धृतराष्ट्राच्या पुत्रांची वागणूक | Dhrutrashtrachya putrachi vagnuk Marathi Katha

धृतराष्ट्राच्या पुत्रांची वागणूक | Dhrutrashtrachya putrachi vagnuk Marathi Katha

पंडुपुत्रांना हस्तिनापुरात सोडून ऋषिमुनी निघून गेले. पंडुपुत्रांना पाहून तेथील सर्व लोकांना खूप आनंद झाला, परंतु धृतराष्ट्राच्या पुत्रांना मात्र ते आलेले अजिबात आवडले नाही व खूप वाईट वाटले.

त्यांच्यामध्ये सर्वात मोठा पुत्र दुर्योधन हा होता. तो स्वतःला तेथील भावी राजा समजत असे. त्यामुळे त्याला नागरिकांनी पंडुपुत्रांचे स्वागत केलेले अजिबात आवडले नाही. लोकांनी ‘कौरवेश्वर युधिष्ठिराचा विजय असो’ हि घोषणा दिली. त्या घोषणेचा त्याला खूपच राग आला. तो खूपच चिडला आणि वडिलांकडे जाऊन त्यांना म्हणाला, “हया मुलांना तुम्ही घरात कशाला घेतले. त्या ऋषिमुनींना हे नसते उद्योग कोणी सांगितले होते. तुम्ही त्यांना आत्ता ताबोडतोब हाकलून द्या. कोण कुठले म्हणे ‘कौरवेश्वर’ तुम्ही त्यांचे जर कौतुक करणार असाल तर आम्हाला विहिरीत ढकला.”

धुतराष्ट्राला दुर्योधन बोलला ते ऐकून अतिशय वाईट वाटले. तो मुलाला म्हणाला, “तू असे बोलू नकोस. माझे तुझ्यावरील प्रेम हे कधीही कमी होणार नाही. मी तुझ्यासाठी सर्व काही करीन. पण असे काही बोलू नकोस आणि आजोबा भीष्माचार्यांना व काका विदुरांना तुझ्या मनातले हे विचार अजिबात कळू देऊ नकोस. सगळयाच मनातील गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात. हे लक्षात ठेव.”

तेव्हा दुर्योधन त्यांना म्हणाला, “मी त्यांना कुरू वंशाच्या सिंहासनावर बसू देणार नाही. त्यावर त्यांचा काहीही अधिकार नाही. आणि मी त्यांना कौरव कुळातले देखील मानणार नाही.”

ते ऐकून धृतराष्ट्र त्याला म्हणाला, “तु म्हणतोस तसेच सगळे होईल. पण तू थोडा धीर धर. आपण त्यांना पांडव असे म्हणू. त्यांचे तेच नाव रूढ करू. आता तू माझ्यावर रागावू नकोस.”

हे सर्व झाल्यावर धृतराष्ट्राला फार वाईट वाटले व त्याने आपले पुत्र दुर्योधन, दुःशासन, यांना सहानुभूतीने आपल्या छातीशी धरले व नंतर ते त्यांच्या महालात निघून गेले.

Leave a Comment