Katha

Bajila Addal Ghadavali Marathi Katha: शिवरायांचा दरारा आता खूपच वाढला होता. जेव्हा विजापुरच्या आदिलशहाला समजले की, औरंगजेबाचे सुरत लुटून शिवाजीराजे सुखरूपपणे राजगडावर परत आले, तेव्हा आदिलशहा खूपच घाबरला. जर शिवाजीराजांनी विजापुरावर चाल केली तर आपले काही खरे नाही अशी भीती त्याला वाटत होती. त्यासाठी त्याने दरबारातील आपल्या सरंदारांना विचारले, “ज्या शिवाजीमहाराजांनी शहेनशहा औरंगजेबाचे सुरत लुटले, त्या शिवाजीमहाराजांना कोकणी मुलुख जिंकून आदिलशाहीची शक्ती मोगल बादशहाला दाखवून देणारा कोणी तलवारबाज सरदार येथे आहे काय?”

दरबारामध्ये सर्वत्र शांतता पसरली. तेवढयात एक खवासखान नावाचा सरदार उठून म्हणाला, “हा समशेर बहाद्दर तयार आहे.”

आदिलशहाने लगेचच त्याला शिवरायांचा कोकणी मुलूख जिंकून घेण्यासाठी मोहिमेवर जाण्याचा हुकूम दिला. त्याने त्याच्या मदतीला बाजी घोरपडे, सिद्दी या सरदारांसह मोठा फौजफाटा दिला.

खवासखान विजापुराहून निघून कोकणात जाण्यासाठी इतर सरदार घेऊन निघाला; परंतु बाजी घोरपडे आपल्या मुधोळ गावाहून मोठी फौज घेऊन दोन-तीन दिवसांनी परस्पर खवासखानाला येऊन मिळणार आहे, ही बातमी शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी विचार केला, “बरे झाले, एकटा सापडला. आता मी त्याला चांगला धडा शिकवतो आणि अफजलखानाच्या भेटीस वर पाठवतो.”

शिवाजी महाराज आपली फौज घेऊन घोडयावर स्वार होऊन मुधोळकडे निघाले. बाजी एकदम बेसावध होता. त्याला थोडी देखील कल्पना नव्हती की, शिवराय आपल्यावर चालून येत आहेत. तो खवासखानाला जाऊन मिळायचे या तयारीत होता.

शिवाजीमहाराज अतिशय वेगाने आले व बाजीच्या गढीमध्ये त्यांनी प्रवेश केला. बाजीने पहाऱ्यावर असणाऱ्या सैनिकांची मदत घेतली व तो शिवरायांबरोबर लढू लागला. बाजीने स्वतःच्या धर्माशी आणि स्वतःच्या लोकांशी प्रतारणा केली होती एवढेच नाही तर त्याने कपट करून शहाजीराजांच्या हाता-पायात बेडया अडकवण्याचे अतिशय नीच असे कृत्य केले होते. अशा आपल्या मायभूमीशी प्रतारणा करणाऱ्या बाजी घोरपडयाचे अवसान थोडयाळ वेळात गळून गेले होते.

शिवाजीमहाराजांनी बाजीचे शिर एका घावातच धडावेगळे केले आणि त्याला कठोर शासन केले. स्वराज्याच्या जिवावर उठलेल्या बाजीला शेवटी त्याच्या वाईट कृत्याचे फळ मिळाले.

शिवाजी महाराज आता बाजी घोरपडयाचा काटा काढून खवासखानाचा समाचार घेण्यासाठी कोकणाकडे निघाले. खवासखान कोकणातील कुडाळजवळ येऊन पोहोचला होता. त्याने आपली छावणी अतिशय गर्द झाडीत घातली होती. बाजी घोरपडे याला महाराजांनी ठार केले आहे, याची थोडी देखील कल्पना त्याला नव्हती. तो त्याची वाटच पाहात होता. रात्रीची वेळ होती तरीदेखील महाराजांनी त्याच्यावर हल्ला केला. महाराजांचा शूर सरदार इब्राहिमखान आणि फौज खवासखानाच्या सैन्यावर तुटून पडली. खवासखानाचे हाशम पटापट मरू लागले. आता आपले काही खरे नाही असा विचार करून खवासखान विजापुराला पळून गेला.

Leave a Comment

x