शिवरायांची दूरदृष्टी | Shivrayanchi Durdrushti Marathi Katha | Marathi Story

शिवरायांची दूरदृष्टी | Shivrayanchi Durdrushti Marathi Katha

“शिरवळचा अमीन मिया हा पराभूत झाल्यामुळे विजापुरच्या दरबारात आला तेव्हा शिरवळचा किल्ला व कोंढाणा देखील गमावला असल्याचे आदिलशहाला समजले. ते ऐकून त्याला धक्काच बसला. शिवाजी आपल्याला डोईजड झाल्याचे त्याच्या लक्षात आले म्हणून याबाबत काहीतरी करायलाच पाहिजे असे ठरवून त्याने आपल्या सरदारांची एक गुप्त बैठक घेतली.

या बैठकीत विचार-विनिमय करून असे ठरले की, शिवरायांवर जरब बसविण्यासाठी त्यांचे वडील शहाजीराजे यांनाच कैदेत टाकावे. तेव्हा शहाजीराजे हे जिंजीचा किल्ला घेण्यासाठी लढत होते त्यामुळे त्यांचा मुक्काम तेव्हा छावणीतच असे. जर शहाजीराजेंना झोपेतच जेरबंद करून कैदखान्यात टाकले, तर शिवाजीराजे त्यांना सोडविण्यासाठी येतील व तेव्हा त्यांचा समजाचार घेता येईल, असा सल्ला आदिलशहाला देणारे मराठा सरदारच होते.

मुधोळचे सरदार बाजी घोरपडे यांचा सल्ला ऐकून आदिलशहाला वाटले की, ‘हा सरदार आपल्याच लोकांवर घाव घालून आपल्याच मायभूमीची राख-रांगोळी करायला निघालाय.’ परंतु हे विचार त्याने बोलून न दाखवता तो मनातून खूप खुष झाला आणि त्याने सर्वांना त्याप्रमाणे कामाला लागण्यास सांगितले.

आदिलशहाचा हुकूम होताच सरदार मुस्तफाखानाने आपल्याबरोबर बाजी घोरपडे, बाळाजी हैबतराव, अंबरखान, बहलोलखान, मंबाजी भोसले असे सरदार आणि मोठी फौज घेऊन जिंजीकडे प्रस्थान केले.

शहाजीराजांनी या सर्वांना बघितले तेव्हा त्यांच्या मनात शंका आली की, ‘यांचा नक्कीच काहीतरी डाव आहे.’ मुस्ताफाखानाने शहाजीराजांच्या गळयात पडून सांगितले की, “राजे, तुम्ही जिंजी जिंकण्यासाठी किती प्रयत्न करीत आहात व त्यामुळेच आदिलशहा तुमच्यावर खूप खुष आहे. आपण हा किल्ला लवकरात लवकर जिंकून कर्नाटकातील इतर मुलूख जिंकण्यास मोकळे व्हावे यासाठी आम्हाला तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे.”

शहाजीराजांनी मुस्तफाखानच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पण ते तरी देखील सावध होते. मुस्तफाखानचे त्यांच्या छावणीवर बारीक लक्ष होते. शहाजीराजे पहाटेच्या गाढ झोपेत असताना मुस्तफाखानचे शेकडो सैनिक हातात तलवारी व पेटत्या मशाली घेऊन शहाजीराजांच्या छावणीत आले तेव्हा शहाजीराजे ताडकन उठले व त्यांच्या लक्षात आले की, आपल्याबरोबर धोका झाला आहे परंतु तसे असताना देखील शहाजीराजांनी शत्रूशी तलवारीने लढून प्रतिकार केला परंतु शेकडो सैनिकांसमोर एकटयाने लढणे अशक्यच होते. त्यामुळे शहाजीराजे जखमी झाले व भोवळ येऊन खाली कोसळले. त्याबरोबर लगेचच मुस्तफाखानच्या सैन्याने त्यांना उचलून खानाच्या छावणील आणले व त्यांच्या हाता-पायात बेडया घालून कैद केले.

शहाजीराजे अशा रितीने कैद झाले. मुस्तफाखान व इतर सरदारांना फार आनंद झाला. आता शिवाजीराजे आपल्या ताब्यात येणारच असे त्यांना वाटले. शहाजीराजे भानावर आल्यावर त्यांना सर्व काही समजले.

इकडे शिरवळचा किल्ला व कोंढाणा स्वराज्यात दाखल झाले म्हणून शिवराय व त्यांचे मर्द मावळे राजगडावर आनंद साजरा करीत होते, परंतु तितक्यात त्यांना शहाजीराजांना कैद केल्याचे समजले. जिजाऊ व शिवराय अत्यंत काळजीत पडले.

तेवढयात दुसरी बातमी आली की, बंगळुरला असणारे शिवरायांचे मोठे बंधू संभाजीराजे व इतर कुटुंबियांना जेरबंद करण्यासाठी मुस्तफाखानाने बंगळुरला मोठी फौज पाठविली आहे. त्याचबरोबर तिसरे संकट देखील त्यांच्या समोर उभे राहिले ते म्हणजे शिवरायांना धडा शिकविण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानाला मोठी फौज घेऊन पाठविले आहे.

शिवरायांच्या पुढे हे तिहेरी संकट आले त्यामुळे ते अतिशय काळजीत पडले म्हणून त्यांनी माँसाहेब व इतरांशी चर्चा केली व स्वराज्यावर आलेल्या संकटांची सर्वांना कल्पना दिली. जर शत्रूच्या कारवाया थांबल्या नाहीत, तर सर्वजण शत्रूच्या कैदेत पडतील. प्रसंग खरोखरच कठीण आहे. सर्वांचीच जर सुटका करायची असेल तर स्वराज्याला मुकावे लागणार आणि स्वराज्य जतन करायचे म्हंटले तर शहाजीराजे व इतर कुटुंबीय शत्रूच्या कैदेत खितपत पडणार. काय करावे, परंतु यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. श्रींची इच्छा होती, हे राज्य व्हावे म्हणून. मग ते टिकावे यासाठी देखील तेच काहीतरी मार्ग सुचवतील. आता धीर सोडून चालणार नाही.

शिवराय मुत्सद्दी होते त्यामुळे त्यांनी मार्ग शोधला. दिल्लीच्या बादशहाला कसले तरी आमिष दाखवून त्याच्याशी संधान जुळवायचे व त्याचा दबाव आदिलशहावर आणून थोरले महाराज व थोरले बंधू संभाजीराजांना वाचवावयाचे. शिवरायांचे वय तेव्हा फक्त अठरा वर्षाचे होते तरीदेखील त्यांची दुरदृष्टी पाहून माँसाहेबांना फार कौतुक वाटले व शिवरायांविषयीचा आदर अधिकच वाढला.

मोगलांसारख्या सर्व सत्ताधीशांनी आपली शक्ती पाहिली की ते नक्कीच आपल्याशी मैत्रीचा हात पुढे करतील व त्यासाठी आपण प्रथम पुरंदरसारखा गड ताब्यात घेऊ. फत्तेखान आपल्यावर चालून येण्याआधीच पुरंदर घेतला पाहिजे; म्हणजे गडाच्या आश्रयाने आपण त्या फत्तेखानाचा सहज पराभव करू शकू, असे शिवरायांचे विचार होते.

तेथील सर्वजण शिवरायांच्या या डावपेचाने आश्चर्यचकित झाले व त्यामुळे त्यांना शिवरायांची दूरदृष्टी देखील कळाली.

Leave a Comment

x