जशी दृष्टी तशी सृष्टी | Marathi Katha | Marathi Story

दूषित दृष्टीचा देव
एकदा इंद्रदेव, वरूण देव आणि वायुदेव हे तिघेही देव एकत्र आले तेव्हा त्यांनी तिघांनी ठरविले की, आपण प्रत्येकाने कोणतीतरी एक चांगली गोष्ट निर्माण करायची. मग काय, ठरविल्याप्रमाणे इंद्रदेवांनी एक बैल तयार केला, वरूणदेवांनी एक मनुष्य तयार केला आणि वायुदेवांनी एक सुंदर असे घर बनविले.

या तिन्ही देवांना आपण निर्माण केलेल्या कृतींपैकी कोणाची कृती जास्तीत जास्त निर्दोष आहे हे जाणून घेण्याची उत्सूकता निर्माण झाली. तेव्हा त्यांनी एका देवाला बोलाविले आणि त्याला त्याबाबतचा निर्णय देण्यास सांगितले.

नेमका तो देव हा मुळातच दूषित दृष्टीचा होता त्यामुळे त्याला जगातील कोणतीच गोष्ट चांगली दिसत नसे त्यामुळे तो देव वरूणाला म्हणाला, “वरूणा, तू जो माणूस निर्माण केला आहे तो तसा बरा आहे. परंतु मला असे वाटते की, त्याच्या छातीत एक खिडकी हवी होती, म्हणजे त्याच्या मनात काय चाललं आहे, हे इतर लोकांना देखील कळले असते व यामुळे वेळप्रंसग आल्यास त्यापासून सावध रहाता आले असते.”

मग इंद्राने त्याला विचारले, मी बनवलेला बैल कसा आहे?”

तेव्हा तो देव इंद्राला म्हणाला, “इंद्रा, तसा तू बनवलेला बैल देखील बरा होता, परंतु त्याच्यात एक मोठा दोष राहिला असल्यामुळे त्याच्यात काही अर्थ उरलेला नाही.”

इंद्राने देवाला विचारले, “असा त्या बैलात कोणता मोठा दोष राहून गेला आहे?”

तेव्हा तो देव इंद्राला म्हणाला, “शत्रूपासून स्वतःच रक्षण करण्यासाठी शिंगे मारताना शत्रूला ती अचूक लागताहेत की नाहीत हे कळण्यासाठी त्याचे डोळे त्याच्या दोन शिंगांच्या मध्ये हवे होते.”

शेवटी वायुदेवाने त्या देवाला विचारले, “बर, आता मी तयार केलेलं घर तरी तुला आवडलं का?”

तेव्हा तो देव तोंड वाकडे करून म्हणाला, “वायुदेवा, तू हे घर बांधतांना दूरवरचा विचार मुळीच केलेला दिसत नाही. जरी थंडी, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण करण्याच्या दृष्टीने या घराची बांधणी ठीक असली, तरी याच्या खालच्या चार कोपऱ्यांत जर तुम्ही चार चाकं बसवली असती, तर शेजाऱ्याशी भांडण होताच हे घर ढकलत ढकलत त्या शेजाऱ्यापासून दूर अंतरावर नेऊन उभे करता आले असते.”

कोणत्याही गोष्टीच्या चांगल्या बाजू लक्षात न घेता, फक्त त्यातील दोष तेवढे शोधून काढण्याची त्या देवाची वृत्ती पाहून इंद्र देव खूपच रागावले आणि त्याला अर्धचंद्र देत म्हणाले, “जशी दृष्टी तशी सृष्टी, हे म्हणतात ते अगदी खरे आहे. तुझी दृष्टीच सदोष नसल्याने, जगातील सर्व गोष्टींमध्ये तुला फक्त दोषच दिसतात. तेव्हा आता तुला या देवलोकात स्थान नाही. तू पृथ्वीवर जा”

इंद्राने त्या देवाला अतिशय रागाने पृथ्वीवर ढकलले व तो पृथ्वीवर पडला आणि त्याच्यापासूनच पुढे या भूलोकी व्यर्थ टीकाकार व अर्थ नसलेले निंदक तयार झाले.

यासाठी प्रत्येक गोष्टींमध्ये काही ना काही दोष न काढता तिच्यातील चांगले गुण देखील पाहिले पाहिजेत.

Leave a Comment