जावळीचे खोरे जिंकले | Javliche Khore Jinkle Marathi Katha

जावळीचे खोरे जिंकले | Javliche Khore Jinkle Marathi Katha

आदिलशहाच्या मनात अनेक शंका होत्या त्यामुळे तो अस्वस्थ झाला होता. शहाजीराजांच्या अपमानाचा बदल घेण्यासाठी त्यांचे पुत्र शिवराय हे दिल्लीच्या मोगलांशी संधान बांधून आपले राज्य घेतील की काय, असेही विचार आदिलशहाच्या मनात घोळत होते.

आदिलशहाने विचार केला की, आता परत शहाजीराजांना कर्नाटकमध्ये पाठविणे धोक्याचे आहे म्हणून त्याने शहाजीराजांना सांगितले, “राजे, आजपर्यंत तुम्ही फार कष्ट केले आहेत व आता तुम्हाला दगदग झेपणार नाही म्हणून तुम्ही येथेच विश्रांती घ्या म्हणजे आम्हाला तुमचा मोलाचा सल्ला देखील मिळेल.” असे म्हणून त्याने शहाजीराजांना विजापुरातच ठेवण्याचे ठरविले.

शहाजीराजांनी आदिलशहाचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले परंतु त्यांना मनातून त्याचे खरे कारण माहित होते. त्यांचा नाइलाज असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीस होकार दिला. थोडक्यात काय तर, ते एका कैदेतून मुक्त होऊन दुसऱ्या नजरकैदेत अडकले. शहाजीराजे विजापुरमध्ये अडकल्यामुळे शिवरायांना फारशी काही हालचाल करता येत नव्हती व त्यामुळे स्वराज्याचा विस्तार करण्यासाठी गती येत नव्हती म्हणून शिवरायांनी प्रजेच्या हिताची कार्ये हाती घेतली. नदीवर बंधारे बांधणे, तलाव खोदणे, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आखून राबविणे, निपक्षपाती न्यायनिवाडा करणे अशा प्रकारच्या कामात राजांनी लक्ष घातले.

जनकल्याणाची अनेक कामे त्यामुळे झाली व प्रजेला सुखाचे दिवस आले. याच वेळी शिवरायांना पुत्ररत्न प्राप्त झाले. महाराणी सईबाईसाहेब यांनी पुरंदर गडावर एका बाळाला जन्म दिला. सगळीकडे खूप आनंदी-आनंद झाला. बाळाचे नाव ठेवले संभाजी! संभाजीराजे!

शिवरायांमध्ये अनेक गुण होते. या गुणांचे जर वर्णन करायचे ठरविले तर आपल्याला शब्द कमी पडतील असेच म्हणावे लागेल. इतक्या कमी वयात त्यांची दूरदृष्टी, मुत्सद्दीपणा, पराक्रम, धैर्य, धाडस, प्रजेविषयी त्यांना असणारी त्यांची कळकळ या सर्व गुणांमुळे सगळी प्रजा प्रभावित झाली होती. त्यांच्यातील या गुणांमुळे अनेक मोठ मोठी माणसे त्यांच्या पदरी गोळा झाली होती.

इकडे आदिलशहाला वाटले की, शिवरायांचा राज्यविस्तार आता ठप्प झालेला आहे त्यामुळे त्याला खूप आनंद झाला. त्याला वाटले की आता शिवराय काही हालचाल करणार नाहीत त्यामुळे त्याने शहाजीराजांना परत कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठवून दिले.

जावळीच्या गादीवर बसलेल्या चंद्रराव मोरे याच्या मनात सत्तेविषयी आर्कषण निर्माण झाले व त्यामुळे त्याला उपकारकर्त्याचे विस्मरण झाले. शिवरायांच्या मुलुखात तो त्रास देऊ लागला. स्वराज्यातील एखाद्या वतनदाराची जमीन जबरदस्तीने हिसकावून घे तर कधी स्वराज्यातील गुन्हेगारांना आश्रय दे, अशा प्रकारची वाईट कामे तो करू लागला आणि शिवाय तो शिवरायांकडे दृष्टपणे पाहू लागला. जेव्हा त्यांची ही वाईट कामे शिवरायांना समजली तेव्हा त्यांनी त्याला अतिशय कडक भाषेत पत्र लिहून आपले वर्तन सुधारण्यास सांगितले.

परंतु शिवरायांच्या या पत्राला चंद्रराव मोरे याने अतिशय उन्मत्त अशा भाषेत उत्तर दिले ते असे, “आम्ही आदिलशहाच्या कृपेने राजे झालो आहोत व तो आमचा वारसाहक्कच आहे. तुमच्या बोलण्याला आम्ही घाबरत नाही. जर तुम्ही आमच्या वाटेला गेलात तर आम्ही समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही.”

चंद्ररावांचे उद्धटपणाचे बोलणे ऐकून शिवराय खूपच चिडले. त्यामुळे त्यांनी मावळयांना सैन्यासह बोलविले आणि ‘त्या बेइमान चंद्ररावाला चांगला धडा शिकवा व जावळी स्वराज्यामध्ये दाखल करून घ्या.’ असे सांगितले.

