पांडवांवरील संकट | Pandvavaril Sankat Marathi Katha | Marathi Story

पांडवांवरील संकट | Pandvavaril Sankat Marathi Katha

एकदा धृतराष्ट्राने युधिष्ठिराला सांगितले की, “एकदा तुम्ही वारणावतला जा. तेथे खूप मोठी यात्रा भरते. तेथे गेल्यावर फार मोठे पुण्य मिळते.”

धुतराष्ट्राने खूप आग्रह केला म्हणून एक दिवस कुंती व पाच पांडव वारणावतला जायला निघाले. ते जायला निघाले तेव्हा विदुरकाकांनी युधिष्ठिराला त्यांच्या पुढे येणाऱ्या संकटाची कल्पना दिली व सांगितले, “तुम्ही सर्वजण सावध रहा, आणि रात्रंदिवस सावध रहा.

पांडव सर्व वारणावतला पोहोचले. तेथे त्यांच्यासाठी नवीन रंगकाम केलेले अतिशय सुंदर असे घर होते. तेथील थाटमाठ देखील चांगला होता. त्यांची तेथे उतरण्याची व्यवस्था देखील अतिशय उत्तम केलेली होती.

तेथे एक व्यवस्थापक होता. त्याचे नांव पुरोचन असे होते. त्याने पांडवाचा खूपच बडेजाव ठेवला. त्यांची खाण्यापिण्याची त्याने अतिशय चांगली व्यवस्था केली होती. त्याला दुर्योधनाने मुद्दामच नेमले होते

पांडव रहात असलेल्या घराच्या भिंती सन, सनकाडया, लाख कापूर व तेल इत्यादी पदार्थांपासून बनविलेल्या होत्या. त्या वस्तुंमुळे त्यांच्या घराला अतिशय धोका होता. ते घर मुद्दामच पटकन पेट घेईल असे बनविले होते. पांडवांना झोप लागल्यावर पुरोचनाचा ते घर पेटवण्याचा बेत होता. पण त्याला तशी संधी अजिबात मिळाली नाही. कारण पांडवांमधील सतत कोणीतरी जागा रहात असे. आणि तो पुरोचनावर पाळत ठेवी. युधिष्ठिराने देखील गुपचुप त्या घरातून बाहेर नेणारे एक गुप्त असे भुयार बनवून घेतले होते.

एका रात्री पांडवांनीच डाव आखला.

पुरोचन गाढ झोपला होता. कुंती व चार भाऊ हळूच भुयारात शिरले. भीमाने एका खोलीली आग लावली आणि तोही त्यांच्या पाठोपाठ आला.

पुरोचन गाढ झोपला होता. ते घर चारीही बाजूंनी पेटले होते. त्यात पुरोचन जळून मरण पावला. तेथे एक भिल्लीण तिच्या पाच तरूण मुलांसह पडवीत येऊन झोपली होती. त्यांचा देखील त्या आगीत जळून मृत्यू झाला.

लगेचच दुसऱ्या दिवशी बातमी पसरली की, “कुंती व पांडव आगीत जळून मेले.”

ती बातमी ऐकून सर्व लोकांना अत्यंत वाईट वाटले. त्यांनी फार शोक केला. ते बघून मुद्दाम दुर्योधन, कर्ण, शकुनीमामा, धृतराष्ट्र इत्यादींनी दुःख झाल्याचे नाटक केले.

यानंतर कुंती व तिचे पाच पुत्र भुयारातून बाहेर पडले. तेथे खूप घनदाट जंगल होते. त्यांच्या मार्गात अनेक झाडाच्या फांद्या येत होत्या. भीम पुढे येऊन त्या बाजूला करून मार्ग काढीत होता. पुढे वाघ-सिंह आले, त्यांना देखील त्याने एकाच दणक्यात ठार मारले. भीमाने हिडिंब नावाच्या राक्षसाला देखील ठार मारले. जर कुंती, नकुल, सहदेव थकले तर तो त्यांना स्वतःच्या खांद्यावर घेत असे.

Leave a Comment

x