खूप मित्र असलेला ससा | Khup Mitra Aslela Sasa Marathi Katha | Marathi Story

खूप मित्र असलेला ससा | Khup Mitra Aslela Sasa Marathi Katha

अरण्यात सर्व प्राण्यांची ओळख असलेला एक ससा होता. त्याला आपले मित्र खूप आहेत, याबद्दल आनंद वाटत असे. एकदा सकाळी एका शिकार्‍याने त्याचा पाठलाग केला असता त्याने आपल्याकडून होईल तितकी धडपड केली व काही युक्त्या केल्या तरी त्याचा काही उपयोग झाला नाही. तेव्हा त्याने घोड्याला आपल्या पाठीवर बसवून घेण्यासाठी विनंती केली व त्याला सांगितले, ‘तूं जर मला पाठीवर घेतलेस तर त्याला माझा तपास लागणार नाही.’ घोड्याने उत्तर दिले, ‘तूं संकटात आहेस हे पाहून मला फार वाईट वाटतं, पण तुझे इतर मित्र जवळच आहेत ते तुला नक्कीच मदत करतील.’ ससा पुढे बैलाकडे गेला. तेव्हा बैल म्हणाला, ‘मी मोठ्या आनंदाने मदत केली असती पण मला अगदी जरुरीचं काम आहे, मला ते केलं पाहिजे, मी पुन्हा कधीतरी तुला मदत करीन.’ पुढे ससा बोकडाकडे गेला तेव्हा बोकड म्हणाला, ‘मला बरं वाटत नाही.

माझ्या पाठीवर बसल्याने इजा होईल.’मग तो मेंढीकडे गेला तेव्हा ती म्हणाली, ‘माझा काय उपयोग ? मी फार हळू चालते, शिवाय शिकारी कुत्र्याची भीती मला सुद्धा वाटते.’ शेवटी निराश होऊन सश्याने एका वासराला विचारले, तेव्हा वासरू म्हणाले, ‘जे काम माझ्यापेक्षा अनुभवी व शक्तीशाली मंडळींनी सोडून दिलं ते माझ्यासारख्या तरुण व अनुभवशून्य मुलाने कसं हाती घ्यावं ? मी तुला पाठीवरून नेलं तर बाकीच्यांना राग येईल. माझं तुझ्याविषयीचं प्रेम तुला माहीत आहेच, पण नाईलाजास्तव उत्तम मित्रांना सुद्धा एकमेकांपासून दूर राहावं लागतं. ते पहा, शिकारी आलाच ?’ तो दुर्दैवी ससा लवकरच पकडला गेला व प्राणास मुकला.

तात्पर्य

– संकटकाळी मदत करतात तेच तेच खरे मित्र.

Leave a Comment