सत्यकाम जाबाल | Marathi Katha | Marathi Story

फार प्राचीन काळी उत्तर हिंदुस्थानात जबाला नावाची एक गरीब मोलकरीण राहात असे. तिला सत्यकाम नावाचा एक लहान मुलगा होता. दिवसभर काबाडकष्ट करून जबाला आपले व आपल्या आवडत्या मुलाचे पोट भरत असे.

जबाला गरीब असूनही फार प्रामाणिक होती. आपल्या मुलालाही नेहमी खरे बोलण्यास तिने शिकवले होते. त्याचे नावही तिने सत्यकाम (सत्याची आवड असणारा) असे ठेवले होते. सत्यकामाशिवाय जबालेला कोणीही नव्हते. सत्यकाम दिसला, की सर्व गोष्ट ती क्षणात विसरून जाई. त्या वेळी मुलांना शिकण्यासाठी दूर अरण्यात एखाद्या ऋषीजवळ पाठवीत असत. मुलाच्या आठव्या वर्षापासून वीस वर्षांपर्यंत त्याला गुरुजवळ राहावे लागे. तेथे तो हरएक कामात हुशार होई.

सत्यकाम आठ वर्षांचा होताच आईला म्हणाला, `आई, मी आता जातो अरण्यात शिकायला.’ सत्यकामाला शिकायची फार हौस होती. जबाला विचारात पडली. छोट्या सत्यकामाला इतक्या लांब ठेवायचे? तिच्या डोळ्यांसमोर अरण्य उभे राहिले आणि सत्यकामाशिवाय सुनेसुने दिसणारे तिचे घरही तिला दिसू लागले. दुसरी एक कल्पना मनात आल्यावर तर तिच्या डोळ्यात अश्रूच आले. ती एक दासी होती. तिला ना जात ना गोत ! त्या काळी उच्च कुळातील मुलेच गुरूपाशी शिकत. सत्यकामाच्या बापाचे तर तिला नावही ठाऊक नव्हते. असल्या पोराला कोणता गुरू जवळ करणार !
सत्यकाम म्हणाला, `आई, पण गुरुजी माझे सबंध गोत्र विचारतील ना? काय ग माझं गोत्र?’

जबला अश्रू गाळीत म्हणाली, `बाळ सत्यकामा, मी तरुण असताना निरनिराळ्या घरी दासी म्हणून नोकरी करीत हिंडत असे. त्यातच केव्हा तरी तुझा जन्म झाला. तू दासीपुत्र आहेस. तुझ्या पित्याचे नावही मला माहीत नाही. माझे नाव जबाला, म्हणून तुझे नाव सत्यकाम जाबाल असेच गुरुजींना सांग.’

नंतर सत्यकाम गुरूच्या शोधाकरिता अरण्यात हिंडत असता गौतम ऋषींच्या आश्रमात आला. त्या वेळी गौतमांपाशी अनेक राजपुत्र आणि ब्राह्मणकुमार शिकण्यास होते. सत्यकाम भीतभीतच आश्रमात शिरला. नुकतेच स्नान आटोपून भस्म लावलेले आणि लांबसडक केस पाठीवर मोकळे सोडलेले असे अनेक तेजस्वी कुमार वेदपठण करीत होते. गौतमांची शांत मूर्ती ध्यानमग्न अशी बसलेली होती. सत्यकाम भीतभीत पुढे आला.

एक दरिद्री पोर आश्रमात घुसून थेट गुरुजींच्या जवळ जातो आहे हे पाहून शिष्यांत कुजबुज होऊ लागली. `अरे, बघशील तर ते ध्यान !’ असे हेटाळणीचे शब्दही सत्यकामाच्या कानी आले. इतक्यात गौतमांनी आपले डोळे उघडले आणि शांतपणे सगळीकडे नजर फिरविली. एका क्षणात जिकडे तिकडे शांत झाले.

गौतम मृदु स्वराने म्हणाले, `काय पाहिजे तुला बाळ?’ सत्यकाम खाली पाहात हळूच म्हणाला, `भगवन्, मला आपणांजवळ शिकायचे आहे.’

