पुरंदर जिंकला | Purandar killa Marathi Katha | Marathi Story

पुरंदर जिंकला | Purandar killa Marathi Katha

शिवरायांनी मनाशी पक्का निर्धार केला होता की, श्रींच्या इच्छेने स्थापन केलेले स्वराज्य हे टिकवायचेच. फत्तेखानाचा पराभव करायचा त्यासाठी राजांनी आपल्या डावपेचांना सुरूवात केली. फौजांना त्यांनी सज्ज राहण्यास सांगितले. त्यांनी मोगल बादशहाकडे आपला एक वकील पत्र देऊन पाठविला.

राजांच्या फौजेतील सर्व मावळयांनी गडावरील देवीचे दर्शन घेतले. माँसाहेबांचा आशीर्वाद घेतला व फौज निघाली. वाऱ्यावर भगवा फडकत होता. राजांच्या बरोबर जिवाला जीव देणारे अनेक शूर असे मावळे होते. राजांनी हात उंचावून गर्जना केली, ‘जय भवानी’ त्याबरोबर सर्वांनीच ‘जय भवानी’ अशी गर्जना केली.

राजांचे मावळे पुरंदरच्या दिशेने निघाले. पुरंदरचे किल्लेदार नीळकंठ सरनाईक हे होते. आता त्यांचे वय झाले होते परंतु तरीदेखील त्यांनी तलवार चालविणे सोडले नव्हते. त्यांचे पूर्ण आयुष्य सुलतानाची, बादशहाची चाकरी करण्यात गेली होती. असे हे वयोवृद्ध सरनाईक शहाजी राजांचे जिवलग मित्र होते. आपल्या मित्राचा हुशार व बहादूर मुलगा शिवबा यांचे त्यांना फारच कौतुक होते. एवढया कमी वयात स्वराज्य स्थापणारा हा मुलगा स्वतःच्या कर्तृत्वाने फार मोठा होणार असे त्यांना मनापासून वाटत होते.

शिवरायांची फौज पुरंदरकडे चालली होती. तेव्हा राजांनी स्वतः शेतकऱ्याचा वेष केला आणि ते नीळकंठरावांना भेटले. राजांनी त्यांना काय घडले, परिस्थिती कशी आहे, हे सर्व सांगितले. यावेळेस आम्हाला मदत करा असे सांगितले. आपली फौज पुरंदरावर ठेवून दिली तर आम्ही त्या फत्तेखानाला पळवून लावू असा विश्वास दिला.

शिवरायांचे बोलणे नीळकंठरावांना पटले. बादशहाची सेवा करण्यात पूर्ण आयुष्य गेले मग आयुष्याच्या शेवटी जर स्वराज्याची काही सेवा करता आली तर निदान आपल्या जीवनाचे सार्थक होईल, असा विचार करून नीलकंठरावांनी गड शिवरायांकडे सोपविला व ते म्हणाले, “तुम्ही लवकर जा आणि आपली फौज गडावर घेऊन या. उशीर करू नका. मी गडाचे दरवाजे उघडून ठेवतो. हे करताना माझ्या जिवाचे काही बरे-वाईट झाले तरी मला त्याची पर्वा नाही.”

शिवरायांनी आपली फौज लगेचच पुरंदरावर नेली. तेथे जाताच राजांनी गडाची पाहणी करून लढाईच्या दृष्टीने गड सज्ज करण्यास सुरूवात केली. बुरूजावर तोफा चढू लागल्या, दारूगोळयाचे पेटारे माचीवर नेण्यात आले. गस्त सुरू झाली. शिवराय स्वतः फिरून सर्व व्यवस्था पाहात होते.

शिवरायांच्या एका हेराने बातमी आणली की, सरदार फत्तेखान मोठी फौज घेऊन विजापुराहून निघून बेलसरपर्यंत आला आहे आणि शिवाय त्याने सरदार बाळाजी हैबतरावाला पुरेशी फौज, दाणागोटा, भरपूर हत्यारे व मोठा खजिना बरोबर देऊन शिरवळकडे सुभानमंगळ किल्ला व ठाणे काबीज करण्यासाठी पाठवले आहे. हि माहिती शिवरायांना कळताच त्यांनी एका मावळयाला बोलवून सांगितले, “तू ताबोडतोब शिरवळच्या आपल्या ठाणेदाराकडे आणि सुभानमंगळ किल्ल्याच्या किल्लेदाराकडे जा आणि आमचा निरोप सांग. सरदार बाळाजी हैबतराव ठाणे आणि किल्ला घेण्यास निघाला आहे. जर तो आलाच, तर ठाणे आणि गड खुशाल त्याच्या ताब्यात देऊन टाका व तेथून निघा आणि जवळच्याच रानात आमचा पुढील निरोप येईपर्यंत लपून राहा.”

