साधू आणि जिज्ञासू तरुण | Sadhu aani Jidnyasu Tarun Marathi Katha
Sadhu aani Jidnyasu Tarun Marathi Katha: ‘एका साधूकडे एक जिज्ञासू तरुण गेला आणि त्याने त्याला विचारले, ‘‘महाराज मुक्ती मिळण्यासाठी वनात जायला हवे का ?’’ साधू म्हणाला, ‘‘असे कोण म्हणतो ? तसे असते, तर जनक राजाला राजवैभवात राहूनही जी मुक्ती मिळाली, ती मिळाली असती का ?’’ साधूचे हे उत्तर ऐकून तो जिज्ञासू तरुण निघून गेला.थोड्या वेळात दुसरा एक जिज्ञासू त्या साधूकडे आला.
त्याने त्याला तोच प्रश्न विचारला, ‘‘योगीराज, मुक्ती मिळवण्यासाठी घरादाराचा त्याग करून वनातच तपश्चर्येला गेले पाहिजे का ?’’ यावर तो साधू म्हणाला, ‘‘अर्थातच ! नाहीतर घरादाराचा त्याग करून शुक-सनकादी सारखे मोठमोठे साधक मुक्तीसाठी वनात गेले, ते काय मूर्ख होते ? ’’एकाच प्रश्नाला त्या साधूने दिलेली परस्पर विरोधी अशी उत्तरे ऐकून त्या साधूच्या सहवासात रहाणारा त्याचा शिष्य गोंधळात पडला.
तो दुसरा तरुण तेथून निघून जाताच त्या शिष्याने त्या साधूला विचारले, ‘‘गुरुदेव, आपल्याकडे एका पाठोपाठ एक आलेल्या त्या दोन साधकांचा प्रश्न एकच असतांना आपण त्यांना परस्परविरोधी अशी दोन उत्तरे का दिलीत ? त्यातले सत्य उत्तर कोणते समजायचे ?’’ यावर तो साधू म्हणाला, ‘‘बाळ, मी दिलेली दोन्ही उत्तरे सत्य आहेत.
माझ्याकडे जो पहिला प्रश्नार्थी आला होता तो एकीकडे प्रपंच करता करता जीवनमुक्तीसाठी आवश्यक असलेली साधना करू शकेल, अशा कुवतीचा होता; पण नंतर जो तरुण आला त्याला घरात राहून जीवनमुक्तीसाठी करावी लागणारी आवश्यक ती साधना करणे कठीण गेले असते; म्हणून मी त्या त्या प्रमाणे उदाहरणे देऊन त्यांना पटवून दिले.’
मित्रांनो तुम्हाला Sadhu aani Jidnyasu Tarun Marathi Katha हि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.