राजा परिक्षितीचा शाप | Raja Parikshiticha Shap Marathi Katha | Marathi Story

राजा परिक्षितीचा शाप | Raja Parikshiticha Shap Marathi Katha

Raja Parikshiticha Shap Marathi Katha: कौशिकी नदीच्या तीरावर अत्यंत रमणीय अशा निसर्गसुंदर ठिकाणी शमीक ऋषींचा आश्रम होता. शमीक ऋषी महान तपस्वी आणि परोपकारी वृत्तीचे होते. अनेक ऋषिकुमार त्यांच्याकडे वेदाध्ययनासाठी राहात होते. शमीक ऋषींचा मुलगा शृंगी हाही त्या ऋषिकुमारांतच व्रतस्थ राहून अध्ययन करीत होता.

एके दिवशी ते सर्व ऋषिकुमार त्या उपवनात होमासाठी समिधा आणण्यास गेले होते. त्यांच्या बरोबर शृंगीही गेला होता. शमीक ऋषी मात्र ध्यान-धारणेत मग्न होऊन आश्रमातच बसले होते. डोळे मिटून ब्रह्मसुखाचा अनुभव घेत शमीक ऋषी समाधी लावून बसलेले! त्यांना बाह्य जगाचा अगदी विसर पडलेला ! अशा वेळी आश्रमात कोण आले, कोण गेले याचा त्यांना काय पत्ता असणार ! दुपारची वेळ होती. कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती. परिक्षिती राजा शिकारीसाठी अरण्यात फिरत होता. तो अगदी थकून गेला होता. तहानेने तो व्याकुळ झाला होता.त्याला विश्रांतीची आवश्यकता होती. फिरत फिरत राजा परिक्षिती त्या शमीक ऋषींच्या आश्रमात आला. या ठिकाणी आपणांस पाणी मिळेल, आपली तृष्णा शांत होईल, क्षणभर विसावा घडेल आणि तपोनिधी शमीक ऋषींचा सहवास घडेल; या आशेने परिक्षिती त्या आश्रमात शिरला. पण तेथे सर्वत्र सामसूम होती. राजाचे स्वागत करण्यास कोणीच आले नाही. राजाला आश्चर्य वाटले. तथापि तहानेने तो व्याकुळ झाला होता. तो आश्रमात पाणी शोधू लागला. तोच समोर स्वत: शमीक ऋषी बसलेले त्याला दिसले. त्याला आनंद झाला. त्याने ऋषींना वंदन केले आणि नम्रपणे तो म्हणाला, “मुनिवर्य, मला खूप तहान लागली आहे. पाणी द्यावं प्यायला !”

मुनिवर्य डोळे मिटून ध्यानमग्न झाले होते. ते त्या राजाशी काय बोलणार? राजाने दोन-तीन वेळा त्यांना हाक मारली. पण छे! एक ना दोन! राजाला वाटले की, “ऋषीने हे मुद्दाम ढोंग केलेले आहे! मुद्दाम आपला अपमान करण्यासाठी ऋषीने मौन धारण केले आहे! ठीक आहे, मीही या ढोंगी ऋषीचा अपमान करीन! तहानेने व्याकुळ झालेला तो राजा त्या अपमानामुळे अधिकच संतापला. त्याला विचारच राहिला नाही. पाय आपटीतच तो आश्रमाबाहेर आला. <br><br>रागाने तो तणतणत होता. इतक्यात एका झाडाखाली मेलेला एक सर्प राजाच्या दृष्टीस पडला. राजाने तो सर्प धनुष्याच्या टोकाने उचलला आणि परत आश्रमात जाऊन ऋषीच्या गळ्यात घातला. परिक्षितीराजा आश्रमातून जाताना एक दोन ऋषिकुमारांनी दुरून पाहिला. त्यांनी शृंगीला ती वार्ता सांगितली. तेव्हा शृंगी म्हणाला, “मित्रांनो, आता आपण आश्रमात जाऊ या! पिताजी ध्यानमग्न आहेत. आलेल्या राजाचं स्वागत आपण केलं पाहिजे!” झपाझप पावले टाकीत निघून चाललेल्या राजाला त्या ऋषिकुमारांनी हाका मारल्या. पण छे! राजा परत आलाच नाही! नंतर शृंगीसह ते ऋषिकुमार त्या आश्रमात आले आणि पाहतात तो काय! ध्यानमग्न असलेल्या शमीक ऋषींच्या गळ्यात मेलेला सर्प घातलेला.

