छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन | Shivaji Maharaj Marathi Katha | Marathi Story

शिवाजी महाराजांचे सामर्थ्य आता खूपच वाढले होते. महाराजांनी शत्रूला अगदी नकोसे करून सोडले होते. एके काळी बलवान असे आदिलशहा व कुतुबशहा हे देखील महाराजांचे सामर्थ्य पाहून घाबरले होते. मग प्रश्न राहिला तो दिल्लीच्या मोगलांचा.

महाराजांनी त्यासाठी आपले वकील आदिलशहा व कुतुबशहाकडे पाठवले; परंतु आदिलशहा मात्र एकत्र येण्यास तयार नव्हता. कुतुबशहाने मात्र त्यांचे म्हणणे मान्य केले व त्यांना भेटीसाठी बोलविले. महाराज तेथे गेल्यावर त्यांनी महाराजांचे अतिशय प्रेमाने स्वागत करून त्यांचा मान-सन्मान देखील केला.

यानंतर या दोघांच्या फौजांनी एकत्रित मोहीम काढून कर्नाटकातील बराचसा प्रदेश जिंकला. त्यातील पूर्वी शहाजीराजांच्या ताब्यात असलेला मुलुख महाराजांनी स्वतःकडे ठेवला आणि उरलेला प्रदेश कुतुबशहाकडे सोपविला.

कर्नाटकातील मोहीम पार पाडून मोठी दौलत घेऊन ते रायगडावर परत आले. त्यांनी ही मोहीम अतिशय व्यवस्थित पणे पार पाडली परंतु त्याची महाराजांना फारच दगदग झाली. त्यांची प्रकृती बिघडण्यास सुरूवात झाली. वैद्यांनी त्यांना पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले. महाराजांना आतापर्यंतच्या काळात कधीही शारीरीक विश्रांती मिळालेली नव्हती.

महाराज आता जसे शरीराने थकले होते तसेच ते मनाने देखील थकले होते.

काही घटना महाराजांच्या अतिशय मनाविरूध्द घडल्या होत्या त्यामुळे ते खूपच अस्वस्थ झाले होते. शारीरिक व मानसिक ताण-तणावाने त्यांची प्रकृती अजूनच खालावली होती. त्यांचा ताप खूपच वाढत चालला होता. तेव्हा महाराजांना आता आपला फार काळ राहिलेला नाही असे वाटू लागले. त्यातच त्यांनी आपले दुसरे चिरंजीव रामराजे यांचा विवाह देखील करून घेतला व त्या दगदगीमुळे त्यांचा आजार फारच वाढला.

त्यावेळी महाराजांचे जेष्ठ चिरंजीव युवराज संभाजीराजे सज्जनगडावर होते. महाराजांच्या मनात अनेक विचार चालू होते. अनेक वीरांनी रक्त सांडून स्वराज्याची उभारणी केली होती, आणि ते स्वराज्य आपणानंतर सर्वांनी मिळून व्यवस्थित सांभाळावे अशी त्यांची इच्छा होती.

महाराजांनी आपल्याजवळच्या सर्व माणसांना आपल्याजवळ बोलावून घेतले. त्यांची तशी अवस्था बघून सर्वांचीच मने अगदी हेलावून गेली. तेव्हा महाराज म्हणाले, “आम्ही मृत्यूला घाबरत नाही. पण आम्हाला चिंता आहे ती स्वराज्याची. आम्ही गेल्यावर कशीही परिस्थिती असली किंवा कितीही संकटे आली तरी सर्वांनी एका मनाने व एका विचाराने या हिंदवी स्वराज्याचे रक्षण करावे, हीच आमची शेवटची इच्छा आहे.”

जस-जसा काळ पुढे चालला होता, तसा महाराजांचा आवाज खोल खोल जाऊ लागला होता. आज चैत्र पौर्णिमेचा दिवस. महाराजांना अस्वस्थ वाटू लागले होते. महाराजांची प्रकृती जशी जशी गंभीर होऊ लागली तशी त्यांच्या दालनात गदी होऊ लागली होती. आता महाराजांना काळाची चाहूल लागली होती. तेथे जमलेल्या सर्व लोकांवर त्यांनी एक अखेरची नजर फिरवली आणि खुणेनेच रामराजांना काहीतरी सुचविले. तसे रामराजे उठले आणि त्यांनी महाराजांच्या मुखात गंगाजल घातले; तुळशीपत्र घातले. एवढयात महाराजांनी आपले डोळे मिटले ते कायमचेच. खरोखर तो क्षण फारच अवघड होता. कोणाच्याही डोळयांतील अश्रू थांबत नव्हते.

महाराष्ट्राचे नीतीवान, कीर्तिवान, शौर्यवान आणि प्रजहितदक्ष असे ‘जाणता राजा’ असलेले छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गलोकात निघून गेले होते. ते एप्रिल १६८० साल होते. या जाणत्या राजाला आमचे कोटी कोटी प्रणाम. खरोखरच शिवाजी महाराजांसारखे राजे आपल्याकडे होऊन गेले म्हणजे आपण खूप भाग्यवान आहोत असेच म्हणावे लागेल

Leave a Comment