झाकली मूठ सव्वा लाखाची | Zakali Muth Savva Lakhachi Marathi Katha

झाकली मूठ सव्वा लाखाची | Zakali Muth Savva Lakhachi Marathi Katha

एका गावात एक गोपाळराव नावाचे गृहस्थ रहात होते, त्यांच्या पत्नीचे नाव यमुनाबाई असे होते. त्यांना दोन मुले व दोन मुली असा परिवार होता. गोपाळरावांनी आपला सर्व पैसा त्यांची मुले व मुली यांचे शिक्षण, लग्न आणि त्यांच्यासाठी चांगली घरे बांधून देण्यासाठी खर्च केला.

गोपाळरावांची मुले व सुना स्वार्थी असल्यामुळे त्यांना एवढे करून देखील त्यांच्या दयेवर जगण्याची वेळ आली. त्या दोघांना मुलांकडून अतिशय हिनपणाची व अपमानाची वागणूक मिळत असे. अचानक एके दिवशी गोपाळरावांचा मृत्यू झाला व त्यामुळे ते बिचारे या त्रासातून सुटले परंतु यमुनाबाई मात्र एकटयाच राहिल्या.

यमुनाबाई असेच एकदा उदास अशा मनस्थितीत देवळात गेल्या. तेथे त्यांना त्यांची बालमैत्रीण गोदूताई भेटली. तिला बघून त्यांना बरे वाटले. यमुनाबाईंना उदास बघून गोदूताईंनी त्यांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी तिला सर्व वृत्तांत सांगितला. ते सर्व ऐकल्यावर गोदूताईंनी तिला गुप्तपणे काहीतरी सांगितले. ते ऐकल्यावर त्यांना थोडासा धीर आला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ज्याप्रमाणे गोदूताईंनी सांगितले होते त्याप्रमाणे त्या एक बॅग घेऊन त्यांच्याकडे आल्या व त्यांची जणू काही पहिल्यांदाच भेट होत आहे असे दाखवले आणि यमुनाबाईंना त्यांनी मिठी मारली. यमुनाबाईंनी त्यांना विचारले, “गोदू तू येथे आमच्या गावात केव्हा आलीस व कोणाकडे उतरली आहेस?”

“यमुनाबाईंच्या दोन्ही सुना तिचा आवाज ऐकून लगेच आतून बाहेर आल्या. त्यांना बघताच गोदूताई तिला म्हणाल्या, “अग, मी दुसरीकडे कोणाकडे उतरणार! आपण दोघी मावसबहिणी असलो तरी सख्ख्या बहिणींपेक्षा जास्त जवळचे आपले संबंध आहेत, मला भावोजी गेल्याचे समजले म्हणून मी तुला भेटायला व काहीतरी भेट देण्यासाठी मी तुझ्याकडेच आले आहे.”

गोदूताईंचे बोलणे ऐकून यमुनाबाई आदल्या दिवशी ठरवल्याप्रमाणे म्हणाल्या, “गोदूताई, तू मला भेटायला आलीस हे ऐकून फार बरे वाटल पण तू मला भेट द्यायला काही आणले आहेस, त्याचा अर्थ मला कळला नाही.”

गोदूताई जाणून बुजून रडण्याचा सूर काढत म्हणाल्या, “अग यमुने मला माहित आहे की तुम्ही दोघांनी तुमचा सर्व पैसा मुलामुलींच्या शिक्षणात, लग्नात व त्यांची चांगली घरे बांधण्यासाठी खर्च केलात आणि तुम्ही स्वतःसाठी मात्र काहीच ठेवले नाही. ते ठिक आहे कारण तुमची मुले व सुना सर्व चांगले आहेत म्हणून ते तुझ्याशी प्रेमाने वागतात व तुझा सांभाळ करतात व यापुढेही ते तसेच करतील याची मला खात्री आहे. परंतु आमच्याकडे मात्र याच्या उलट परिस्थिती आहे. आमची आर्थिक परिस्थिती चांगली असून देखील मुल शिकली नाहीत त्यामुळे ते कुठलाही उदयोग-धंदा करत नाही. त्यांना फक्त बसून खायला तेवढे येते. घरची श्रीमंती आहे म्हणून त्यांची लग्ने झाली. परंतु त्यांच्या बायका आमचा दोघांचाही सारखा अपमान करतात आणि माझी मुलं ते बघत असून देखील काहीही बोलत नाहीत.”

