दुर्योधनाचे कपटी कारस्थान | Marathi Katha | Marathi Story

दुःशासन एक दिवस रागाने म्हणाला, “या पांडवांचे प्रस्थ फारच वाढत चालले आहे. यांचा नाश केला पाहिजे.”

तेव्हा दुर्योधन म्हणाला, “भीमाला सर्व प्रथम ठार केले पाहिजे. आम्ही कितीही जण त्याच्या अंगावर धावलो, तरी तो आम्हाला सर्वांना पुरून उरतो. जर आम्ही झाडावर चढलो तर तो झाडाच्या फांद्या गदागदा हलवितो व आम्हांला खाली पाडतो. कधी पाण्यात बुडवून घाबरवतो. जर भीमालाच आपण मारले तर त्याचे सगळे भाऊ दुःखाने मरतील, नाहीतर कमजोर तरी होतील.”

त्यांच्यात दुष्ट कारस्थान शिजले.

एकदा त्यांची सर्वांची नदीकाठी सहल गेली. तेथे गेल्यावर सर्वजण खूप खेळले, पाण्यात पोहले. सगळयांनी खूप दंगा मस्ती केली. मग सगळेजण जेवायला बसले. तेव्हा दुर्योधन व दुःशासन भीमाला आग्रह करून वाढू लागले.
सर्वांची जेवणे झाली. प्रत्येक जण जिथे जागा मिळेल, तेथे झोपला. भीम एका झाडाखाली गेला. त्याला अचानक गुंगी आली व तो बेशुध्द पडला. कारण त्याने खाल्लेल्या जेवणात दुर्योधनाने विष मिसळले होते.

दुर्योधनाने पाहिले की, सर्वच जण दूर आहेत व गाढ झोपले आहेत, म्हणून त्याने व दुःशासनाने लांबलांब वेलींनी भीमाचे हातपाय बांधले व त्याला नदीत फेकले. आणि ते म्हणाले, “अन्नातल्या विषा, भीमाला मार. नदी, तू याला बूडव. मगरींनो, याला खा.”

परंतु भीमाला विषाने मारले नाही, नदीने बुडवले नाही आणि मगरींनी खाल्ले नाही.

तेथून भीम नागलोकी पोहोचला. नागांनी त्याचे स्वागत केले. त्यांनी त्याला औषधे खाऊ घातली. अनेक पौष्टिक पदार्थ त्याला खाऊ घातले. आता भीमाच्या अंगात पूर्वीपेक्षा जास्त शक्ति आली. तो अधिकच तेजस्वी दिसू लागला.

भीमाला नागांनी हस्तिनापूरला आणून पोहोचविले.

त्याला बघून दुर्योधनाने कपाळाला हात लावला व तो दुःखाने म्हणाला, “भीम आला. कर्दनकाळ भीम आला!

Leave a Comment