Home Marathi Katha एकीचे बळ | Marathi Katha | Marathi Story

एकीचे बळ | Marathi Katha | Marathi Story

0

एकेकाळी इंग्रजांचे राज्य होते. एके ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होता. कार्यक्रम संपल्यानंतर पुरुषमंडळी बाहेर पडली. स्त्रियाही बाहेर पडत होत्या. तेवढ्यात दोन गोरे आरक्षक दारू प्यालेल्या अवस्थेत स्त्रियांच्या द्वारासमोर येऊन उभे राहिले. वायफळ बडबड करत त्यांनी स्त्रियांचा मार्ग अडवला. त्यामुळे त्या स्त्रियांना बाहेर पडता येईना. त्यांच्या घरची मंडळी त्यांची वाट पहात त्याच द्वारासमोर उभी होती; परंतु त्या गोऱ्या आरक्षकांना वाट सोडून देण्यास सांगण्याचे कोणी धाडसही केले नाही. बराच वेळ असाच गेला.
त्याच वेळी मार्गाने दोन मराठी युवक जात होते. द्वाराबाहेर असलेली दाटी पाहून त्यांनी काय प्रकार आहे, याची चौकशी केली. जेव्हा त्यांना सर्व परिस्थिती कळली, तेव्हा त्यातला एक तरुण आपल्या मित्राला म्हणाला, ”चल, आपण त्या महिलांना साहाय्य करू.” त्यावर मित्र म्हणाला, ”माधव, कशाला नसती कटकट मागे लावून घेतोस ?” एवढे बोलून तो मित्र निघूनही गेला. माधवला मात्र रहावले नाही. तो पुरुषांच्या दाटीत जाऊन सर्वांना उद्देशून म्हणाला, ”हटवा ना त्या गोऱ्या आरक्षकांना!” सगळयांना त्याचे म्हणणे पटत होते; परंतु त्यासाठी पुढाकार घेणार कोण, हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यामुळे सगळेच गप्प होते, हे माधवच्या लक्षात आले. ‘चला मी होतो पुढे’, असे म्हणून माधव त्या आरक्षकांच्या जवळ जाऊ लागला. हळूहळू लोकही पुढे सरकू लागले. आरक्षकांच्या जवळ जाऊन माधवने त्या आरक्षकांना दरडावून सांगितले, ”येथून निघून जा. नाही गेलात, तर आमचा चमू पहात आहात ना ?” त्याचा कणखर आवाज आणि त्वेष पाहून ते आरक्षक घाबरले आणि तेथून पळाले.

लोकांनी माधवला धन्यवाद दिले. माधव म्हणाला, ”तुम्ही इतके जण असूनही त्या दोघांना घाबरलात ? आपण संघटित शक्ती दाखवली नाही, तर ते आपल्या दुबळेपणाचा लाभच घेतील. जर एकीचे बळ दाखवले, तर त्यांचे काय सामर्थ्य आहे ? समोरच्यांच्या शक्तीला घाबरण्यापेक्षा आपली शक्ती त्यांना दाखवा.”

हाच तरुण माधव पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेचा अनेक वर्षे सरसंचालक होता.

तात्पर्य :- आपण एकटे काही करू शकत नाही; परंतु आपण संघटित झालो, तर नक्कीच विजयी होतो. कुठलाही लढा द्यायचा असेल, तर संघटित होणे आवश्यक आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version