गौतम कौतुकाने म्हणाले, उत्तम आहे, बाळ; पण तुझे गोत्र काय? सत्यकाम मान खाली घालून म्हणाला, `भगवन्, माझे नाव सत्यकाम. आईचे नाव जबाला. म्हणून मी सत्यकाम जाबाल. ह्यापेक्षा जास्त मला ठाऊक नाही.’ असे म्हणून सत्यकामाने आईने सांगितल्याप्रमाणे सर्व सांगितले.

शिष्यसमुदायात गुपचुप एक हेटाळणीची लाट उसळून गेली. पुन्हा गौतमांची नजर सगळीकडे फिरली.

गौतम म्हणाले, `बाळा, सत्यकामा, तू इतके खरं बोललास हेच पुरे आहे. दासीपुत्र असलास तरी तू ब्राह्मणच असला पाहिजेस. जो खरे बोलतो त्याला मी ब्राह्मणच समजतो.’

नंतर गौतमांनी सत्यकामाचे मौंजीबंधन केले. त्याला शिकविण्याच्या अगोदर (आपल्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणे) परीक्षा पाहण्यासाठी गाौतमांनी चारशे गायी त्याच्या स्वाधीन केल्या व ह्यांना अरण्यात चरण्यास घेऊन जा असे सांगितले. असल्या कामात शिष्याची बुध्दी किती आहे हे दिसून येत असे.<br><br>

त्या गायी अगदी वाळकुट्या होत्या. शिष्यांनी त्यांची चांगली काळजी घेतली नसावी. त्यांचे सारे लक्ष वेद घोकण्यात होते. सत्यकाम म्हणाला, ह्या चारशेच्या हजार गायी होतील तेव्हाच मी परत येईन.’ सत्यकाम अरण्यामध्ये पुष्कळ वर्षे राहिला. तो गायीची मनोभावाने सेवा करी. एके दिवशी त्याच्यासमोर त्याच्या खिल्लारातील एक बैल आला. त्याच्या अंगात वायुदेव (वारा) शिरला होता व तो शेपूट उंचावून शिंगांनी जमीन उकरीत सैरावैरा धावत होता.

बैल मनुष्यवाणीने म्हणाला, `सत्यकामा !’

सत्यकामाने हा चमत्कार पाहिल्यावर भक्तीने तो म्हणाला, `काय भगवन् !’

बैल पुन्हा म्हणाला, `आमची संख्या आता हजारावर आली आहे; आम्हाला आता आचार्यांकडे नेऊन पोचव. त्यापूर्वी मी तुला थोडे ज्ञान देतो. तुझ्या सेवेने मी फार संतुष्ट झालो आहे.’

बैलाच्या रूपाने तो प्रत्यक्ष वायुदेवच बोलत होता. त्याने सत्यकामाला ईश्वर म्हणजे काय ह्याचा एक चौथा भाग ज्ञान शिकविले. तो म्हणाला, `सत्यकामा, प्रकाशणार्‍या चारी दिशा हा एक ईश्वराचा अंश आहे. तुला अग्निदेव आणखी ज्ञान देईल.’ वायू सर्व दिशांना हिंडतो म्हणून त्याला हे ज्ञान असते.<br><br>

वायुदेवाच्या आज्ञेप्रमाणे दुसर्‍या दिवशी सत्यकाम गायी घेऊन आश्रमाकडे निघाला. वाटेत संध्याकाळ झाली तेव्हा त्याने गायी बांधल्या, अग्नी पेटविला व तो त्यात समिधा टाकू लागला. अग्नी प्रसन्न झाला व म्हणाला, `सत्यकामा, मी तुला ईश्वरज्ञानाचा चौथा भाग सांगतो.

सत्यकाम नम्रपणे म्हणाला, `सांगावे भगवन्.’

अग्नी म्हणाला, `समुद्र, पृथ्वी, हवा, आकाश हा ईश्वाराचा भाग आहे. हंस तुला आणखी सांगेल.’ अग्नी हा समुद्र व पृथ्वी यांवर हिंडतो. आकाशातही सूर्याच्या रूपाने तो राहतो; म्हणून त्याला हे माहीत होते.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सत्यकामाने गायी बांधल्या, अग्नी पेटवला व तो त्यात समिधा टाकू लागला. इतक्यात तेथे एक हंस उडत आला व म्हणाला, `सत्यकामा, मी तुला ईश्वरज्ञानाचा चौथा भाग सांगतो.’ सत्यकाम म्हणाला, `सांगावे भगवन् !’