मावळा लगेच तो निरोप घेऊन निघून गेला. राजांनी सरळ सरळ ठाणे आणि किल्ला शत्रूच्या हवाली कसा करण्यास सांगितला, असा प्रश्न नीळकंठरावांनी शिवरायांना विचारला. तेव्हा राजे त्यांना म्हणाले, “हे बघा नीळकंठजीकाका, जेव्हा फत्तेखानाला कळेल की मी पुरंदर ताब्यात घेतला आहे, तेव्हा तो इकडेच चालून येईल व त्याच्याशी लढाई होईल ती येथेच. ही लढाई किती दिवस चालेल ते काही आत्ता सांगता येणार नाही. तेव्हा आपल्या या गडावर पुरेसा दाणागोटा, हत्यारे यांचा साठा असायला हवा. तसेच भरपूर धन हवे. तो आदिलशाही सरदार हैबतराव शस्त्रास्त्रे व खजिना आयताच घेऊन आपल्याकडे येत आहे तर त्याला आपण कशासाठी अडवायचे? तो आल्यावर जर त्याला लढाई न करताच शिरवळचे ठाणे आणि सुभानमंगळ किल्ला मिळाला तर तो खुश होईल. मराठे आपल्याला घाबरून पळाले असे त्याला वाटून तो बेसावध राहिल; खजिना, दाणागोटा, हत्यारे किल्ल्यात भरून ठेवील. तो असा बेसावध असतानाच आपण त्याच्यावर हल्ला करू. आमची खात्री आहे की आपलाच विजय होईल आणि मग काय त्याचा खजिना, हत्यारे सर्व काही आयतेच आपल्या ताब्यात येईल. ते सर्व आणून हया किल्ल्यात ठेवून देऊ. शत्रूच्याच हत्याराने त्याचाच बळी घेऊन मिळविलेला विजय यासारखे दुसरे समाधान नाही.”

शिवरायांची ही दूरदृष्टी बघून नीळकंठराव खूपच चकित झाले. शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी शिवराय प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होते. तेवढयात त्यांना समजले की, बाळाजी हैबतरावाने सुभानमंगळ आणि शिरवळचे ठाणे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्यात सर्व सरंजाम भरला आहे. ते ऐकून शिवरायांनी त्वरीत आपल्या शूर सरदारांना बोलवून सांगितले की, “येथून पाचशे घोडेस्वार बरोबर घेऊन शिरवळ ठाणे आणि सुभानमंगळ किल्ला येथून पळ काढून आपल्या रानात लपून बसलेल्या सैनिकांना बरोबर घ्या व शिरवळ ठाणे आणि सुभानमंगळ किल्ल्यात शिरून शत्रूला पराजित करून चांगला धडा शिकवा. तसेच बाळाजी हैबतरावाची मान कापा. ठाणे आणि किल्ला आपल्या ताब्यात आल्यावर तेथील धन आणि हत्यारे घ्या व थोडी फौज तेथे ठेवून सर्व ऐवज घेऊन इकडे या.”

शिवरायांची आज्ञा ऐकताच स्वराज्यासाठी प्राण देखील देण्यास तयार असणारे मावळे सैनिक आपल्या लपून बसलेल्या सैनिकांना बरोबर घेऊन ‘हर, हर महादेव’ अशी गर्जना करीत निघाले. त्यांचा आवाज ऐकून हैबतरावाला वाटले की, हे शेंदाड शिपाई आलेले दिसतात. त्या रानटी पोरांना लढाईत काय कळतंय? म्हणून तो सैनिकांना म्हणाला, “ही पोर आपल्याला पाहून काल पळाली. आता त्यांना जागेवरच गार करा. कोणालाही पळण्याची संधी देऊ नका.”

शिवरायांची फौज किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी आली व इशारा मिळताच फौजेने मोठे दगड दरवाज्यावर मारायला सुरूवात केली. त्यामुळे तो भक्कम दरवाजा मोडला व त्याबरोबर राजांची सर्व फौज किल्ल्यात घुसली आणि त्यांनी आदिलशाही फौजेला कापून काढण्यास सुरूवात केली. काही वेळातच त्यांचे भरपूर सैन्य कापले गेले. हे बघताच उरलेल्या फौजेचा धीर खचला व ते माघार घेऊ लागले.

शिवरायांचे विश्वासू कावजी मल्हार हे बाळाजी हैबतरावांसमोर आले व त्यांना म्हणाले, “तूच ना तो गद्दार, ज्याने कपटाने जिंजीला शहाजीराजांच्या छावणीत घुसून त्यांना झोपेतच हाता-पायात बेडया घातल्यास. आता बघ मी तुला वर पाठवितो.”
असे बोलून कावजी मल्हार यांनी आपल्या हातातील अतिशय टोकदार फाळ बाळाजी हैबतरावांच्या दिशेने फेकला व हैबतराव जागीच ठार झाले. हे बघून आदिशहाचे अशफरशाह व फाजलशाह हे सरदार देखील पळून गेले व इतर फौजफाटाही पळून गेला.

किल्ल्यामध्ये गंडगंज संपत्ती, हत्यारे, दारूगोळा मावळयांच्या हाती पडला. त्यानंतर थोडी शिंबदी गडाच्या रक्षणासाठी ठेवून सर्व मावळे सैनिक पुरंदर गडाकडे परत आले.

सर्व विजयी मराठे वीर ‘फत्ते! फत्ते! अशी गर्जना करीतच पुरंदर गडावर पोहोचले. गडावर आल्यावर शिवरायांनी त्यांना पाठ थोपटून शाबासकी दिली तेव्हा ती थाप पाठीवर पडताच सर्व मावळयांना खूप समाधान वाटले.

Leave a Comment

x