शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ | Marathi Katha | Marathi Story

सशाची अक्कल-हुशारी
एका घनदाट जंगलात एक मंदार नावाचा पर्वत होता. त्या पर्वतावर एक अतिशय उन्मत्त असा सिंह रहात होता. तो कारण नसताना जंगलातील अनेक पक्षांना ठार मारत असे. सिंहाच्या या त्रासाला सगळे पशू कंटाळले होते, म्हणून एकदा वनातील काही धीट असलेले पशू त्याच्याकडे गेले व हात जोडून विनंतीपूर्वक त्याला म्हणाले, “महाराज, खर पाहिल तर आपली भूक भागविण्यासाठी आपल्याला दिवसाला एक पशू पुरेसा आहे परंतु आपण मात्र आपल्याला दिसेल त्या सर्व पशूंना मारता आणि मारलेल्या पशूतील फक्त एका पशूचे मांस खाऊन बाकी पशूंना टाकून देता. यामुळे लवकरच हे वन पशुहीन होईल आणि आपल्यावर भुकेने मरण्याची पाळी येईल. तेव्हा आपल्या हितासाठी व पशूंच्या हितासाठी आम्ही आपल्याला त्यावर एक उपाय सांगतो. आम्ही वन्य पशू दररोज आपल्याकडे नियमितपणे एक पशू पाठवीत जाऊ. त्या पशूला मारून आपण घरबसल्या आपली भूक शमवावी ही विनंती.”

ते ऐकून सिंहाला फार आनंद झाला, कारण त्याला घरबसल्या आयते भोजन मिळणार होते म्हणून त्याने ते मान्य केले त्यामुळे त्या वनातील पशू दररोज त्याच्याकडे एक पशू पाठवू लागले.

एके दिवशी त्या सिंहाकडे जाण्याची पाळी एका सशावर आली. तो ससा फार हुशार होता. तो ससा घरून निघाला तेव्हा त्याची बायको व मुले तो जाणार म्हणून रडू लागली, तेव्हा त्यांना धीर देत तो म्हणाला, “तुम्ही अजिबात काळजी करू नका. ‘शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते’ हे तर तुम्हाला माहित आहे ना? मग माझ्यावर विश्वास ठेवा, मी माझा बळी द्यायला जरी जात आहे तरी त्या सिंहालाच बळी देऊन मी घरी परत येतो.”

सशाने आपल्या घरच्यांना आश्वासन दिले व तो सिंहाकडे जाण्यास निघाला. वाटेत जाताना मुद्दाम तो एका झुडुपात घुसला व बराच वेळ त्या ठिकाणी वेळ घालवून मग तो घाईघाईने सिंहाकडे गेला. सशाला माहितच होते की उशीर झाल्यामुळे सिंह खूप चिडला असणार आणि झालेही तसेच. सिंहाने अतिशय संतापून सशाला विचारले, “काय रे मुर्खा! तु माझ्याकडे पोहोचायला एवढा उशीर का केलास?”

ससा अतिशय नम्रतेने सिंहाला म्हणाला, “महाराज, माझे उशीरा येण्याचे कारण कळले तर तुम्हाला कळेल की, मी अजिबात मुर्ख नाही, कारण आपण या वनाचे राजे असताना देखील मला येताना स्वतःला वनाचा राजा समजणारा एक सिंह भेटला व मला अडवून मारू लागला तेव्हा मी त्याला आपल्याकडे बळी जाण्यासाठी जात असल्याचे सांगितले. परंतु आपण या वनाचे राजे नसून तो स्वतःच या वनाचा खरा राजा आहे असा दावा करू लागला आणि आपल्याला शिव्या देऊ लागला. शेवटी ‘मी वचन दिल्याप्रमाणे पटकन आमच्या सिंहमहाराजांना भेटून येतो’ असे मी त्याला सांगितले व कसाबसा जीव वाचवून आपल्याकडे आलो म्हणून मला उशीर झाला.”

सशाने ही मारलेली थाप त्या सिंहाला खरेच वाटली व तो अतिशय संतापला व त्याने सशाला विचारले, “स्वतःला वनाचा राजा समजून मला शिव्या देणारा तो मुर्ख सिंह कुठे आहे, ते मला दाखवतोस? मग मी त्याचा बेत बघतो.”

ससा हुशारीने म्हणाला, “महाराज, मी त्याची कशीबशी तात्पुरती समजूत घालून जेव्हा तुमच्याकडे यायला निघालो तेव्हा तो अविचारी सिंह जवळ असलेल्या त्याच्या खोल गुहेत गेला आहे. मी आपल्याला तिकडे घेऊन जातो.”

सशाने सांगितल्याप्रमाणे सिंह त्याच्या मागोमाग जाऊ लागला. सशाने सिंहाला पाण्याने अर्धवट भरलेल्या एका विहिरीपाशी नेले व नंतर त्या सिंहाला त्या विहिरीतील पाण्यात पडलेले त्याचेच प्रतिबिंब दाखवून तो ससा त्याला म्हणाला, “हे बघा, महाराज हाच तो सिंह, ज्याने आपल्याला अत्यंत वाईट शब्द वापरून आपला अपमान केला आणि आता प्रत्यक्ष आपणाला येथे पहाताच तो बघा कसा गप्प बसला आहे.”

सशाचे ते बोलणे ऐकून संतापलेल्या सिंहाने विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्याला स्वतःचेच प्रतिबिंब पाण्यात दिसले व तो खरोखरच दुसरा सिंह आहे असे समजून त्याने स्वतःच्याच प्रतिबिंबावर झडप घेण्यासाठी त्या विहिरीत उडी घेतली व पाण्यात बुडून थोडयाच वेळात तो मरण पावला.

सशाने सिंहाला आपल्या युक्तीने ठार केले हे समजताच वनातील सर्व पशुंना फार आनंद झाला व त्यांनी सर्वांनी सशाला त्याबद्दल शाबासकी दिली.

Leave a Comment