हंस म्हणाला, `अग्नी, सूर्य, चंद्र आणि वीज ही मिळून ईश्वराचा एक भाग होतो. बाकी ज्ञान तुला पाणबुड्या पक्षी सांगेल.’ हंसाच्या रूपाने तो प्रत्यक्ष सूर्यच बोलत होता. सूर्य हा आकाशात उडणारा जणू काय एक सोन्याचा हंसच आहे.

दुसर्‍या दिवशी संध्याकाळी सत्यकामाने गायी बांधल्या, अग्नी पेटवला व तो त्यात समिधा टाकू लागला. इतक्यात एक पाणबुडा पक्षी तेथे उडत आला व म्हणाला, `सत्यकामा, मी तुला ईश्वराचा चौथा भाग सांगतो.’ प्राणदेवतेनेच ह्या पक्ष्याचे रूप घेतले होते. सत्यकाम म्हणाला, `सांगावे भगवन् !’

पाणबुड्या पक्षी म्हणाला, `प्राण, डोळे, कान आणि मन हा ईश्वराचा एक भाग आहे. प्रत्येक प्राण्यात ईश्वराचा हा अंश असतो. सत्यकाम अशा रीतीने पूर्ण ज्ञानी झाला व आश्रमात परत आला. गौतमांनी त्याला दुरून पाहिल्यावर त्यांना सर्व प्रकार कळून आला.

गौतम म्हणाले, `सत्यकामा ! ईश्वराचे ज्ञान झाल्यासारखा तू तेजस्वी दिसतोस. कुणी शिकविले तुला?’ ज्ञानाचे अपूर्व तेज सत्यकामाच्या तोंडावर झळकत होते.

सत्यकाम विनयाने म्हणाला, `मनुष्याखेरीज इतर प्राण्यांनीच मला शिकविले. पण भगवन्, आपल्या तोंडून ते ज्ञान पुन्हा ऐकावे अशी माझी इच्छा आहे. गुरुमुखाखेरीज सर्व विद्या व्यर्थ आहे असे मी ऐकतो.’

सत्यकामाला सर्व चराचर सृष्टीत भरलेल्या ईश्वराचे ज्ञान गौतमांनी आपल्या रसाळ वाणीने पुन्हा समजावून दिले. इतर सर्व शिष्यांनी लाजेने माना खाली घातल्या. इतकी वर्षे वेद घोकूनही त्यांना इतके ज्ञान झालेले नव्हते. पुढे सत्यकाम मोठा प्रख्यात ऋषी झाला आणि त्याच्याजवळ शिकून पुष्कळ शिष्य ज्ञानी झाले.

Puja Shinde
मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Related Articles

Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh | मोबाईल शाप की वरदान

Mobile Shap Ki Vardan Essay in Marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्‍या या क्रांतीकारी उपकरणाचे...

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने...

गुरुपौर्णिमा | Guru Purnima Marathi Nibandh | मराठी निबंध

आषाढ सुद्धा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -

Latest Articles

Mobile Shap Ki Vardan Marathi Nibandh | मोबाईल शाप की वरदान

Mobile Shap Ki Vardan Essay in Marathi नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मोबाईल शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. मानवाने तयार केलेल्‍या या क्रांतीकारी उपकरणाचे...

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

Dr. BabaSaheb Ambedkar Marathi Nibandh भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतावर ब्रिटिश राज्य करत होते. सारी जनता ब्रिटिशांपुढे हतबल झाली होती तरी अशा परिस्थितीतही काही लोक धैर्याने...

गुरुपौर्णिमा | Guru Purnima Marathi Nibandh | मराठी निबंध

आषाढ सुद्धा पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असे म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी,...

जागतिक महिला दिन | International Women Day Marathi Nibandh

पाहता पाहता अलीकडच्या दहा वर्षात हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. प्रत्येक संघटनेला या दिवसाचे, या कार्यक्रमाचे महत्त्व पटले आहे. कोणत्यातरी...

Baldin Marathi Nibandh | Children Day in Marathi

Baldin in Marathi 14 व्या नोव्हेंबर प्रत्येक वर्षी भारतभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुक्त भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहर लाइ नेहरू यांचे वाढदिवस त्या...