गड आला पण सिंह गमावला | Gad ala pan Sinh Gela Marathi Katha | Marathi Story

Gad ala pan Sinh Gela Marathi Katha: शिवाजी महाराज आग्य्राहून सुटून सुखरूपपणे स्वराज्यात परत आले. परंतु तोपर्यंत मोगल सरदार खूप चिडले होते त्यामुळे त्यांनी स्वराज्यातील मुलूख जाळून, लुटून बेचिराख केला होता. ते सर्व बघून महाराज फारच दुःखी झाले. महाराजांना वाटत होते की, लढाया करण्यातच सगळा वेळ जातो आहे; त्यामुळे प्रजेच्या सुखासाठी आपल्याला काहीच करता येत नाही. राज्यात काही काळ तरी शांतता राहावी यासाठी त्यांनी औरंगजेबाशी तह केला. तेव्हा औरंगजेब देखील अडचणीतच होता म्हणून त्याने देखील तह करण्यास मान्यता दिली.

महाराजांनी आदिलशाही मुलुखात जाऊन लूट आणून स्वराज्यातील उध्वस्त प्रदेशाची नव्याने उभारणी केली. मोगलांनी आपल्या ताब्यात घेतलेले गड, किल्ले आपल्याला परत कसे मिळवता येतील याविषयी देखील महाराजांनी योजना तयार केली होती.

अशा प्रकारे दोन-तीन वर्षे शांततेत गेली. महाराजांनी आपल्या राज्याची घडी परत नव्याने बसविली. औरंगजेब अडचणीतून बाहेर पडताच औरंगजेबाने हिंदू धर्मियांवर परत अत्याचार करण्यास सुरूवात केली. लोकांवर होणारे अत्याचार, जुलूम पाहून महाराज आणि माँसाहेब अस्वस्थ होत होते. औरंगजेब महाराजांशी पुन्हा कपटाने वागू लागला. अशा कपटी व जुलूमी औरंगजेबाला चांगली अद्दल घडविलीच पाहिजे असे महाराजांनी ठरविले.

प्रथम मोगलांच्या ताब्यात असलेला कोंढाणा घ्यायचा असे महाराजांनी ठरविले. परंतु कोंढाणा घेणे काही सोपे नव्हते. उदयभानू हा मोगल सरदार तीन हजार सशस्त्र हाशमांना घेऊन गडाचे रक्षण करीत होता. महाराजांच्या मनात आले की, ‘गड जिंकून देईल, तो तानाजीच.’ असा विचार आला आणि तेवढयात तानाजी महाराजांपुढे अदबीने येऊन उभे राहिले.

महाराज त्यांना म्हणाले, “तानाजी, त्या औरंगजेबाने आपण केलेला तह झुगारून दिला व परत कपटाने वागण्यास सुरूवात केली आहे. तेव्हा आता आपण देखील आपल्या तलवारी काढून मोगलांनी ताब्यात घेतलेले आपले गड-कोट परत जिंकून घेतले पाहिजेत. प्रथम आपण कोंढाणा गड ताब्यात घ्यायचा आहे.”

तानाजीने आपल्या हातात काहीतरी लपविले होते ते परत खिशात ठेवले. ती गोष्ट महाराजांनी बघितली तेव्हा त्यांनी विचारले, “तानाजी, काय ठेवले रे खिशात?

तेव्हा तानाजी म्हणाले, “महाराज, माझ्या रायबाचं परवाच्या मुहूर्तावर लगीन हाय आणि त्याचंच आमंत्रण देण्यासाठी मी मोत्याच्या अक्षता आणल्या होत्या. पण आता मात्र आधी लगीन कोंढाण्याचं; मग रायबाचं!”

तेव्हा महाराज म्हणाले, “अरे तानाजी, त्यात काय अवघड आहे? आधी रायबाचं लगीन उरकू; मग कोंढाण्याचं लगीन लावू. असे लगीन पुढे ढकलू नकोस. तू काळजी करू नकोस. आम्ही जाऊ मोहिमेवर.”

तानाजी म्हणाले, “नाही महाराज, मी, आमचे शेलारमामा व आमचे बंधू सूर्याजी असताना आपण मोहिमेवर जाणार, ही कल्पना देखील आम्हाला सहन होणार नाही. आम्ही हां हां म्हणता असा कोंढाणा जिंकून त्या मोगलांना गडावरून हुसकावून लावू.”

तानाजींनी लगेचच लगीन पुढे ढकलले आहे असा निरोप आपल्या घरी पाठविला. त्याशिवाय बंधू सूर्याजी व शेलारमामा यांना ताबोडतोब राजगडावर पाठविण्याचा निरोप देखील दिला. हे सर्व झाल्यावर गप्प न बसता तानाजींनी गोंधळयाचे सोंग घेतले आणि कोंढाण्यावर जाऊन गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची सगळी माहिती काढून ते परत राजगडावर आले देखील होते.

