समाधिस्त येथें बैसले ज्ञानेश | Samadhistha Yethe Marathi Lyrics
गीत -आ. रा. देशपांडे ‘अनिल’
संगीत – आनंद मोडक
स्वर- रवींद्र साठे
थरारून येई रोमांच शरीरी
झळक इथें ही अशी कांही न्यारी
प्रकाशा दिपवी असा हा प्रकाश
समाधिस्त येथें बैसले ज्ञानेश !
जीवनाचा अंत होऊनियां खालीं
पडे देह तैसा इथें नाही खालीं
इथें रोमरोमीं जीव मूर्तिमंत
धरुनी विसांवे चैतन्य अनंत
प्रसादास येथें मिळत प्रसाद
पडसाद ऐके मुळांतली साद
प्रतीतीस होत प्रतीत प्रतीती
आणि स्फूर्तिलागीं येत असे स्फूर्ति
एका जनदिनी मिळाले भांडार
ऐकुनियां आला कुणी हा पामर
नसे संत कोणी भाविक ना भक्त
असे जीव मात्र जीवनी आसक्त
तळमळ कांही धरूनिया पोटी
मिटलेल्या ओठी रिकाम्याच ताटीं
तयावरतीहि कांही कृपा करा
उघडा थोडीसी ताटी ज्ञानेश्वरा !
तुमच्या स्मरणें उचंबळे मन
तुमच्या वाणींचे करीत चिंतन
तुमच्या चरणीं मस्तक ठेविलें
उचलावयाचे भान ना राहिले !