सोन्याचे आंबे | Sonache Aambe Marathi Katha

सोन्याचे आंबे | Sonache Aambe Marathi Katha

राजा कृष्णदेवराय यांची आई गंभीरपणे आजारी पडली.

वृध्दापकाळामुळे आणि शारीरीक व्याधीमुळे राज्यात उपलब्ध असलेल्या चांगल्यात चांगल्या औषधांना ती प्रतिसाद देत नव्हती. जेव्हा ती मृत्यूशय्येवर होती तेव्हा तिने, ‘ब्राम्हणांना आंबे दान करावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.’ ती असे समजत होती की, अशा प्रकारचे दान केल्याने तिला स्वर्ग प्राप्त होईल पण काही दिवसातच आपली इच्छा पूर्ण न करता तिचा मृत्यू झाला. तिची इच्छा अपूर्ण राहण्या मागचे कारण म्हणजे तो आंब्याचा हंगाम नव्हता. संपूर्ण राज्य महाराजांच्या आईच्या मृत्यूमुळे दुःखात बुडाले होते.

राजाला अत्यंत वाईट वाटत होते, की तो आपल्या आईची इतकी साधी आणि शेवटची इच्छा पण पूर्ण करू शकला नाही. त्याला काळजी वाटत होती की जो पर्यंत आपल्या आईची शेवटची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.

त्यानंतर राजाने राज्यातील सर्व विद्वान ब्राम्हणांना बोलविले आणि आपल्या आईच्या शेवटच्या इच्छेबद्दल सांगितले.

त्यावर काही वेळ शांत राहून ब्राम्हण बोलले, ‘महाराज! हे तर खूपच वाईट झाले. शेवटची इच्छा पूर्ण नाही झाली तर त्यांना मुक्ती मिळणार नाही व त्यांचा आत्मा भटकत राहील. महाराज तुम्हाला त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी उपाय करावा लागेल.’

तेव्हा महाराजांनी आईची अंतिम इच्छा पूर्ण करण्याचा उपाय विचारला.

ब्राम्हण बोलले ‘त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तुम्ही त्यांच्या पुण्यतीथीला सोन्याचे आंबे ब्राम्हणांना दान करा.’

राजा या गोष्टीला सहजपणे तयार झाला. व आईच्या पुण्यतिथीला काही ब्राम्हणांना भोजनासाठी बोलविले आणि प्रत्येकाला एक सोन्याचा आंबा दान म्हणून दिला. जेव्हा हे तेनालीरामला समजले तेव्हा त्याच्या लगेच लक्षात आले की, ब्राम्हण लोक हे राजाच्या भोळेपणा व साधेपणाचा फायदा घेत आहेत. त्यामुळे त्याने ब्राम्हणांना धडा शिकवण्यासाठी योजना तयार केली.

काही काळानंतर तेनालीरामने ब्राम्हणांना निमंत्रण पाठविले, त्यात लिहिले होते की तेनालीराम पण आपल्या आईच्या पुण्यतिथिला दान करू इच्छित आहे कारण त्यांच्या आईची पण मृत्यूआधी एक अपूर्ण इच्छा राहिली होती. जेव्हापासून त्याला माहिती पडले आहे की आपल्या आईची इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्या आईचा आत्मा भटकत असेल त्यामुळे तो खूप दुःखी होता व लवकरात लवकर आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी असे त्याला वाटत होते. ब्राम्हणाने विचार केला की तेनालीरामच्या घरीपण आपल्याला खूप जास्त दान मिळेल कारण तो एक राजदरबारातील श्रीमंत माणूस आहे.

सर्व ब्राम्हण ठरलेल्या दिवशी तेनालीरामच्या घरी पोहोचले. तेव्हा तेनालीराम त्यांची वाटच बघत होता. ते ब्राम्हण आसनस्थ झाल्यावर तेनालीरामने सर्व दारे व खिडक्या बंद केल्या.

‘कृपया, थोडा वेळ प्रतिक्षा करा. मी काही तयारी करत आहे.’ असे बोलत तेनालीरामने काही लोखंडाच्या सळया आगीत ठेवल्या आणि त्यांना गरम करण्यास सुरूवात केली.

पुरोहित व ब्राम्हण काकुळतीने बघत होते. त्यांना काही तरी विचित्र वाटत होते. त्यांना अशी अपेक्षा होती की तेनालीराम आपल्याला स्वादिष्ट भोजन आणि योग्य ते मानधन देईल. पण, तिथे असे काहीही चिन्ह दिसत नव्हते. खूप वेळ वाट बघितल्यानंतर त्यांचा धीर सुटत चालला होता. त्यांच्यातील एक ब्राम्हण बोलला ‘तेनालीराम, तुझा उद्देश समजून घेण्यासाठी आम्ही अपयशी ठरलो आहोत तू आम्हाला तुझ्या आईच्या पुण्यतिथिला संस्कार करण्यासाठी बोलविले आहे. आम्ही कधीचे निष्क्रिय बसलेलो आहोत, आणि तू लोखंडी सळया गरम करीत आहेस. याचे आणि संस्काराचे काही संबध नाही.’

