कर्तृत्वशून्य गृहस्थ
एक गृहस्थ नेहमीच मोठेपणाच्या गप्पा मारत असत. त्यांचा स्वभाव अतिशय घमेंडखोर होता. एकदा ते गृहस्थ आपल्या थोर पूर्वजांविषयी आणि आपल्या घराण्याविषयी खूप मोठ-मोठया गप्पा मारित होते आणि ते समोरच्या व्यक्तीच्या अगदीच सामान्य पूर्वजांविषयी तुच्छता दाखवीत होते.
घमेंडखोर गृहस्थाचे ते बोलणे दुसऱ्या गृहस्थाने प्रथम थोडया वेळ अतिशय शांतपणे ऐकून घेतले व नंतर त्यांना म्हणाले, “तुम्ही बोलत आहात ते अगदी खरे आहे, तुमचे खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील हे सर्वजण खूप थोर होऊन गेल्यामुळे, तुमचे घराणे हे थोर आहे, परंतु अशा त्या थोर घराण्यात जन्माला येऊन देखील तुम्ही मात्र अगदीच सामान्य आणि कर्तृत्वशून्य निघाले व त्यामुळे तुम्ही तुमच्या घराण्याच्या थोर परंपरेचा शेवट करून टाकला आहे.”
ते दुसरे गृहस्थ एवढे बोलून थांबले नाहीत तर पुढे अजून चिडून त्या गृहस्थांना म्हणाले, “याउलट माझे खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा आणि वडील हे सर्वजण अगदी सामान्य होऊन गेले आहेत त्यामुळे माझा जन्म जरी त्या अतिसामान्य असलेल्या घराण्यात झाला, तरी देखील मी भगीरथ प्रयत्नांनी शिक्षण घेऊन एका महाविद्यालयाचा प्राचार्य झालो, इतकेच नाही, तर मी अनेक मौल्यवान ग्रंथ लिहून, मोठ-मोठया विव्दानांच्या प्रशंसेला पात्र ठरलो आहे व यामुळे मी माझ्या कर्तृत्वाने माझ्या अतिशय सामान्य घराण्याला असामान्यता प्राप्त करून दिले आहे.
तेव्हा ‘नाव मोठे व लक्षण खोटे’ अशी तुमची अवस्था आहे आणि दिवस उगवला की तो कसातरी पुढे ढकलायचा एवढे काय ते तुम्हाला माहित असते म्हणून तुमच्यासारख्या अगदी सामान्य माणसाने, फक्त आपले पूर्वज मोठे म्हणून स्वतःला मोठे समजणे, हा निव्वळ मुर्खपणा नाही का? तेव्हा आता नुसते बोलणे बंद करा.”
दुसऱ्या गृहस्थाचे ते बोलणे ऐकून त्या घमेंडखोर माणसाचे डोळे खाडकन उघडले आणि त्यामुळे त्यांचे तोंड बंद झाले.
खरोखरच माणसाने फक्त व्यर्थ बडबड न करता काहीतरी करून दाखविले पाहिजे.