दुष्ट दुर्योधन | Marathi Katha | Marathi Story

0
458

मयासुराने बांधलेली जी मयसभा होती, त्यात सर्व गोष्टी विचित्र अशा होत्या. सर्वजण मयसभा पाहू लागले. दर्योधनही तेथे गेला. तेथे त्याची फार फजिती झाली. त्याला जेथे पाणी आहे असे वाटले तेथे तो आपले कपडे खोचून चालू लागला, तर तेथे अजिबात पाणी नसून कोरडी जमीन होती. जेथे पाणी नाही असे त्याला वाटले तेथे गेल्यावर तो पाण्यात पडला. एका ठिकाणी त्याला वाटले की, येथे दरवाजा आहे, असे समजून तो चालू लागला, तर त्याचे डोके भिंतीवर आपटले.

दुर्योधनाची हि झालेली फजिती वर उभी असलेली द्रौपदी पहात होती. ते पाहून ती हसली व म्हणाली, “आंधळयाचे पोर आंधळेच असणार.”

तिचे ते शब्द दुर्योधनाच्या मनाला खूप लागले. तो खूप निराश झाला व आपल्या भावांना म्हणाला, “मला आता जगायची इच्छा उरली नाही. मला पांडवांचे वैभव पहावत नाही. आपण त्यांना हस्तिनापूरातून नेसत्या कपडयांनिशी हाकलले होते. तरी देखील त्यांनी एवढया कमी वेळात अपार संपत्ती व कीर्ती कशी मिळविली. मला हा पांडवांचा उत्कर्ष झालेला सहन होत नाही. मी आत्महत्या करणार.”

एवढे बोलून तो रानात निघून गेला व एका गुफेत गेला.

त्याचे भाऊ त्याच्या मागे जाऊन त्याची समजूत काढू लागले. ते म्हणाले, “आपण त्यांच्यावर आक्रमण करून त्यांना ठार मारू.”

तेव्हा दुर्योधन त्यांना म्हणाला, “त्यांना मारणे शक्य नाही, हे अनेकदा सिध्द झाले आहे. कारण त्यांची सेना मोठी आहे व पृथ्वीवरचे सगळे राजे त्यांच्या बाजूचे आहेत.”

शकुनी दुर्योधनाला म्हणाला, “मी अशी युक्ती करेन की, येत्या वर्षभरात त्यांचे सगळे वैभव तुझ्या पायाशी लोळण घेईल.”

अशा प्रकारे सर्वांनी दुर्योधनाची समजूत घातली व त्याला परत हस्तिनापुरात आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here