खायला काळ, भूईला भार | Marathi Katha | Marathi Story

स्वार्थी वृद्ध
एका गावात एक वृद्ध माणूस राहात होता. एके दिवशी तो खूपच आजारी पडला. त्या वृद्धाच्या घराच्या शेजारी एक अतिशय दयाळू परंतु स्पष्टवक्ता असा माणूस राहात होता. तो रोज नियमितपणे त्या वृद्ध आजारी माणसाला दोन वेळा जेवण व पाणी आणून देत व निघून जात असे.

असेच एकदा नेहमीप्रमाणे तो शेजारी त्या आजारी वृद्धाला जेवण व पाणी घेऊन आला व ते ठेवून जाण्यास निघाला तेव्हा तो वृद्ध त्याला म्हणाला, “खरे तर, माझी अजून काही वर्ष जगण्याची इच्छा होती, परंतु आता मला वाटत नाही की, मी फार दिवस काढू शकेन, जर तुम्ही यातून मी जगावं, यासाठी देवाची मनोभावे प्रार्थना केली तर देव मला या आजारातून वाचवेल.”

ते ऐकून तो शेजारी त्याला म्हणाला, “आजोबा, तुमच पूर्ण आयुष्य तुम्ही लोकांशी भांडण्यात आणि लांडयालबाडया करण्यात घालवले आहे. त्यामुळे या गावाला तुमचा थोडासा देखील उपयोग नाही, परंतु तुम्ही तुमच्या बायको-मुलांचा देखील छळ केल्यामुळे त्यांनी याच गावात तुमच्यापासून वेगळे घर घेऊन राहणेच पसंत केले आहे.

तुम्ही एवढे आजारी असताना देखील त्यांच्यापैकी तुम्हाला बघायला कोणीही आले नाही. आता तुम्हीच सांगा की, तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यात एकही चांगली गोष्ट न करता फक्त खायला काळ आणि भुईला भार झालेल्या तुम्हाला आणखी आयुष्य मिळावे, यासाठी कोणता मूर्ख माणूस देवाची प्रार्थना करील, आणि त्यातून दया येवून जर कोणी केली तरी ती देव मनावर घेईल काय?”

खायला काळ, व भुईला भार अशा वृत्तीची माणसे ही फक्त स्वार्थी असतात.

Leave a Comment