संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचा भडका | Samyukta Maharashtra movement in Marathi
(१) जेव्हा एखाद्या प्रश्नी सामान्य जनतेच्या भावना अत्यंत उद्दीपित झालेल्या असतात तेव्हा राज्यकत्यांनी परिस्थिती खूपच संयमाने हाताळावी अशी अपेक्षा असते.
(२) मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात पोलिसी बळाचा अवाजवी वापर करण्याचा मार्ग अवलंबिला होता.
(३) मुंबई प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने महाराष्ट्रा-बाबतची आपली भूमिका विशद करण्यासाठी २० नोव्हेंबर, १९५५ रोजी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर एक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत भाषण करताना मोरारजींनी मुंबई महाराष्ट्राला कधीही मिळणार नाही असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण अधिकच प्रक्षुब्ध बनले.
(४) संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर प्राणहानी होण्यास मोरारजी देसाई यांची एकाधिकारशाही वृत्ती व हेकेखोर स्वभाव या गोष्टीही कारणीभूत झाल्या होत्या.
(५) त्रिराज्य योजनेच्या विरोधात मराठी जनतेने संघर्षाचा पवित्रा घेतल्यावर संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची तीव्रता अधिकच वाढली. लोक निरनिराळ्या मार्गांनी आपला असंतोष व्यक्त करू लागले.
मुंबई महाराष्ट्राचीच!
(१) महाराष्ट्रातील जनता संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीवर ठाम असतानाच विनाशकाले विपरीत बुद्धी या न्यायाने मुंबई शहर केंद्रशासित प्रदेश बनविण्याचा विचार पुढे आला.
(२) १६ जानेवारी, १९५६ रोजी पंतप्रधान पंडित नेहरूंनी केंद्रशासित मुंबई संबंधी घोषणा केली. या निर्णयाने मराठी जनता भडकून उठेल या धास्तीने मोरारजी देसाई यांच्या सरकारने खबरदारीची उपाययोजना करण्याचे ठरविले.
(३) महाराष्ट्रातील विरोधी पक्षांच्या भाई डांगे, क्रांतिसिंह नाना पाटील अशा तेरा प्रमुख नेत्यांना पोलिसांनी १६ जानेवारीच्या पहाटेच प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली अटक केली. याशिवाय मुंबईतील विरोधी पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली.
(४) केंद्रशासित मुंबईची घोषणा आणि राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांना स्थानबद्ध करण्यासंबंधीची आततायी कृती यामुळे मुंबई शहरात दंगलींना सुरुवात झाली. त्यानंतरच्या सात दिवसांत निदर्शने, संप, हरताळ, लाठीमार, गोळीबार इत्यादी प्रकारांनी मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विसकळीत झाले.
(५) इ. स. १९५६ च्या जानेवारी महिन्यात मुंबई शहरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ८० हून अधिक लोक ठार झाले. मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी दिसताक्षणी गोळी घालण्याचा आदेश पोलिसांना दिला होता; त्यामुळे या काळात अनेक निरपराध माणसेही मारली गेली. आचार्य अत्रे यांनी तर संतापाने मोरारजी देसाई यांची ‘नरराक्षस‘ अशी संभावना केली.
(६) महाराष्ट्राच्या संदर्भात सर्वप्रथम विदर्भ वगळून महाराष्ट्र व गुजरातच्या द्वैभाषिक राज्याची योजना, त्यानंतर त्रिराज्य योजना, पुढे मुंबई केंद्रशासित करण्याची योजना आणि अखेरीस विशाल द्वैभाषिक राज्याचा पर्याय असे वेगवेगळे पर्याय सुचविण्यामागे मुंबई एकट्या महाराष्ट्राला मिळू द्यायची नाही, हाच काँग्रेसश्रेष्ठींचा डाव होता.
(७) वास्तविक पाहता ऐतिहासिक, भौगोलिक व सांस्कृतिकदृष्ट्या मुंबई शहरावर एकट्या महाराष्ट्राचाच हक्क शाबीत होतो. जुन्या काळात मुंबई हे मराठी भाषिक कोळी लोकांचे एक लहानसे खेडे होते. मुंबईच्या पश्चिमेला अरबी समुद्र असून बाकीच्या तिन्ही बाजूंनी तिला मराठी भाषिक प्रदेशांनी वेढले आहे. साहजिकच, मुंबईवर महाराष्ट्राचाच हक्क होता आणि आहे.
(८) मुंबई शहराचा महाराष्ट्रात समावेश करण्यास काँग्रेस- श्रेष्ठींनी विरोध करण्याचे कारण असे की, मुंबईत आपले आर्थिक साम्राज्य निर्माण केलेले भांडवलदार व मोठे व्यापारी तसेच लहान-मोठे व्यावसायिक या सर्वांना अशी भीती वाटत होती की, मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाल्यास आपल्या आर्थिक हितसंबंधांना धोका उत्पन्न होईल. या वर्गात बिगर मराठी व्यक्तींचाच जास्त भरणा होता. त्यांना महाराष्ट्राविषयी कसलेही प्रेम नव्हते. उलट मराठी लोकांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन पूर्वग्रहदूषित असाच होता, तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळण्यास त्यांनी विरोध करावा, हे अपेक्षितच होते.
नेत्यांचे बोटचेपे धोरण
(१) संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आपल्या स्वाभिमानशून्य, कबखाऊ व संधिसाधू वृत्तीचेच प्रदर्शन घडविले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या विरोधात ठामपणे उभे राहण्याची गोष्ट तर बाजूलाच राहिली; पण त्या नेतृत्वापुढे महाराष्ट्राची बाजू समर्थपणे मांडण्याचे कामही त्यांना करता आले नाही.
(२) शंकरराव देव हे संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष होते; पण संयुक्त महाराष्ट्रास काँग्रेसश्रेष्ठींचा विरोध आहे, हे पाहताच त्यांनी ऐन मोक्याच्या क्षणी या लढ्यातून पळ काढला.
(३) महाराष्ट्र काँग्रेसच्या अन्य नेत्यांचे वर्तनही यापेक्षा वेगळे नव्हते. भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ इत्यादी नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीस सुरुवातीला जोरदार पाठिंबा दर्शविला होता. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रसंगी लढा देण्याची भाषाही त्यांनी केली होती. परंतु काँग्रेस श्रेष्ठींच्या इशाऱ्यानुसार त्यांनी देखील चळवळीतून ऐन वेळी माघार घेतली.
हे देखील वाचा