आपण स्वतःशी प्रेम कसे करू शकतो? मला तर माझ्यात फक्त दोष दिसतात.

इंग्रजीत एक चांगले वाक्य आहे, ‘Even the blackest black has some white in it and the whitest white has some black in it’. जर आपण देव नसू तर आपल्यात काही चांगले गुण असणे आणि काही वाईट गुण असणे अपेक्षितच आहे. १००% वाईट माणूस असूच शकत नाही आणि १००% चांगला सुद्धा.

मुद्दा असा आहे कि आपल्यात असलेले दोष हे आपल्यालाच जाणवले का त्याची जाणीव आपल्याला दुसऱ्याने करून दिली आहे. शेवटी आपल्या आयुष्याला आपणच जबाबदार आहोत. फार थोडी माणसे अशी असतात कि खरंच दुर्दैवाचे बळी असतात बाकी बहुतांशी माणसे हि आपले आयुष्य घडवतात किंवा बिघडवतात.

डासापेक्षा चिमणी मोठी आहे. चिमणीपेक्षा कावळा मोठा आहे. कावळ्यापेक्षा घार मोठी आहे. घारीपेक्षा गरूड मोठा आहे पण आकाश हे या सगळ्यांपेक्षा खूप मोठे आहे आणि आकाश हे कोणाच्याच मालकीचे नाही. चिमणीने चिमणी म्हणून राहावे – काहीही समस्या येत नाही. पण जर चिमणीने जर गरूड व्हायचा प्रयत्न केला तर फक्त कमतरताच दिसतील.

जर आपल्यात काही वाईट गुण आहेत असे खरेच वाटत असेल तर ते गुण सोडून द्यावेत आणि चांगले गुण अंगीकारावेत. वाल्मिकी सुद्धा आधी वाल्याकोळी होते आणि वाटमारी करत होते. विश्वामित्र हे सुद्धा आधी विश्वरथ असताना एक जुलमी राज्यकर्ते होते. जर ते सुधारले तर आपण कदाचित तितके वाईट तरी नक्कीच नसू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *