शिवरायांचा विवाह | Shivrayancha Vivah Marathi Katha | Marathi Story

शिवरायांचा विवाह | Shivrayancha Vivah Marathi Katha

जिजाऊसाहेब, शिवबा व इतर सर्वजण सुखरूपपणे पुण्यात आले. बंगळूर, विजापूर पाहिले आणि शिवबांनी मनात स्वराज्य-स्थापनेची मुहूर्तमेढ रोवली. शहाजीराजांनी पुण्याला येताना अतिशय गुप्तपणे जी कामगिरी सांगितली होती त्यासाठी सर्वांनी कामास सुरूवात केली.

जिजाऊसाहेबांना त्याआधी सर्वात महत्वाचे कार्य करायचे होते आणि ते म्हणजे शिवबांचा विवाह. शहाजीराजांनी विवाहाला संमती दिलीच होती त्यामुळे लगेचच जिजाऊसाहेबांनी फलटणच्या नाईक-निंबाळकर घराण्यातील मुलीला मागणी घातली व अत्यंत आनंदाने निंबाळकरांनी त्या मागणीचा स्वीकार केला.

शिवबांच्या लग्नाची लाल महालात अत्यंत जोरदार तयारी चालू झाली. एका चांगल्या शुभमुहूर्तावर शिवबा व सईबाईंचा विवाहसोहळा अत्यंत आनंदात व थाटामाटात संपन्न झाला. त्यावेळी शिवबांचे वय फक्त दहा वर्षाचे होते आणि सईबाई या फक्त आठ वर्षाच्या होत्या.

शिवबांचा विवाह झाल्यावर जिजाऊसाहेब परत एका महत्वाच्या कार्याच्या दिशेने काम करावयास लागल्या. त्यांना माहित होते की शिवबा म्हणजे एक तेज आहे व तेजाला कधीही अंधारात कोंडता येणार नाही. शिवबांचा जन्मच श्रींचे राज्य स्थापन करण्यासाठी झाला होता, याची त्यांना खात्री झाली होती. शिवबांना गुलामगिरीत राहणे आवडत नाही हे देखील त्यांना माहित होते. हया सर्व गोष्टी लक्षात घेऊन जिजाऊसाहेब शिवबांना मार्गदर्शन करू लागल्या. जिजाऊसाहेबांना माहीत होते की, महाराष्ट्राची ताकद गड-किल्ल्यांत आहे आणि म्हणून येथील लोकांचे बळ आपल्या पाठीशी उभे केले तर हा बारा मावळ परगणा कोणापुढेही हार मानणार नाही. त्यासाठी त्यांनी शिवबाला योग्य मार्गदर्शन केले व शिवबा बरोबर योग्य त्या दिशेने निघाले.

शिवबा बारा मावळातील पाटील-देशमुखांना भेटू लागले व एकीचे बळ किती असते ते त्यांना पटवून देऊ लागले. बारा मावळातील दऱ्या-खोऱ्या, कडे-कपारी त्यातील चोरवाटा, खिंडी हे सर्व शिवबांनी आपल्या साथीदारांना बरोबर घेऊन पाहिले. शत्रू जर पाठीमागे लागला तर तेथून कसे निसटून जायचे हे देखील त्यांनी जाणून घेतले. शिवबांनी सर्वांना आवाहन केले की, ‘आपल्याला गुलामगिरीत ठेवणाऱ्या त्या परक्या सुलतानाच्या जिवावर ऊठा. जर त्याच्यापासून तुमचे रक्षण करण्यासाठी कोणी धावला तर त्याच्या पाठीशी तुमचे बळ उभे करा.’

शिवबांचे ते बोलणे ऐकून संगळयांच्या मनात उत्साह निर्माण होत असे. त्यांच्यातील आपुलकीच्या भावनेचा सर्वांवर प्रभाव पडत असे.

शिवबांनी हळूहळू सर्व मावळयांना आपलेसे केले. त्यांना सर्व तरूण साथीदार मिळू लागले. सर्वजण शिवबांसाठी जीव देण्यास देखील तयार होते. तेथील अनेक सामर्थ्यवान, वतनदार मंडळी शिवबांकडे आपला भावी राजा म्हणून पाहू लागले होते.

शिवबांनी सर्व तरूण, निष्ठावंत, कणखर मावळे या सर्वांना लढाईचे शिक्षण देण्याचे काम सुरू केले. त्यामध्ये भालाफेक, घोडेस्वारी, हत्यारे कशी चालवावी अशा अनेक गोष्टी होत्या. शत्रूच्या ताब्यातून रात्री-अपरात्री कसे निसटून जायचे, किंवा शत्रू समोर आला की त्याच्याशी सामना करायचा हे देखील त्यांनी शिकविले. शिवबांनी प्रत्येक मावळयाच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटविली. त्यामुळे शिवबा हे सर्वांच्या जीवाचे ताईत बनले व त्यांचा शब्द हे प्रमाण असे सर्वजण मानू लागले.

एकदा रांझे गावचा पाटील अतिशय दुष्ट होता. त्याने एका तरूण स्त्रीवर अत्याचार केला व त्यामुळे तिने नदीत जाऊन जीव दिला. हे शिवबांना समजल्यावर त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी लगेचच त्याला हात-पाय बांधून पुण्यात आणले व त्याची सर्व कसून चौकशी केली आणि त्याचा अपराध सिद्ध झाला तेव्हा शिवबांनी त्याचे हात-पाय तोडण्याची कडक शिक्षा त्याला दिली. या प्रसंगामुळे शिवबांना अन्यायाविषयी किती चीड आहे हे प्रजेला दिसून आले व त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर अधिकच वाढला. लोक त्यांना आता शिवराय असे म्हणू लागले.

शिवरायांवर आता जहागिरीचा संपूर्ण कारभार सोपविण्यात आला. शहाजीराजांनी त्यांच्या नावाची राजमुद्रा तयार करून त्यांना कारभार पहाण्याचे स्वातंत्र्य दिले. हीच राजमुद्रा शिवरायांनी आपल्या राज्याभिषेकानंतर देखील चालू ठेवली.

Leave a Comment

x