दुसऱ्या दिवशी मध्यरात्रीची वेळ होती. तानाजी, सूर्याजी, शेलारमामा आणि पाच-सहा मावळे कोंढाण्याकडे निघाले. गडाच्या कल्याण दरवाज्यापाशी सूर्याजी, शेलारमामा हत्यारबंद मावळयांना घेऊन तेथे वाट पाहात थांबले होते. तेव्हा तानाजी शंभर मावळयांना घेऊन गडाच्या पश्चिम बाजूच्या उभ्या कडयाजवळ आले. समोर एक सरळसोट उभा कडा होता. एका बारीक परंतु काटक अशा मावळयाच्या कमरेला एक दोर बांधला. कडे-कपारीत हात घालीत एखाद्या घोरपडीसारखा तो मावळा सरपटतच कडा चढू लागला. थोडयाच वेळात वर जाऊन त्याने कमरेचा अतिशय भक्कम दोर वरच्या बाजूच्या एका झाडाला घट्ट बांधला. खाली असलेले शंभर मावळे त्या दोराला धरून चढून गडावर आले. दोन-तीन मावळे चोरपावलांनी कल्याण दरवाज्याकडे धावले. त्यांनी आतील अडसर काढताच दरवाजा उघडला तेव्हा लगेचच बाहेर वाट पाहात थांबलेले सूर्याजी, शेलारमामा बरोबर असलेल्या पाचशे मावळयांबरोबर आत घुसून आधीच वर पोहोचलेल्या मावळयांना येऊन मिळाले. गडावर आल्यावर त्यांनी झोपा काढत असलेल्या पहारेकऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांची मुंडकी कापण्यास सुरूवात केली.

ते सैनिक बेसावध होते आणि तेही झोपेत होते त्यामुळे जोरात ओरडत ते मरू लागले होते. त्यांच्या ओरडण्याचा आजाव आणि ‘हर हर महादेव’ च्या गजराने किल्लेदार उदयभानू डोळे चोळीतच उठला. उठल्यावर त्याच्या लक्षात आले की, मावळे आपल्यावर तुटून पडले आहेत म्हणून. त्याबरोबर त्याने लगेच आपली ढाल-तलवार घेऊन आपल्या हाशमांसह मशाली पेटवून तो मावळयांकडे धावला. परंतु तोपर्यंत मात्र वाघासारख्या मावळयांनी हाशमांचा धुव्वा उडविला होता. मावळे अतिशय सपासप तलवारी चालवून हाशमांना धरणीवर लोळवीत होते.

आता तानाजी आणि उदयभानू या दोंघामध्ये लढाई सुरू झाली. ते दोघेही आपल्या तलवारी अतिशय त्वेषाने फिरवत होते. त्यांचे एकमेंकावर जोरदार वार होऊ लागले. शेवटी दोघांच्याही शरीरावर खूप जखमा झाल्या व इतके रक्त वाहिले की, काही वेळातच त्या दोघांचा रणांगणावर मृत्यू झाला.

तानाजी पडला तेव्हा सर्व मावळयांचा धीर खचला. आता आपण माघार घ्यावी का? असे त्यांना वाटत होते. परंतु आपला भाऊ धारातीर्थी पडला आहे हे विसरून सूर्याजी गरजला, “अरे पळ कसला काढता? बघा जरा, तुमच्या समोर तुमचा बाप मरून पडला आहे, त्याचा तुम्ही सूड घ्या. नाहीतरी तुम्ही पळून आता कोठे जाणार आहात? कारण झाडाला बांधलेला दोर केव्हाच कापला आहे. तसेच गनिमांनी कल्याण दरवाजा अडवून धरला आहे. मग मरायचे असेल तर लढून मरा.”

सूर्याजी जेव्हा असे ओरडले तेव्हा मावळयांनी परत अतिशय जोमाने हाशमांना कापण्यास सुरूवात केली. थोडयाच वेळात शत्रू गार झाला आणि कोंढाण्यावर स्वराज्याचा भगवा झेंडा फडकू लागला.

आपला भाचा तानाजी याला वीरमरण आले ते बघून शेलारमामांवर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. तरीदेखील ते दुःख बाजूला ठेवून गड जिंकला हे महाराजांना कळावे म्हणून ठरल्याप्रमाणे त्यांनी गवताची गंजी पेटवून दिली.

गडावर जेव्हा आगीचा लोळ दिसला तेव्हा तो प्रकाश पाहाताच क्षणी तानाजीने गड जिंकला हे महाराजांना समजले व त्यांना खूपच आनंद झाला. परंतु त्यांना जेव्हा समजले की, आपला तानाजीसारखा निष्ठावान आणि जिवाला जीव देणारा सहकारी आपण गमावला आहे, तेव्हा मात्र त्यांना अतोनात दुःख झाले. ते अतिशय दुःखी स्वरात म्हणाले, “मी आज गड मिळविला पण माझा सिंह मात्र गमावला आहे.

Leave a Comment

x