शाहिस्तेखानाची बोटेच छाटली | Marathi Katha | Marathi Story

औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान हा पुण्यातील लाल महालामध्ये राहून स्वराज्यातील मुलूखाची राखरांगोळी करीत होता त्यामुळे त्याचा बंदोबस्त कसा करायचा याचा विचार महाराज करत होते. त्यासाठी त्यांनी एक योजना आखली. पुण्याभोवती जी मोगली फौज होती तिला प्रथम गोंधळून टाकायचे व नंतर लाल महालात प्रवेश करून शाहिस्तेखानाचे मुंडके कापून लगेच तेथून निघून जायचे. ही योजना तशी धोक्याचीच होती, परंतु धोका पत्करून गनिमी काव्यानेच खानाचा काटा काढण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता.

शाहिस्तेखानाच्या फौजेमध्ये जास्तीत जास्त सैनिक हे मुसलमान होते. तो रमजानचा सहावा दिवस होता. ते दिवसभर कडक उपास करीत व रात्री मात्र भरपूर जेवण करून सुस्त झोपत असत त्यामुळे आपोआपच पहारा गाफील असे.

पुण्यात तेव्हा सैनिक आणि सरदार यांच्याशिावाय कोणालाही जवळ शस्त्र ठेवण्याचा अधिकार नव्हता. शस्त्रे घेऊन पुण्यात कोणीही प्रवेश करू शकत नसे. तेव्हा शस्त्रे घेऊन पुण्यात प्रवेश कसा करायचा, लाल महालापर्यंत कशी मजल मारायची, इशारे कधी करायचे, कोणी करायचे अशी सर्व महत्वाची माहिती महाराजांनी संगळयांना समजावून सांगितली. ही सगळी तयारी करून महाराज व त्यांचे साथीदार लाल महालात प्रवेश करण्यास सज्ज झाले.

ज्या दिवशी रात्री हल्ला करायचा होता त्याच दिवशी सकाळी शंभर-शंभर स्वारांच्या दोन सशस्त्र टोळया पुण्याच्या सरहद्दीवर एका पहाऱ्याच्या चौकीजवळ आल्या. पहारेकऱ्याने त्यांना आत जाण्यास अडविले तेव्हा एक शिपाई म्हणाला, “आम्ही खानसाहेबांचे सैनिक आहोत. तुम्ही काल पहाऱ्यावर येण्यापूर्वीच आम्ही पुढच्या रात्रीच्या पहाऱ्यासाठी गेलो होतो; आणि परत येताना आमची तुम्ही अडवणूक करता? आता मी तुमची खानसाहेंबाकडे तक्रार करतो.”

ते ऐकल्यावर तो पहारेकरी घाबरला व त्याने सशस्त्र मावळयांना आत सोडले. पुढे त्यांना कोणीही आत सोडताना काही विचारले नाही. काही वेळाने एक पठाण एक गवताने भरलेली बैलगाडी घेऊन आला व पहारेकऱ्याला म्हणाला, “आमच्या छावणीतील घोडे, बैल, वैरणीसाठी तडफडत आहेत म्हणून त्यांना हे गवत मिळावे यासाठी हे गाडीवान या गवताच्या गाडया घेऊन चालले होते. मी त्यांना पकडून आणले. आता त्यांना छावणीत घेऊन जातो आणि गवत उतरून घेतो व लगेच हाकलून देतो.”

पठाणाचे ते बोलणे ऐकून ‘हा आपलाच माणूस आहे’ असे पहारेकऱ्याला वाटले म्हणून त्याने त्याला गाडयांसह आत सोडले. आत गेल्यावर ठरलेल्या ठिकाणी गाडीतील गवताच्या खाली असलेल्या तलवारी, भाले काढून गवत घोडयांपुढे टाकले व अशा प्रकारे महाराजांचे सर्व सैनिक शस्त्रांसह आत पोहोचले.

नेमकी त्याच दिवशी रात्री एक लग्नाची वरात निघाली होती. त्या वऱ्हाडी मंडळीबरोबर सामील होऊन महाराज आणि त्यांचे सहाकरी पुण्यात प्रवेश करण्यामध्ये यशस्वी झाले. तेथे गेल्यावर आत थांबलेल्या सशस्त्र मावळयांजवळ महाराज गेले. आपल्यामागून दबकत दबकत यावे असे त्यांना सांगून महाराज लाल महालाकडे पोहोचले.

लाल महालामध्ये पहारा करीत असलेले सर्व सैनिक भरपूर जेवण करून झोपलेले होते. इतका कडक पहारा असताना शिवाजी महाराज इकडे कसे येतील असा विचार करत ते निश्चिंतपणे झोपले होते. महाराज व त्यांचे सहकारी त्या सैनिकांची मुंडी कापून वाडयाच्या मागील भिंतीला खिंडार पाडून आत शिरले. परंतु तेव्हा स्वयंपाकघरातील एका नोकराला कोणीतरी वाडयात शिरले आहे असे समजले. त्यामुळे त्याने ‘गनीम आया, गनीम आया’ असे ओरडायला सुरूवात केली. सर्व वाडा त्या आवाजाने जागा झाला. शाहिस्तेखानाचा मुलगा व जावई लगेच खानाच्या रक्षणासाठी तलवारी घेऊन त्याच्या शयनगृहात आले. परंतु महाराजांच्या साथीदारांनी त्यांची मुंडकी उडवली. त्याच वेळेस खानाच्या पत्नीने तेथील सर्व दिवे विझविले व त्यामुळे सर्वत्र अंधार झाला.