जावळीत दोन हजार मावळयांची फौज घुसली तेव्हा चंद्ररावांची फौज धावुन आली व युध्दास सुरूवात झाली. चंद्ररावांचे बरेचसे सैन्य यात ठार झाले त्यामुळे उरलेल्या सैन्याचे धैर्य खचले. परंतु त्यांच्यातील एक शूर वीर मात्र एकटा जिवाच्या कराराने लढत होता. परंतु शेवटी चंद्ररावानेच हार मानली व तो रायरीच्या किल्ल्यावर पळून गेला त्यामुळे त्या वीराला देखील थांबावे लागले. त्या वीराचे नाव होते मुरारबाजी. शिवरायांनी त्याचा पराक्रम बघून त्याला नजरकैदेत त्यांच्या देखरेखीखाली ठेवले.

शिवरायांनी आपला मोर्चा रायरीकडे वळविला. तेथे चंद्रराव राजांच्या तावडीत सापडला व गड ताब्यात आला. शिवरायांनी ठरविले की, चंद्ररावांना थोडया समजूतीच्या गोष्टी सांगाव्या, परंतु चंद्ररावांचे मन मात्र आदिलशहाकडे होते व त्याला वाटत होते की आदिलशहाला शरण जाऊन शिवरायांना परत धडा शिकवावा म्हणून त्याने आदिलशहाकडे एक गुप्त पत्र रवाना केले. ते पत्र वाटेतच शिवरायांच्या गुप्तहेरांनी हस्तगत केले व राजांकडे आणून दिले. ते वाचून शिवराय खूपच संतापले. चंद्रराव म्हणजे अस्तनीतला निखारा होय. तो जगण्याच्या लायकीचा नाही असे लक्षात आल्यामुळे राजांनी त्याला व त्याच्याप्रमाणेच उन्मत झालेल्या त्याच्या पुत्राला ठार मारले.

आता संपूर्ण जावळीचे खोरे स्वराज्यात आले म्हणून शिवराजांनी रायरीच्या गडाचे नाव ‘रायगड’ असे ठेवले. त्याच्याजवळील चंद्रगड, सोनगड व मकरंदगड हे किल्ले देखील शिवराजांनी ताब्यात घेतले. या जावळी खोऱ्यात एक डोंगर अगदी एखाद्या योध्याप्रमाणे खडा पहारा करीत मर्दासारखा उभा असलेला शिवरायांच्या नजरेला बरोबर दिसला. शिवरायांना वाटले की, जर याच्यावर एखादा गड बांधला तर शत्रूला तो अजिंक्य ठरेल, असे वाटल्यावर त्यांनी तेथे लगेच नवा गड बांधण्याची आज्ञा केली व गडाचे बांधकाम लगेच सुरू झाले. शिवरायांनी या गडाचे नाव ‘प्रतापगड’ असे ठेवले.

स्वराज्यामध्ये जावळी येताच स्वराज्याचा विस्तार आता दुपटीने झाला. शिवरायांनी युध्दात ज्यांनी पराक्रम केला होता त्यांचा सन्मान करण्यासाठी दरबार भरवला. जे धारातीर्थी पडले, त्यांच्या कुटुबांच्या पालन-पोषणासाठी जमिनी दिल्या. कोणाचेही कुटुंब उघडयावर पडणार नाही याची काळजी शिवराय नेहमीच घेत असत. किल्ल्याच्या रक्षणासाठी देखील त्यांनी अधिकारी नेमले आणि प्रत्येक गडावर पुरेशी फौज ठेवून शिवराय परतीच्या मार्गावर निघणार तेवढयात त्यांना मुरारबाजीची आठवण आली.

शिवरायांनी मुरारबाजींना बोलवले व ते त्यांना म्हणाले, “मुरारबाजी, तुमची ही स्वामीनिष्ठा बघून आम्हाला फार आनंद झाला. तुमची तलवार एखाद्या विजेसारखी तळपती होती परंतु तुमची एक चूक झाली व ती म्हणजे चंद्रराव मोरेंसारख्या लाचार व परकीय सत्तेपुढे झुकणाऱ्या अतिशय गद्दार अशा माणसाच्या पायी तुम्ही तुमची निष्ठा वाहिलीत. जर तुमची हीच निष्ठा यापूढे हिंदवी स्वराज्यासाठी वाहिलीत, तर तुमच्या पराक्रमाचे व तुमच्या जन्माचे सार्थक होईल.”

खरोखरच तेव्हा मुरारबाजींना त्यांची चूक समजली व त्यांनी आपली तलवार शिवरायांच्या पायाशी ठेवून ते म्हणाले, “महाराज, खरेच माझी चूक झाली आहे व आम्ही मार्ग चुकलो आहोत. तुमच्यामुळे माझे डोळे उघडले आहेत. मी आई भवानीची शपथ घेऊन सांगतो की, येथून पुढे मी माझी फक्त तलवारच नाही तर माझे पूर्ण जीवन स्वराज्याच्या सेवेसाठी अर्पण करीन. आपण मला आपले मानून माझ्यावर जी जबाबदारी सोपवाल ती मी अतिशय प्राणपणाने पार पाडीन, याची खात्री बाळगा.”

मुरारबाजी हा एक चांगला योद्धा स्वराज्याला मिळाला होता. शिवरायांना देखील खूप आनंद झाला. सर्वजण परत राजगडाकडे परतले.

Leave a Comment

x