दाटला चोहिकडे अंधार | Daatla Chihikade Andhar | Marathi Lyrics

गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – सुधीर फडके
स्वर – सुधीर फडके ,  आकाशवाणी प्रथम प्रसारण


दाटला चोहिकडे अंधार
देउं न शकतो क्षीण देह हा प्राणांसी आधार

आज आठवे मजसी श्रावण
शब्दवेध, ती मृगया भीषण
पारधींत मी वधिला ब्राह्मण
त्या विप्राच्या अंध पित्याचें उमगे दुःख अपार

त्या अंधाची कंपित वाणी
आज गर्जते माझ्या कानीं
यमदूतांचे शंख हो‍उनी
त्याच्यासम मी पुत्रवियोगें तृषार्तसा मरणार

श्रीरामाच्या स्पर्शावाचुंन
अतृप्‍तच हें जळकें जीवन
नाहीं दर्शन, नच संभाषण
मीच धाडिला वनांत माझा त्राता राजकुमार

मरणसमयिं मज राम दिसेना
जन्म कशाचा ? आत्मवंचना
अजुन न तोडी जीव बंधनां
धजेल संचित केवीं उघडूं मज मोक्षाचे द्वार ?

कुंडलमंडित नयनमनोहर
श्रीरामाचा वदनसुधाकर
फुलेल का या गाढ तमावर ?
जातां जातां या पाप्यावर फेकित रश्मीतुषार

अघटित आतां घडेल कुठलें ?
स्वर्गसौख्य मी दूर लोटले
ऐक कैकयी, दुष्टे, कुटिले,
भाग्यासम तूं सौभाग्यासहि क्षणांत अंतरणार

पाहतील जे राम जानकी
देवच होतिल मानवलोकीं
स्वर्गसौख्य तें काय आणखी ?
अदृष्टा, तुज ठावें केव्हां रामागम होणार ?

क्षमा करी तूं मज कौसल्ये
क्षमा सुमित्रे पुत्रवत्सले
क्षमा देवते सती ऊर्मिले
क्षमा प्रजाजन करा, चाललों सुखदु:खांच्या पार

क्षमा पित्याला करि श्रीरामा
पतितपावना मेघ:श्यामा
राम लक्ष्मणा सीतारामा
गंगोदकसा अंती ओठी तुमचा जयजयकार
श्री राम-श्री-राम-रा-म

Leave a Comment