ब्रेकअप झाल्यावर तुम्ही स्वतःला कसे सावरले?

2010 या वर्षाचा जून महिना 21 तारीख, कधीही न कल्पिलेला प्रसंग माझ्यासोबत घडला.

बरं ते ब्रेकअप होतं की आणखी काही हेच मला अजून उलगडा झालेला नाहीये, कारण त्या दिवसानंतर आमचं बोलणेच झाले नाही भेट तर सोडून द्या.

आम्ही पदवीला एकाच वर्गात होतो, पहिल्या वर्षाच्या शेवटच्या 2 महिन्यापर्यंत तर आम्ही एकमेकांना व्यवस्थित बोललो पण नव्हतो. दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला योगायोगाने म्हणा किंवा नशिबाने म्हणा पहिले 15 दिवस तिच्या मैत्रिणी येत नव्हत्या, तेव्हा आम्ही दोघे थोडंथोड करून बोलायला लागलो. काळाच्या ओघात नंबर्सची पण देवाणघेवाण झाली आणि आम्ही चांगले मित्र बनलो (हो मित्रच…)

एव्हाना आमचा ग्रुप पण बनला होता, ग्रुप मध्ये असताना पण आम्ही दोघेच जास्त बोलायचो. त्यामुळे की काय ग्रुप मधली सगळी मंडळी तिला चिडवायची, हे मला माहित नव्हते आणि तिने पण मला सांगितले नाही. शेवटी जेव्हा त्रास जास्तच वाढला तिने महाविद्यालयच बदलायचं ठरवलं, दुसऱ्या वर्षाच्या परिक्षेवेळी तिने मला हे सगळं सांगितले आणि ग्रुप मध्ये खूप भांडणं झाली. सुट्टीच्या काळात आम्ही खूप बोललो आणि जसे ग्रुपने गृहीत धरलं होत ते झालं.

शेवटचं एक वर्ष आम्ही सोबत होतो, त्या एका वर्षात आमच्या सोबत फिल्मीस्टाईल खूप घटना घडल्या. आमच्या एकत्र येण्याच्या पहिल्याच महिन्यात तिच्या घरी आमच्याबद्दल कळालं आणि तिच्या घरच्यांनी तिचं शिक्षणचं बंद करून टाकलं, मला खूप वाईट वाटलं की माझ्यामूळे तिला ह्या सगळ्या त्रासातून जावं लागतंय. तिने मला सांगितलं होतं की तिने माझं नंबर, नाव, पत्ता सगळं तिच्या घरच्यांना सांगून टाकले आहे, आणि म्हणाली की नंबर बंद करून टाक. मी घाबरलो, मला वाटलं माझ्या बाबांना कळालं तर काय होईल? ते काय म्हणतील? आणि मी माझा नंबर बंद करून टाकला. पण 2 तासानंतर मी पुन्हा माझा नंबर चालू केला, करणी तर दोघांची होती तेव्हा तिने एकटीने का म्हणून सगळा त्रास आणि जाच सहन करायचा.

तिचे घरचे मला रोज 5–6 फोन करून धमक्या त्रास, द्यायचे, मी सगळं एकूण घेतलं फक्त तिच्यासाठी सहन केलं. मी फक्त त्यांचं एकूण घ्यायचो, त्यांना कधीच विरोध किंवा आवाज चढवून बोललो नाही. हे असं 1 महिना चाललं, मीच शेवटी त्यांना म्हणालो की तिला शिकू द्या मीच कॉलेज सोडून देतो. तीच स्वप्न होत की नोकरी करून तिच्या आईवडीलासाठी काही तरी भक्कम करायचं होतं लग्नाआधी, त्यामुळे मला नको होतं की माझ्यामुळे तिचं स्वप्न जे तीने माझ्या तिच्या जीवनात येण्याआधी बघितलेलं होत ते अपूर्ण राहावं.

तिच्या घरच्यांनी तिला कॉलेजला येण्यास परवानगी दिली (पण तिचा फोन काढून घेतला), आणि मी कॉलेजला जाण सोडून दिलं. रोज मी घरून कॉलेजचं सांगून निघायचो आणि मित्राच्या रूमवर जाऊन बसायचो. असे 6 महिने निघून गेले, अधून मधून आमचे फोनवर बोलणे व्हायचे (PCO वरून) आणि 1–2 वेळेस भेटलो ही होतो.

मला हे पुढे चालू राहू नये असे वाटायचे कारण माझ्यामुळे तिला आणखी त्रास झालेला मला आवडला नसता, पण तिला हे नातं मध्येच संपलेलं नको होतं.

एकदा मी तिला मला फोन करत जाऊ नकोस म्हणून सांगितले, तिने ते खूपच मनावर घेतले आणि 15 दिवस फोनच केला नाही. आता मात्र मी बावरलो, मला वाटायचं की आज फोन येईल, असे करत करत 15 दिवस निघून गेले पण तिने फोनच केला नाही. मला तिला फोन करायला मार्गच नव्हता आणि मी कॉलेजला जाणे सोडून दिले होते, आता मला राहावत नव्हते कधी एकदा तिचा आवाज ऐकतो असे झाले होते.