‘नाही, याचा संबंध आहे.’ तेनालीराम बोलला माझी आई संधिवाताच्या आजाराने त्रस्त होती जेव्हा ती मृत्यूशय्येवर होती. ती खूप दुःख सहन करत होती. ती मला म्हणायची ‘की लोखंडी सळई गरम करून दुखण्याच्या जागेवर लाव.’ त्यामुळे तिला खरोखरच आराम वाटायचा. एक दिवस, तिच्या शेवटच्या दिवशी तिला संधीवाताचे बरेच झटके आले आणि तिने मला लोखंडी सळई गरम करून देण्यास सांगितली. मी सळई गरम करायला ठेवली आणि गरम सळई तिला देण्याच्या आधी तिने प्राण सोडले. मला अतिशय वाईट वाटले की मी तिची शेवटची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, तिचा आत्मा पृथ्वीवर नेहमी भटकत राहिल. तो मुक्त करणे आवश्यक आहे. मला खात्री आहे, की या गरम सळया तुमच्या सर्वांच्या शरीरावर लावल्यानंतर नक्कीच तिला आराम मिळेल व तिचा आत्मा मुक्त होईल.

सर्व ब्राम्हण खूप नाराज झाले व मृत्यूला घाबरायला लागले.
शेवटी ब्राम्हण बोलले ‘तेनालीराम तू एक अतिशय हुशार व्यक्ती आहेस. तू अशी अपेक्षा कशी करू शकतोस की आमच्या शरीरावर गरम केलल्या लोखंडी सळया लावल्याने तुझ्या आईच्या आत्म्याला मुक्ती मिळेल? या सिध्दांताला काही आधार नाही.’

या सिध्दांताला आधार कसा नाही? तेनालीराम थोडया रागात बोलला. ‘जर राजाच्या आईच्या आत्म्याला तुम्ही सर्वांनी सोन्याचे आंबे घेवून मुक्ती मिळू शकते, तर माझ्या आईच्या आत्म्याला तुम्ही गरम केलेल्या सळयांचे डाग लावून घेतल्याने मुक्ती का मिळू शकत नाही?’

आंब्याचे दान देणे ही राजाच्या आईची शेवटची इच्छा होती, तसेच लोखंडाच्या सळयांचे डाग घेणे ही माझ्या आईची शेवटची इच्छा होती. हाच तो फरक. पण दोघांमध्ये एकच साम्य आहे, ते म्हणजे आत्म्याची मुक्तता.

हे ऐकून ब्राम्हण खूप नाराज झाले.

तेनालीराम ब्राम्हणांना बोलला ‘यावरून तुम्हाला धडा मिळालाच असेल. जर तुम्हाला तुमच्या कृतीची जाणीव झाली असेल तर, तुम्ही राजांकडे जावे व त्यांच्याकडून घेतलेले सोन्याचे आंबे त्यांना परत करावे व त्यांची माफी मागावी.’

जेव्हा ते ब्राम्हण राजाकडे आंबे घेवून गेले व त्यांनी घडलेला सर्व प्रकार राजाला सांगितला व माफी मागितली. राजाने तात्काळ तेनालीरामला बोलविणे पाठविले.

‘तू असे का केले?’ राजाने विचारले.

महाराज, हे ब्राम्हण तुमच्याविषयी निष्ठावंत नाही त्यांनी तुमची फसगत केली आहे. जेव्हा ते राजाची फसवणूक करू शकतात, तेव्हा ते तुमच्या राज्यातील सर्वसामान्य व्यक्तींचीपण फसवणूक करू शकतात. मी हे असे फक्त त्यांना धडा शिकविण्यासाठी केले. मला फक्त त्यांचे हृदय परिवर्तन करायचे होते.

राजा म्हणाला, ‘तेनालीराम जे बोलला ते योग्य आहे. मी त्याच्याशी सहमत आहे.’

त्यानंतर राजाने ब्राम्हणांना सोन्याचे आंबे परत केले. राजा एकदा दिलेल्या वस्तु परत घेत नाही. परंतु भविष्यात कोणाचीही फसगत करू नका व लोभी बनू नका अशी सुचना ब्राम्हणांना केली.

राजाने तेनालीरामला त्यांचे डोळे उघडल्याबद्दल बक्षिस दिले. “

Leave a Comment

x