माँसाहेबांचे निधन | Marathi Katha | Marathi Story

शिवरायांचा राज्याभिषेकाचा सोहळा अतिशय डौलात आणि थाटामाटात पार पडला. अत्याचारी व प्रजेचा छळ करणाऱ्या अनेक परकीय सत्ताधिशांना कधी गनिमी काव्याने तर कधी समोरा समोर झुंज देऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी स्वराज्यातील प्रजेला रानटी, धर्मांध जुलूमशहा यापासून वाटणाऱ्या भीतीपासून मुक्त केले.

अनेक परकी सत्ताधीश हिंदूंचा, हिंदू धर्माचा अतिशय व्देष करीत. प्रजेवर जुलूम करीत असत. अशा धर्मांधांना शिवरायांनी चांगलाच धडा शिकविला. परंतु शिवरायांनी मात्र कधीही परधर्माचा व्देष केला नाही. त्यांनी सर्वांना सारखीच वागणूक दिली. सर्वांच्याच धर्मस्थळांना भरपूर मदत केली. त्यांच्याजवळ परधर्मसहिष्णूता होती आणि म्हणूनच अनेक वीर त्यांच्यामागे उभे राहिले व त्यांच्या जिवाला जीव देऊ शकले होते.

प्रजेला नेहमी योग्य असा न्याय मिळावा आणि प्रत्येक काम शिस्तबद्ध व्हावे यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले. लोकांच्या कल्याणासाठी कायम अहोरात्र झटणारे शिवराय खरे तर लोकशाही राज्यव्यवस्थेचे आद्यप्रणेतेच होते असेच म्हणावे लागेल.

सर्व काही महाराजांच्या मनासारखे व चांगले घडत होते, परंतु तरी देखील त्यांना काळजीने ग्रासले होते. त्याचे कारण म्हणजे त्यांचे आराध्यदैवत म्हणजेच पूज्य माँसाहेब. या वयोमानाप्रमाणे आता थकत चालल्या होत्या. महाराज त्यांची खूप काळजी घेत होते.

महाराजांचा राज्याभिषेक सोहळा अतिशय दिमाखात साजरा झाला आणि माँसाहेबांच्या डोळयाचे जणू पारणेच फिटले होते. आता अशा आनंदी वातावरणात आपले डोळे मिटले तरी चालतील असेच त्यांना वाटत होते आणि खरचं त्यांच्या मनाप्रमाणे घडले. राज्याभिषेक झाल्यानंतर फक्त पंधरा दिवसातच माँसाहेब या निजधामी गेल्या. महाराज माँसाहेबांच्या स्वर्गारोहणाने अतिशय दुःखी झाले.

Leave a Comment