आपल्या पित्याची विटंबना त्या राजाने केलेली पाहून शृंगीला खूपच राग आला. संतापाने लाल होऊन त्याने शाप दिला, “ऋषिमुनींची अशी अवहेलना करणार्‍या त्या नराधम परिक्षिती राजाला आजपासून सातव्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू येईल! नागराज तक्षक स्वत: येऊन परिक्षितीराजाला दंश करील!” शृंगीने होमशाळेतील कमंडलूमधून पाणी घेतले आणि ते भूमीवर टाकून ही शापवाणी उच्चारली, तेव्हा सर्व ऋषिकुमार भयभीत झाले. शमीक ऋषींच्या गळ्यातील तो मृतसर्प त्या ऋषिकुमारांनी काढून टाकला. अंगावरील मुंग्याही त्यांनी झटकून काढल्या. इतक्यात शमीक ऋषींची समाधी उतरली आणि त्यांनी डोळे उघडून त्या कुमारांकडे पाहिले. ते सर्व ऋषिकुमार भयभीत झाले होते. शृंगी संतापाने लाल होऊन थरथरत होता. ते पाहून शमीक ऋषींनी विचारले, “बाळांनो, हा काय प्रकार आहे? हा मृतसर्प कसला? या मुंग्या…..? आणि तुम्ही सर्वजण हे असे…..?

नंतर शृंगीने झालेली सर्व हकीगत आपल्या पित्याला सांगितली. ती ऐकून शमीक ऋषी शांतपणे म्हणाले, “बाळा, परिक्षिती राजाने केलेल्या या क्षुल्लक अपराधाबद्दल तू त्याला सर्पदंशाने मृत्यू येण्याचा जो भयंकर शाप दिलास हे कृत्य वाईट केलेस! अरे, राजा हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असतो. तो पृथ्वीचे-प्रजेचे पालन करतो, तो आपल्या या आश्रमात आला होता. पण त्याचा सत्कार करण्याचे पुण्य आपणांस लाभले नाही! त्याचे आदरातिथ्य येथे न झाल्यामुळेच तो रागावला असेल आणि म्हणूनच अविचाराने त्याने हे असे क्षुल्लक अपराधाचे कार्य केले असेल! त्याच्या अपराधाबद्दल क्षमा करण्याचे सोडून त्याला शापाने मृत्यूची शिक्षा देणे, हे आपणासारख्या ब्रह्मनिष्ठांना शोभत नाही! शृंगीबाळा, तू अद्यापही अज्ञानीच राहिला आहेस! `दिधले दु:ख पराने उसने फेडू नयेचि सोसावे’ यातच आपला मोठेपणा आहे! आता तरी तू भगवंताला शरण जा आणि आपल्या अपराधाबद्दल त्याची क्षमा माग!”

शमीक ऋषींच्या आश्रमातून गेल्यावर परिक्षिती राजा वेगाने आपल्या राजधानीत पोचला. विश्र्रांती घेतल्यानंतर तो विचार करू लागला. तेव्हा आपण केलेल्या अविचाराबद्दल त्याला आता पश्चाताप वाटू लागला! थोड्याच वेळात शमीक ऋषींचा एक शिष्य परिक्षिती राजाकडे आला आणि नम्रपणे म्हणाला, “राजा, ब्रह्मसमाधीत मग्न असलेल्या शमीक ऋषींकडून आपलं यथोचित स्वागत झालं नाही. याबद्दल त्यांना आता हळहळ वाटत आहे. पण आपण त्या ठिकाणी अविचारानं मृतसर्प त्यांच्या गळ्यात घालण्याचं जे कृत्य केलं, त्याबद्दल त्यांच्या तपोनिष्ठ-पुत्राने म्हणजे शृंगीने आपणास आजपासून सातवे दिवशी सर्पदंशाने मृत्यू येण्याचा शाप दिलेला आहे. तो शाप खोटा होणार नाही, तरी तुम्ही तोपर्यंत पुण्यकृत्ये करुन ईशचिंतनात काळ घालवावा! त्या थोर क्षमाशील शमीऋषींनी मला हा निरोप तुम्हाला सांगायला मुद्दाम पाठविलं आहे! तुम्हांला या शापवाणीपासून अज्ञानात ठेवू नये म्हणून त्यांनी हा निरोप पाठविला आहे. राजा, सावध राहून मोक्षसाधना कर!”

शमीक ऋषींचा तो निरोप ऐकून राजाला समाधान वाटले. आपल्या हातून घडलेल्या अपराधाचे योग्य शासन आपणांस मिळणार याबद्दल त्याला आनंद झाला! नंतर तो परिक्षिती राजा गंगातिरी जाऊन राहिला. तेथे व्यासपुत्र शुकमुनींची स्वारी आली. त्यांनी परिक्षिती राजाला त्या सात दिवसांत “भागवत” सांगितले आणि त्यायोगे तो पुण्याकारक भागवतसप्ताह सगळ्या लोकांना श्रवण करण्याचे श्रेय लाभले. परिक्षिती राजाने योजलेल्या त्या भागवत सप्ताहाची वार्ता ऐकून क्षमाशील शमीक ऋषींना आनंद झाला. तेही त्याचे अभीष्टचिंतन करण्यात आणि भगवंताची क्षमायाचना करण्यात आपला काळ घालवू लागले!

मित्रांनो तुम्हाला Raja Parikshiticha Shap Marathi Katha हि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Leave a Comment

x