शिवरायांची न्यायबुद्धी | Shivrayanchi Nyayavidhi Marathi Katha | Marathi Story

शिवरायांची न्यायबुद्धी | Shivrayanchi Nyayavidhi Marathi Katha

शिवरायांनी जावळी खोरे स्वराज्यामध्ये सामील करून राज्यविस्तार केला म्हणून आदिलशहाकडे असणाऱ्या सरदारांना ते सहन झाले नाही. ते शिवरायांचा व्देष करीत असत व त्यांचा पराक्रम त्यांना सहन होत नव्हता. शिवरायांवर चाल करून जावे असे त्यांना वाटे, परंतु त्यासाठी जो आज्ञा देणार होता तो आदिलशहा शेवटचा श्वास घेण्याच्या मार्गावर होता.

तेव्हा शहाजीराजे कर्नाटकमध्ये होते. सुपे परगण्याची जहागीर अजून देखील त्यांच्या नावावर होती. सुप्याचा कारभार शिवरायांचे मामा पाहात होते, त्यांचे नाव मोहिते असे होते. मोहिते हे सुरवातीला सर्व कारभार चांगल्या रितीने पाहात होते परंतु नंतर मात्र ते कोणत्याही वाईट मार्गाने संपत्ती जमा करू लागले. त्यामुळे त्यांच्यावर प्रजा नाराज होती.

शिवरायांकडे प्रजेच्या अनेक तक्रारी आल्या होत्या त्यामुळे ते खूप चिडले. जेव्हा त्यांनी याविषयी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की, आपला मामाच लाचखाऊ आहे. त्यामुळे ते मनातून खूप दुःखी झाले. पैशासाठी हा माणूस जहागिरीदेखील शत्रूच्या ताब्यात देईल, हा विचार करून ते अस्वस्थ झाले.

शिवरायांनी एक दिवस सुपे परगण्यातील मोहितेमामांच्या गढीवर छापा घातला व त्यांची अमाप संपत्ती जप्त केली व त्यांना अतिशय कठोर शब्दात सांगितले, “मामाजी, जर तुमच्यासारखे घरचेच लोक जहागिरीच्या संपत्तीवर डोळा ठेऊ लागले, वाईट मार्गाने पैसा जमा करू लागले तर या राज्याचा खजिना काही दिवसात रिकामा होईलच परंतु कष्टाने मिळविलेले हे हिंदवी स्वराज्य देखील रसातळाला जाईल. ते काही नाही. तुम्ही आता कशाचाही मोह न ठेवता ताबोडतोब आपला सर्व गाशा गुंडाळा व दूर कर्नाटकात जाऊन राहा. जर तुम्ही परत स्वराज्यामध्ये पाऊल ठेवले तर आम्ही तुम्हाला कैदेत टाकल्याशिवाय राहणार नाही.”

धन्य ते शिवराय! गैरव्यवहार करणाऱ्या स्वतःच्या मामाची देखील शिवरायांनी दया केली नाही तर त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना तेथून घालवून दिले. शिवरायांच्या या वागण्यामुळे लाचखोर असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तर धाक निर्माण झालाच परंतु राजांची न्यायबुद्धी पाहून प्रजेचा ऊर देखील आनंदाने व अभिमानाने भरून आला. शिवरायांविषयीचा आदर सर्वांच्याच मनात अजूनच वाढला आणि त्यांची किर्ती दूरपर्यंत पसरली.

Leave a Comment

x