द्रौपदी हरण | Draupadi Haran Marathi Katha | Marathi Story

युधिष्ठिर द्यूत खेळताना सर्व काही हरला व त्यातच त्याने द्रौपदीलाही पणाला लावले व त्यातही तो हरला आणि म्हणून दुःशासनाने द्रौपदीची वेणी धरली व तिला ओढत सभेत घेऊन आला. ते बघून भीमाला खूप राग आला व तो ताडकन उठला व जोरात ओरडला, “हे दुष्ट दुःशासना, जो हात तू द्रौपदीला लावला आहेस, तो कुकर्मी हात मी उपटून टाकीन! तुझ्या रक्ताने माखलेल्या हाताने मी द्रौपदीची वेणी घालीन.”

भीमाची ही गर्जना ऐकून सर्व सभा हादरली.

दुर्योधनाने आपल्या मांडीवर थाप मारून म्हटले, “द्रौपदी, तू माझ्या मांडीवर बैस, माझी बायको हो.”

भीम परत चिडून म्हणाला, “दुर्योधना, मी माझ्या गदेने तुझ्या मांडीचे चूर्ण करीन!”

हे सर्व ऐकून द्रौपदी अतिशय व्याकूळ झाली व दुःखाने आक्रोश करत म्हणाली, “येथे सर्व जण जेष्ठ बसले आहेत.

त्यांना माझी ही केलेली विटंबना मान्य आहे का? आधी जे स्वतः जिंकले ते, त्या माझ्या पतिदेवांना मला पणाला लावण्याचा अधिकार होता का? स्त्री ही पणाला लावण्यासारखी जड वस्तू आहे का? माझे केस धरून मला येथे सर्वांच्या असे समोर आणणे, माझे नेसलेले वस्त्र ओढणे, मला दासी म्हणून संबोधणे, हयात सगळया कुलाचा अपमान नाही का? तुम्ही कानांत बोळे घालून बसू नका, डोळे मिटू नका. मला न्याय द्या. मी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करते की, मला न्याय द्या.”

द्रौपदीची ही केलेली केविलवाणी अवस्था पाहून गांधारी रडू लागली. भीमाची प्रतिज्ञा ऐकून धुतराष्ट्र घाबरला. तेव्हा विदुराने त्यांना समजावले. धुतराष्ट्राने पांडवांना त्यातून मुक्त केले आणि त्यांचे पूर्वीचे सर्व वैभव त्यांना परत केले. त्यानंतर ते सर्वजण रथात बसून इंद्रप्रस्थाला गेले.

हे सर्व घडल्यावर दुर्योधन, दुःशासन हयांनी धृतराष्ट्राला घेरले व तुम्ही आमच्या मिळवलेल्या विजयावर पाणी फिरवले, म्हणून ते धुतराष्ट्राला दोष देऊ लागले. दुर्योधनाने तर मोठे आकांडतांडवच केले.

शेवटी धृतराष्ट्र त्यांच्यापुढे नमला.

धुतराष्ट्राने “पुन्हा द्यूत खेळण्यासाठी या,” असा परत निरोप पांडवांना पाठविला.

पांडव परत आले. आणि द्यूत परत सुरू झाला. पण यावेळी पण एकच ठरला होता की, ‘यात जो पक्ष हरेल, त्याने बारा वर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास भोगायचा. आणि अज्ञातवासात ओळखले गेल्यास पुन्हा बारा वर्षे वनवासात व एक वर्ष अज्ञातवासात जायचे.’

आणि शेवटी पांडव हरले व सगळे काही सोडून ते द्रौपदीसह वनात गेले.

मग कौरवांनी अगदी आनंदाने दिवाळी साजरी केली.

कुंती तिच्या लहान दिराकडे विदुराघरी रहायला गेली.

Leave a Comment