असे बोलत असताना गोदूताईंनी परत डोळे पुसण्याचे नाटक केले व त्या पुढे म्हणाल्या, “आता अशा परिस्थितीमुळे आम्हाला दोघांना जगण्याची इच्छा उरली नाही आणि आता आमचे आयुष्य ते असे किती उरले आहे! म्हणून मी ठरविले की माझ्या यजमानांना जवळचे असे कोणी नाही आणि मला तुझ्याशिवाय कोणी नाही तेव्हा सर्व पैसा-अडका मुलांना देण्याच्या ऐवजी, तुला त्यातील थोडेसे द्यावे असा विचार करून मी माझ्या यजमानांच्या परवानगीने पंचवीस तोळे वजनाचे दहा-बारा सोन्याचे दागिने व एकूण पन्नास हजार रूपये या बॅगेत आणले आहेत. त्या पन्नास हजार रकमेपैकी पंचेचाळीस हजारांच्या नोटा आहेत आणि एकेक रूपयाची पाच हजार नाणी आहेत. आता तू काहीही न बोलता आमची प्रेमाची भेट म्हणून ही बॅग घे व त्या बॅगेची चावी देखील घे. मी फक्त तुझ्याकडे चहा घेते व लगेचच निघते.”

गोदूताईंचे हे बोलणे ऐकून ‘आपल्या सासूची मावसबहीण काही सामान्य नसून अतिशय श्रीमंत आहे म्हणून तिने आपल्या सासूसाठी थोडक्यात काय तर आपल्यासाठीच धनाची पेटी आणली आहे’ असा विचार करत त्यातील मोठी सून उगीचच प्रेमाचे नाटक करत त्यांना म्हणाली, “हे काय मावशी, तुम्ही लगेच का निघालात, आता आल्या आहात तर रहा आमच्याकडे चार दिवस! तुमची मुल व सुना ही नवीन पिढीचे आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही दोघा पति-पत्नींनी तुमचे जीवन यशस्वी केले आहे. तसेच आम्हालाही त्याबाबत तुम्ही मार्गदर्शन केलत तर बरे होईल व कसे जगायचे ते आम्हाला देखील कळेल.”

गोदूताई तिला म्हणाल्या, “माझ्या यजमानांचे मित्र आज विमानाने रात्री बारा वाजता आमच्याकडे येणार आहेत त्यामुळे मला रहाता येणार नाही, आणि मार्गदर्शन ते काय करायचे! नुसता केलेला उपदेश हा कुचकामी ठरतो. प्रत्येक माणसाच्या जीवानात असा एक तरी प्रसंग येतोच की, ज्यामुळे त्याचे डोळे उघडतात आणि तो माणूस सूज्ञ व समझदार असेल तर त्याला मार्ग दाखवतो.” असे बोलून गोदूताई चहा घेऊन लगेचच तेथून निघून गेल्या.

गोदूताई येऊन गेल्यापासून यमुनाबाईंची दोन्ही मुलं व सुना त्यांच्याशी खूप चांगली वागू लागली होती व खूप प्रेम देखील करू लागले होते. यमुनाबाई जेवण झाल्यावर रात्री आपल्या खोलित जाऊन दाराला कडी लावून घेत व गोदूने दिलेले रूपये दगडावर आपटून वाजवून मोजून घेत. त्या नाण्यांचा आवाज रात्रीच्या वेळेस स्पष्टपणे त्यांच्या मुलांना व सुनांना ऐकू जात असे व त्यांचे यमुनाबाईंवरचे प्रेम अजूनच वाढत असे. जवळ-जवळ असे पाच ते सहा महिने चालू होते परंतु पैस मोजण्याचे काम मात्र संपत नव्हते.

यमुनाबाईंचे असे पाच-सहा महिने सुखात गेले परंतु एके दिवशी अचानक त्यांचा मृत्यू झाला. त्या गेल्यावर एक रिवाज म्हणून त्यांच्या सुनांनी व मुलांनी अश्रू देखील ढाळले. मग स्मशानातून आल्यावर मात्र त्यांनी लगेचच आईच्या खोलीत जाऊन त्या बॅगचे कुलूप उघडले आणि त्यांना धक्का बसला कारण त्यात फक्त जुनी वर्तमानपत्रे, चार-पाच वजनदार दगड आणि एकुलता एक रूपया होता व तो रूपया देखील दगडावर आपटल्यामुळे पूर्णपणे ठेचला गेला होता. ते सर्व बघून मुलांना जे वाटत होते की, ‘आईची झाकली मूठ सव्वा लाखाची असणार’ हे त्यांचे स्वप्नच ठरले गेले.

Leave a Comment