शिवराय आणि शंभूराजे यांची सुटका | Shivray aani Shambhuraje Yanchi Sutaka Marathi Katha

शिवराय आणि शंभूराजे यांची सुटका | Shivray aani Shambhuraje Yanchi Sutaka Marathi Katha

मिर्झाराजे जयसिंगाच्या ताब्यात पुरंदर आणि वज्रगढ आले तेव्हा त्याचा उन्मत्तपणा जास्तच वाढला होता. आता त्याची नजर कोंढाण्याकडे वळली होती. गडाला वेढा घालण्यासाठी त्याने आपल्या एका सरदाराला पाठविले. स्वराज्यावर मात्र आता एका पाठोपाठ एक संकटे येऊ लागली होती. आपण जर शर्थीने लढलो तर आपल्याला कदाचित विजय मिळेल देखील परंतु त्यामध्ये आपल्या फौजेची मात्र फार मोठी हानी होण्याची शक्यता आहे. असे महाराजांना वाटत होते. शिवाजीमहाराजांनी मग जयसिंगाशी तह करण्याचा निर्णय घेतला. तह झाला. त्यामध्ये मोगलांना तेवीस किल्ले आणि त्याच्या आसपासचा प्रदेश देण्याचे ठरले. त्याशिवाय त्यात शिवरायांनी आपले पुत्र संभाजीराजे यांना घेऊन आग्रा येथे जाऊन औरंगजेबाला भेटावे, असे देखील ठरवण्यात आले.

शिवाजीमहाराज तहानुसार संभाजीराजांना घेऊन आग्रा येथे गेले तेव्हा तेथे त्यांच्या स्वागतासाठी देखील कोणी नव्हते. खरं तर हा महाराजांचा अपमानच होता तरीदेखील ते राजा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याच्याबरोबर ठरलेल्या ठिकाणी गेले. तेथे काही वेळ त्यांनी विश्रांती घेतली व नंतर ते औरंगजेबाच्या दरबारात पोहोचले.

औरंगजेबाचा त्या दिवशी वाढदिवस होता म्हणून खास दरबार भरला होता. तो सर्वांचे नजराणे, भेटी, वगैरे स्वीकारत होता. महाराजांनी शंभूराजांना घेऊन रिवाजाप्रमाणे औरंगजेबाला नजराणा दिला; परंतु औरंगजेबाने मात्र जाणून बुजून त्याकडे दुर्लक्ष केले. आधी ठरल्याप्रमाणे महाराजांना पंचहजारी मनसबदारांच्या रांगेत नेऊन उभे केले. महाराज आता या मुद्दाम केलेल्या अपमानामुळे खूपच संतापले. भर दरबारात औरंगजेबाला पाठ दाखवून ते शंभूराजांसह दरबारातून बाहेर पडले.

आपल्या कचाटयात सापडलेले शिवाजी महाराज भर दरबारात आपल्याला पाठ दाखवून निघून जातात, हे बघताच औरंजेब महाराजांच्या या धैर्यामुळे खूपच चकित झाला. परंतु लगेच भानावर येऊन त्याने आपल्या एका फुलादखान नावाच्या सरदारास सांगितले, “जा, असेच जाऊन त्या शिवरायांना नजरकैदेत ठेवा. त्यांच्याजवळ दोन-चार निःशस्त्र माणसे राहिली, तर राहू देत. ज्या हवेलीत त्यांना ठेवण्यात येईल तेथे हजार सशस्त्र सैनिकांचा कडक पहारा ठेवा. ते कुठल्याही परिस्थितीत निसटणार नाहीत याची खबरदारी घ्या. काही दिवसांतच आम्ही त्यांना कायमचेच एखाद्या किल्ल्यात डांबून ठेवणार आहोत.”

शिवाजी महाराज आता एका हवेलीत अतिशय कडक बंदोबस्तात नजरकैद झाले. त्या हवेलीच्या भोवती जवळ-जवळ सशस्त्र हाशमांचा पहारा बसवला होता. महाराजांना औरंगजेबाचा कावा कळून चुकला होता. आता येथून कसे निसटता येईल याचा विचार करत होते.

महाराजांनी आता आपण खूप आजारी आहोत अशी अफवा पसरवली. आपण आता काही दिवसांचेच सोबती आहेात असे देखील नाटक केले, आणि आपला काही भरवसा नसल्यामुळे आपल्याबरोबर आलेल्या सगळया लोकांना दक्षिणेत जाऊ द्यावे असे कळविले. त्याप्रमाणे औरंगजेबाने महाराजांच्या सर्व लोकांना दक्षिणेत जाण्याची परवानगी दिली. महाराजांजवळ आता फक्त चार सेवक उरले होते. सर्व लोक दक्षिणेत पोहोचल्यावर महाराजांनी आपला आजार जास्तच वाढला आहे असे दाखविले. महाराज खरोखरच खूप जास्त आजारी आहेत असेच सर्वांना वाटू लागले.

