दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ | Doghanch Bhandan Tisaryala Labh Marathi Katha | Marathi Story

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ | Doghanch Bhandan Tisaryala Labh Marathi Katha

एकदा दोन मांजरांनी बघितले की,एका घरामध्ये अर्धा किलो मावा एका पिशवित आणलेला होता. ती पिशवी चोरण्याचे त्या मांजरांनी ठरविले. त्यांच्यात असे ठरले की एकाने जाऊन माव्याची पिशवी चोरायची व तोपर्यंत दुसऱ्याने तेथेच दारात बसून घरातील कोणी माणूस येत आहे का? याकडे लक्ष दयायचे. जर कोणी दिसले तर पिशवी चोरायला गेलेल्या मांजराला तसा इशारा करायचा.

ठरल्याप्रमाणे एक मांजर स्वंयपाक घर आणि माजघर यांच्यातील दरवाज्यामध्ये बसले, व दुसरे मांजर ती माव्याची पिशवी चोरायला गेले. ती पिशवी स्वंयपाकघरात एका तिपाईवर ठेवलेली होती, त्या पिशवीचे तोंड बरोबर आपल्या तोंडात पकडून ते मांजर खिडकीतून झटकन बाहेर पडले आणि एका दूरवर झाडाच्या खाली बसले. ते थोडेसे दमले होते. त्याला जाताना बघून त्याच्या पाठोपाठ पहारा देणारे मांजरही तिकडे गेले.

ते मांजर मावा घेऊन येणाऱ्या मांजराला म्हणाले, “मी किती छान पहारा दिला! म्हणून या माव्याचा जास्त वाटा मला मिळायला पाहिजे.”

त्याचे हे बोलणे ऐकल्याबरोबर पहिले मांजर मोठया आवाजात म्हणाले, “उलट तू जास्त असे काहीच केले नाही, फक्त दरवाजात बसून राहिलास! पण मी मात्र माव्याची पिशवी कष्टाने इथपर्यत ओढत आणण्याचे धाडसाचे कामे केले आहे व म्हणून मलाच जास्त मावा मिळायला हवा.”

यावर चिडून दुसरे मांजर मिशा हलवत म्हणाले, “अरे मूर्खा! जर मी दरवाजात बसलोच नसतो तर तुला कोणीही पकडले असते, आणि मी तेथे फक्त बसलो नव्हतो तर तुझ्यासाठी पहारा देत होतो. मी जर लक्ष ठेवले नसते तर त्या घरातील मालकिणीने तुझ्या डोक्यात काठी घातली असती आणि तू मावा खायला जिवंतच राहिला नसतास.”

याप्रमाणे त्या दोन मांजरामध्ये माव्याचा जास्त वाटा कोणाला मिळायला हवा यावरून खूप जोरात भांडण सुरू झाले. ज्या झाडाखाली ते दोघे बसले होते त्याच झाडावर एक वानर बसलेले होते. ते केव्हापासून त्यांचे ते भांडण पहात होते.

त्याला मनात खूप आनंद झाला होता म्हणून ते वानर त्या मांजरांना म्हणाले, “अरे, तुम्ही एवढया छोटया गोष्टीवरून का भांडत आहात! तुम्ही दोघांनीही केलेली कामे सारख्याच कष्टाची आहेत. जर तुम्ही मला एक तराजू आणून दिला तर मी या माव्याचे सारखे असे दोन वाटे करून तुम्हाला सारखे सारखे देईन. म्हणजे तुमच्यात भांडण होणार नाही.”

वानराचे म्हणणे त्या मांजरांना पटले म्हणून लगेचच एका मांजरांने एक छोटा तराजू आणून वानराला दिला. त्या वानराने तराजू हातात घेऊन हेतूपूर्वक माव्याचा एक मोठा गोळा व एक छोटा गोळा असे दोन भाग करून त्या तराजूत टाकले. त्यामुळे साहजिकच तराजूचे एक पारडे वर व एक खाली गेले.

तेव्हा ते वानर त्यांना म्हणाले, “अरे आता मी खाली गेलेल्या पारडयातील माव्याचा तुकडा काढून त्याला वर गेलेल्या पारडयातील तुकडयाइतकाच बनवतो आणि दोन्ही पारडी एकाच पातळीत आणतो.”

असे म्हणत त्याने जड पारडयातील माव्याचा जास्त मोठा लचका तोडून तो स्वतःच्या तोंडात टाकला, पंरतु जड पारडे हलके होऊन वर गेले व पूर्वी वर गेलेले पारडे दुसऱ्यापेक्षा जड होऊन खाली आले.

पुन्हा ती दोन्ही पारडी सम रेषेत आणण्यासाठी त्या धूर्त वानराने माव्याचा तुकडा परत तोंडात टाकला. मग परत पारडे वर गेले आणि वर गेलेले पारडे खाली गेले. अशा रितीने सारखे तेच करून त्या वानराने सर्व मावा स्वतःच खाऊन टाकला व तो तिथून निघून गेला.

वानराचा हा लबाडपणा दोन्ही मांजरांच्या लक्षात आला. ती दोन मांजरे एकमेकांना म्हणाली, “अरेरे! आपण जर दोघेही समजदारीने वागलो असतो आणि त्या माव्याचे आपणच अंदाजाने दोन सारखे भाग केले असते, तर आपले पोट चांगले भरले असते. परंतु आपण मात्र विनाकारण भांडत बसलो आणि त्यामुळे त्या गोष्टीचा फायदा घेऊन तो सर्व मावा त्या वानराने एकटयानेच खाल्ला व आपली फजिती केली.”

त्यांना समजले की, जर दोघांचे भांडण झाले तर त्यात तिसऱ्याचा नक्कीच लाभ होतो.

Leave a Comment

x