कक्षीवानाचे कोडे | Kashivanache Kode Marathi Katha | Marathi Story

कक्षीवानाचे कोडे | Kashivanache Kode Marathi Katha | Marathi Story

Kashivanache Kode Marathi Katha: एकदा कक्षीवान ऋषी प्रियमेध नावाच्या ऋषीकडे गेला व म्हणाला, `प्रियमेधा, माझे एक कोडे सोडव पाहू. अशी कोणती वस्तू आहे, की जी पेटविली तरी तिचा प्रकाश पडत नाही ?’

प्रियमेधाने खूप डोके खाजवले पण ह्याचा त्याला उलगडा होईना. कोणतीही वस्तू पेटली, की तिचा थोडा तरी प्रकाश पडणारच. तेव्हा तो म्हणाला, `ह्याचे उत्तर मला देत येत नाही. पण माझ्या वंशात पुढे कोणीतरी विद्वान निपजेल आणि तो तुला ह्याचे उत्तर देईल.’

कक्षीवान ऋषीजवळ एक मुंगसाच्या कातड्याची भली मोठी पिशवी होती. त्या पिशवीत प्रियंगू (पिंपळी), तांदूळ आणि अधिकता नावाचे धान्य भरले होते. तीतून एक एक दाणा काढून तो दर वर्षी फेकून देत असे. ते सर्व दाणे संपेपर्यंत त्याला आयुष्य दिलेले होते.

पण प्रियमेधाला काही इतके आयुष्य नव्हते. तो मेल्यावर त्याचा मुलगा त्याच्या जागी आला व तोही पुढे म्हातारा होऊन मरण पावला. अशा रीतीने प्रियमेधानंतर नवव्या पिढीत साकमश्व जन्मला. पण कक्षीवान मात्र अजूनही आपली पिशवी घेऊन बसलाच होता. तो जवळ जवळ नउशे वर्षांचा म्हातारा झाला होता. अजून त्याचे कोडे कोणाला सुटले नव्हते.

साकमश्वाला ह्या कोड्याचे वेडच लागले. त्याने निश्चय केला, की मी हे कोडे जिंकीनच. त्या वेळी त्याला एक `साम’ सुचले. त्याने ते गाणे म्हटल्याबरोबर त्याला ते कोडे सुटले.

तेव्हा मोठ्या आनंदाने तो तडक कक्षीवानाकडे धावत गेला. कक्षीवानाने त्याला दुरून धावत येताना पाहिले तेव्हा त्याच्या येण्याचे कारण त्याने ताडले. तो म्हणाला, `अरे, माझी ही पिशवी नदीत बुडून टाका. माझे कोडे सोडवून मला खाली पाहावयास लावणारा माणूस हा पाहा मला दिसतो आहे. आता काय कारायचे मला जगून?’

`साकमश्व कक्षीवानाजवळ आला व म्हणाला, `जो मनुष्य नुसती `ऋचा’ म्हणतो आणि `साम’ म्हणत नाही तो कवी अग्नीसारखा चेततो पण त्याचा प्रकाश पडत नाही. पण जो `ऋचा’ म्हणतो आणि लगेच `साम’ ही गातो तो कवी अग्नीसारखा चेततो आणि त्याचा प्रकाश पडतो. साकमश्वाला जेव्हा `साम’ स्फुरले व त्याने ते म्हटले तेव्हा त्याला `सामा’चे तेज कळून चुकले. संगीताची जोड दिल्याखेरीज नुसते मंत्र पाठ करण्यात अर्थ नाही हे त्याने शोधून काढले.

साकमश्व पुढे म्हणाला, `हे तुला माझे उत्तर आहे. माझ्या बापाचेही हेच उत्तर आहे.’ असे म्हणून थेट प्रियमेधापर्यंत सर्व पूर्वजांची त्याने नावे घेतली आणि आपल्या पूर्वजांचा कलंक धुऊन टाकला. तेव्हापासून यज्ञात ऋग्वेदातील ऋचांबरोबर सामवेदांतील सामेही म्हटली जाऊ लागली आणि काव्याला संगीताची जोड मिळाली.

मित्रांनो तुम्हाला Kashivanache Kode Marathi Katha हि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Leave a Comment

x