मी निर्णय घेतला की आपण काही तिच्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे आपण आता कॉलेजला रोज जायचं आणि तिला भेटायचं. 16व्या दिवशी मी कॉलेजला गेलो आणि तिच्यासमोर गेलो तर ती आनंदून गेली पण तिला मी येण्याचा धक्का लागला नाही किंवा आश्चर्य वाटले नाही, किंबहुना तिला माहितच होत की मी येणारच.

कॉलेजमधून पण तिच्या घरी आमच्या बद्दल तक्रारी गेल्या होत्या, आता त्या सर्वांच्या नाकावर टिच्चून मी तिला भेटायचो, बोलायचो, कॅन्टीनमध्ये तासनतास बसायचो. आमचे नाते आता खूपच घनिष्ठ होत गेले, अशातच आमची शेवटची परीक्षा झाली आणि असेच एक दिवस तिला घरी सोडताना आम्हाला तिच्या काकांनी पाहिले. त्या दिवसानंतर ती मला दिसलीच नाही तिचा फोन किंवा संदेश (msg) पण आला नाही.

मी खूप प्रयत्न केला तिच्याशी संपर्क करण्याचा, तिच्या आतेबहिणीला (ती आम्हाला senior होती कॉलेजमध्ये आणि तिला आमच्याबद्दल माहीत होत) सुद्धा संपर्क करून तिच्याशी भेट किंवा फोनवर एकदा बोलू तरी दे. ती फक्त एवढेच म्हणाली की तिला तिच्या मोठया आत्याकडे पुण्याला पाठवले आहे आणि तिला सुद्धा तिच्याशी बोलायला देत नाहीए.

मला तिच्या घरी जाऊन राडा घालता आला असता पण मी तिला आणखी अडचणीत टाकू इच्छित नव्हतो, म्हणून मी फक्त तिची वाट पहायची ठरवलं ते आजतागायत वाटच पाहतोय.

ही गोष्ट पचवणे मला खूप अवघड गेली, मी हुशार विद्यार्थी किंवा पहिल्या पाचात वगैरे नव्हतो पण मी कधीच नापास झालो नव्हतो, हे झाल्यानंतर मला माझ्या MBA ला ATKT लागली आणि मला कळून चुकलं की आता माझं काही खर नाही.

कितीही प्रयत्न करुन अभ्यासात लक्ष लागत नव्हतं, घरच्यांनी एवढया विश्वासाने पुणेसारख्या ठिकाणी एवढे पैसे खर्च करून शिकण्यासाठी पाठवले हे सगळं कळत असूनही वळत मात्र नव्हतो. डोक्यात सतत तिचाच विचार यायचा, कुठे असेल? काय करत असेल? मला जशी तिची आठवण येते तशी तिला माझी आठवण येत नसेल का? आणि जर येत असेल तर तिने माझ्याशी संपर्क का नाही केला? तिच्याकडे तर माझा नंबर आहे म्हणून मी सतत फोन माझ्याकडेच ठेवायचो. कंपनीचा जरी msg आला तरी तिचाच आहे ह्या आशेने मी तो बघायचो, जेथे network ची समस्या आहे अशा ठिकाणी जायचं टाळायचो.

कसेबसे मी माझं MBA पूर्ण केलं आणि तिची आठवण नको म्हणून मी आसामला नोकरी पत्करली, 6 महिन्यातून एकदाच घरी यायचो आणि आलो की तासनतास तिच्या घरासमोर जाऊन बसायचो. पण ती काही दिसलीच नाही.

तिच्या मागे मी सगळं कळत असूनही माझ्या जीवनवर पर्यायाने घरच्यांच्या आशेवर पाणी फेरले, माझ्या घरच्यांना अजूनही माहीत नाहीए की मी 2–3 वर्ष असं विचित्र का वागलो.

अशा परिस्थितीतून बाहेर यायला खूप मानसिक ताकद आणि जिद्द लागते आणि मला वाटतं की त्यांचा माझ्यात अभाव होता, कारण मला यातून बाहेर यायला खूप वेळ लागला. अजूनही कधी कधी मला जेव्हा तिची आठवण येते आणि जर मी घरी असेन तर मी शेतात जाऊन जोरजोरात ओरडतो, आणि हैदराबादला असेल तर bathroom मध्ये जाऊन रडतो पण आता मी हे सगळं बाजूला ठेऊन जगायला शिकतोय.

पण अजूनही माझ्याकडे तिच्याबद्दल खात्रीपूर्वक माहिती नाहीए की ती कुठे आहे, आणि आशा आहे की तिलाही माझी आठवण येत असेल.

Leave a Comment

x