महाराजांनी अशी इच्छा व्यक्त केली की, ‘आपल्याला मोक्ष मिळावा म्हणून आपण फकीर, बैरागी, साधूंना मिठाई वाटू इच्छितो, व तसे औरंगजेबाला कळविले व त्यासाठी त्याची अनुमती मिळविली.

महाराज असलेल्या महालामध्ये मोठमोठे पेटारे येऊ लागले. मिठाईचे हारे येऊ लागले. महाराजांचे सेवक त्या पेटाऱ्यात मिठाई भरून तो पेटारा आपल्या खांद्यावरून बाहेर घेऊन जात असत. तेव्हा सुरूवातीला ते पेटारे उघडून तपासून पाहिले जात परंतु प्रत्येक वेळेस ते पेटारे मिठाईने भरलेले दिसत असे. त्यामुळे पुढे-पुढे ते पेटारे उघडून पहाण्याचे प्रमाण कमी झाले.

एके दिवशी दुपारनंर पेटारे बाहेर पडण्यास सुरूवात झाली. पहिले काही पेटारे तपासण्यात आले परंतु नंतर मागून येणारे पेटारे तसेच न तपासता जाऊ देण्यात आले. त्यातील एका पेटाऱ्यात स्वतः महाराज; तर दुसऱ्या पेटाऱ्यात शंभूराजे बसले होते. महाराजांचे सेवक हे दोन्ही पेटारे खांद्यावर घेऊन बाहेर पडले. अतिशय वेगाने चालत ते एका ठरलेल्या ठिकाणी येऊन पोहोचले.

इकडे मात्र महाराज आपल्या पलंगावर आराम करीत आहेत असाच देखावा उभा करण्यात आला होता. तेथे महाराजांचा एक सेवक हिरोजी फर्जंद पलंगावर झोपल्याचे नाटक करीत होता. त्याने सर्व शरीरावर पाघंरूण घेऊन एक हात बाहेर ठेवला होता आणि त्या हातातील एका बोटात महाराजांची आंगठी चमकत होती. तेथेच एक सेवक महाराजांचे पाय दाबण्याचे नाटक करीत होता. महाराज विश्रांती घेत आहेत असेच प्रत्येकाला वाटत होते.

फुलादखानाने पाहिले तेव्हा त्याला देखील तसेच वाटले. त्यामुळे तो जेवणासाठी निघून गेला. ते बघून हिरोजी फर्जंद व पाय दाबणारा सेवक बाहेर पडले. जाताना त्यांनी पलंगावर गाद्या, लोड लावून तेथे महाराज खरोखरच गाढ झोपले आहेत असा भास निर्माण केला. तेथून बाहेर पडताना त्यांनी पहाऱ्यावरील हाशमांना, ‘आम्ही महाराजांसाठी औषध आणायला बाहेर जात आहोत’, असे सांगितले व ते तेथून निसटले.

महाराजांनी ज्या लोकांना दक्षिणेत पाठविले होते ते लोक महाराजांच्या निसटण्याची तयारी करण्यात गर्क होते. त्यांनी ठरवल्याप्रमाणे दोन घोडे आणि पोशाख एका आडबाजूला आणून ठेवला होता. महाराज जेव्हा पेटाऱ्यातून बाहेर आले तेव्हा त्यांनी सन्याशाचा वेष घेतला होता. कोणालाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी शंभूराजांना एका पंडिताबरोबर मथुरेला एका ओळखीच्या; परंतु विश्वासाच्या माणसाकडे पाठविले आणि स्वतः महाराज संन्याशाच्या वेषात आडमार्गाने दक्षिणेकडे निघाले.

फुलादखानाचे जेवण झाले तेव्हा त्याने आत जाऊन पाहिले तर महाराज पलंगावर एकटेच झोपले आहेत असे दिसले. त्यामुळे त्याला थोडासा संशय आला म्हणून त्याने जवळ जाऊन पलंगावरील चादर दूर करून पाहिले तर काय, तेथे लोड, तक्के, उशा ठेवलेले होते. ते बघून त्याच्या तोंडाला कोरड पडली. महाराज पसार झाले आहेत हे बघून औरंगजेब खूपच संतापला.

औरंगजेबाने लगेच अनेक हत्यारबंद हाशम घोडेस्वारांना शिवरायांना पकडून आणण्यासाठी पाठवले. परंतु महाराज त्यांच्या हाती लागणारच नव्हते. कारण ते चातुर्याने आपल्या मुलूखात पोहोचले देखील होते.

खरेच असे म्हणावे लागेल की, शिवाजीमहाराजांवरील मोठे संकट टळले व हिंदवी स्वराज्याचे ग्रहण सुटले.

Leave a Comment

x