अंधार असताना देखील महाराजांनी अनेक रक्षकांना यमसदनी पाठविले. नेमके त्याच वेळी शाहिस्तेखान एका खिडकीतून पळून जात असलेला त्यांच्या नजरेस पडला. महाराजांनी लगेच धावत जाऊन त्याच्यावर तलवारीचा वार केला. परंतु खानाचे नशीब चांगले की तलवारीने फक्त त्याच्या हाताची तीन बोटे तुटली आणि खान मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. सगळीकडे गोंधळ उडाला. आता खानाचे सैनिक सावध होण्याच्या आत येथून निघून जायला हवे असा विचार करून महाराज त्यांच्या साथींदारांना घेऊन त्वरित लाल महालाबाहेर पडले व ठरलेल्या ठिकाणी आपल्या लोकांना जाऊन भेटले.

महाराज व त्यांचे साथीदार घोडयावर बसून निघाले. इशाऱ्याचे शिंग वाजताच त्यांनी ओरडायला सुरूवात केली, “अरे पकडो, खानसाहब को मारकर शिवाजी भाग रहे है।”असे स्वतःच ओरडत पहारेकऱ्यांच्या चौकी पहाऱ्यातून अतिशय सहीसलामत बाहेर पडले. ओरडत गेलेले हे सैनिक आपलेच आहेत असे समजून कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. महाराज व इतर मावळे ठरलेल्या ठिकाणी पोहोचले व मोहीम यशस्वी झाल्याचे महाराजांनी सांगितले.

इकडे जेव्हा मोगली हाशम महाराजांचा शोध घेत होते तेव्हा एका मावळयाने शिंग फुंकले. शिंगाचा आवाज कात्रज घाटाकडे पोहोचला. तेथे मावळयांनी आधीच शंभर-दिडशे बैलांच्या शिंगांना पलिते बांधून ठेवले होते. आवाज ऐकू येताच मावळयांनी ते पलिते पेटविले व त्यामुळे बैल घाबरले व इकडे-तिकडे सैरावैरा पळू लागले. हे दृश्य मुघल सैनिकांनी पाहिले व त्यांना वाटले, की मावळेच पळून चालले आहेत. त्यामुळे चारी दिशांना महाराजांना पकडण्यासाठी गेलेले हाशम सैनिक एकत्र होऊन कात्रज घाटाकडे पळू लागले. तेथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले की, मावळयांनी आपल्याला बैल बनिविले आहे व म्हणून त्यांनी माना खाली घातल्या. तोपर्यंत महाराज आणि मावळे सिंहगडाकडे निसटून जाण्यात यशस्वी झाले होते.

शाहिस्तेखानाला वाटले की, एवढे मोठे सैन्य असून देखील शिवाजी महाराज प्रत्यक्ष येऊन आपली बोटे कापतात, त्यामुळे आता आपली अब्रू धुळीला मिळाली आहे. आता आपल्याला जगाला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. शिवाय त्यात आपला मुलगा व जावई देखील मारले गेले याचे दुःख आहेच. तेव्हा आता आपण पुण्यात राहायचे नाही असा विचार करत त्याने औरंगाबादला जाण्याचे ठरविले. औरगाबादला गेल्यावर औरंगजेबाने त्यांची नालस्ती केली व त्याला लगेचच बंगालला जाण्यास सांगितले.

औरंगजेबाने आपल्या मुलाला सुभेदार म्हणून दक्षिणेत पाठविले. हा मुलगा अतिशय आळशी व फक्त मौजमजेत आयुष्य घालविणारा होता. हे महाराजांना समजले तेव्हा त्याची भीती बाळगण्याचे काही कारण नाही असे त्यांना वाटले. शाहिस्तेखानाने स्वराज्यातील बराच मुलूख जाळून बेचिराख केला होता त्यामुळे त्याची नव्याने उभारणी करणे गरजेचे होते असे महाराजांना वाटत होते परंतु त्यासाठी धनाची गरज होती. महाराज त्याच काळजीत होते तोच त्यांना एक कल्पना सुचली त्याप्रमाणे त्यांनी आपला एक हेर बहिर्जीला कामगिरी सांगून रवाना केले आणि त्याने ती कामगिरी अतिशय चोख बजाविली.

सुरत ही त्या काळात मोगलांची नावाजलेली बाजारपेठ होती. तेथे कोटयाधीश व्यापारी राहात होते. सुरतेमध्ये सोन्याचा धूर निघत होता. महाराजांनी त्याच सुरतेवर धाड घालून मोठी लूट आणण्याची मोहीम आखली. महाराज सर्व तयारी करून सुरतेवर धडकले. मावळयांनी सुरतेतून अमाप संपत्ती मिळविली. कोटयाधीश व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळली. ही बातमी दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला समजली तेव्हा तो खूपच संतापला.

Leave a Comment