शहाजीराजांचे निधन | Marathi Katha | Marathi Story

शिवाजी महाराज अमाप संपत्ती घेऊन राजगडाकडे येत होते. त्यांना वाटले की, एवढी संपत्ती बघून गडावर किती आनंदी-आनंद होईल. परंतु राजगड मात्र पूर्णपणे दुःखात बुडाला होता याची महाराजांना कल्पना नव्हती.

शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे तेव्हा कर्नाटकात होते. ते शिकारीसाठी वनात गेले असता एका हरणाच्या पाठीमागे धावत असताना त्यांच्या घोडयाचा पाय एका वेलीत अडकून ते खाली कोसळले आणि त्यांच्या मस्तकाला खूप जास्त मार लागून त्यातच त्यांचे निघन झाले. महाराजांचे सावत्रभाऊ व्यंकोजीराव यांनी शहाजीराजांचा अंतिम संस्कार तेथेच केला.

शहाजीराजांच्या निधनाची बातमी जेव्हा राजगडावर समजली तेव्हा माँसाहेंबावर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला होता. त्यांचे सौभाग्य लोपले होते. महाराज जेव्हा गडावर पोहोचले तेव्हा त्यांना ही बातमी समजली. माँसाहेंबांना भेटताच त्यांनी त्यांच्या कुशीत शिरून आपल्या दुःखाला वाट मोकळी करून दिली. पतीच्या निधनानंतर माँसाहेबांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय ऐकून महाराजांनी माँसाहेबांच्या पायांना मिठी मारून टाहो फोडला. त्यांनी अनेक प्रकारे माँसाहेबांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्यांना त्यात यश आले. माँसाहेबांनी सती जाण्याचा निर्णय बदलला तरी राजगड मात्र दुःखात बुडालेला होता.

जसवंतसिंह हा गेले सहा महिने कोंढाणा किल्ल्याला वेढा देऊन बसला होता. त्याला कळले की, शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट करून अमाप संपत्ती राजगडावर आणली आहे. परंतु त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. तो म्हणाला, “शिवाजी महाराज तर औरंगाबादला शहजादा मुअज्जम याची वाट लावण्यासाठी गेले होते मग ते सुरतेला कसे जातील?

ते ऐकून त्याचा एक हेर म्हणाला, “अहो, ते शिवाजी महाराज अशीच हूल देतात नि आपली मोहिम यशस्वी करतात.”

त्यानंतर दोन दिवसांनी जयवंतसिंहाला ‘आपण जे ऐकले, ती बातमी खरी आहे असे समजले तेव्हा त्याचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता.

जयवंतसिंह आता काळजीत पडला कारण दोन-तीन वेळा प्रयत्न करून देखील त्याला कोंढाण्यात प्रवेश करता आला नव्हता. मावळयांनी त्यांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले होते. त्यासाठी त्याने एक जोरदार दणका देऊन कोंढाणा ताब्यात घ्यावा असे त्याने ठरविले.

गडावर मावळे तयारीतच होते. ते गुपचुप त्याच्या छावणीत घुसले व दारूगोळयाच्या साठयाला त्यांनी आग लावली. मोठा भडका उडाला. या संधीचा फायदा घेऊन मावळयांनी जसवंतसिंहाच्या गाफील असलेल्या सैनिकांना नकोसे करून सोडले. जसवंतसिंहाने लगेचच वेढा उठवून तेथून पलायन केले. त्यानंतर गडावर येऊन महाराजांनी मावळयांचा मान-सन्मान केला.

Leave a Comment