शिवरायांना राज्याभिषेक | Marathi Katha | Marathi Story

शिवाजी महाराजांना आपल्या हातातून एक अतिशय मौल्यवान असा मोहरा निखळला, याचे अत्यंत दुःख झाले. पण ते त्यांचे कर्तव्य पार पाडायला मात्र विसरले नाहीत. ते तानाजींच्या कोकणातील उमराठे या गावाला गेले. तेथे गेल्यावर महाराजांनी तानाजींच्या कुटुंबियांचे सात्वंन केले आणि स्वतःच पुढाकार घेऊन तानाजींच्या रायबाचे लग्न लावून दिले.

महाराज गडावर परत आले. गडावर आल्यावर एक-एक आनंदाच्या बातम्या येत होत्या. वीर मावळयांनी मोगली सरदारांचा पराभव केला होता. त्यांच्या ताब्यातील संपत्ती घेऊन ते राजगडावर आले होते त्यामुळे स्वराज्याचा खजिना संपत्तीने तुटुंब भरला.

महाराजांच्या राणी सोयराबाईंनी याच वेळी पुत्ररत्नाला जन्म दिला. बाळराजांचे नाव राजाराम असे ठेवण्यात आले. महाराजांनी आपल्या वीर मावळयांना परत शत्रूवर चाल करण्यास पाठवून दिले. या वीरांनी आपल्या तलवारीच्या करामती दाखवत पुरंदरच्या तहात गमविलेले गड-कोट आणि त्यालगतचा मुलूख जिंकून पुन्हा स्वराज्यात सामील केला.

स्वराज्याचा विस्तार आता झपाटयाने होऊ लागला होता आणि भरभराट देखील होत होती. महाराजांचा वचक आणि दरारा आता वाढला होता. सर्व लोक महाराजांच्या पराक्रमाने थक्क झाले होते. यावेळी महाराजांचे सर्व सहकारी अजून एक विचार करत होते तो असा की, परकीय सत्ताधीशांनी हिंदुस्तानातील सर्व प्रजेला जुलूम, जबरदस्ती आणि अत्याचार करून अगदी त्रासून सोडले होते. तेव्हा प्रजेला कोणी वाली उरला नव्हता. अशा वेळी शिवरायांनी आपल्या शक्तीने आणि युक्तीने दक्षिणेत स्वराज्याची स्थापना करून या प्रदेशातील लोकांना सुखाचे दिवस दाखविले होते.

खरोखरच, शिवरायांच्या रूपाने जणू महाराष्ट्रात युगपुरूष अवतरला होता असेच म्हणावे लागेल आणि म्हणून या पुरूषोत्तमाला आता राज्याभिषेक करावा आणि समस्त राजे, सुलतान, यांच्याकडून त्यांना राजा म्हणून मान्यता मिळावी, असे सर्वांना वाटू लागले होते. यासाठी त्यांनी सर्वांनी महाराजांची मान्यता देखील मिळविली होती.

आता जोरात राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. राजगडाला राजधानीचा मान देण्यात आला. त्यामुळे सगळीकडे कसे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. महाराजांसाठी सोन्याचे रत्नजडित सिंहासन बनविण्यात आले. तसेच रत्न-माणकांचा कशिदा केलेले, मोत्यांच्या झालरी लावलेले पांढरेशुभ्र छत्र-चामर बनविण्यात आले. सेवकांनी सागराच्या आणि सात पवित्र नद्यांच्या पाण्याने भरलेले सुवर्णकुंभ गडावर आणले. काशीच्या गागाभट्टांचे रायगडावर आगमन झाले. राज्याभिषेक सोहळयासाठी, पंडित, राजे, सुलतान, कलावंत यांना आमंत्रण देण्यात आले.

राज्याभिषेकाचा शुभदिन उगवला. रायगडाच्या सभोवताली शामियाने उभारण्यात आले. गडावर अतिशय टोलेजंग असा महामंडप उभारण्यात आला. सोन्याच्या चौरंगावर शिवराय, महाराणी सोयराबाई आणि युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. प्रमुख आचार्य गागाभट्ट आणि त्यांच्या बरोबर असलेल्या पुरोहितांनी मंत्रोच्चारास प्रारंभ केला. राज्याभिषेकाचे विधी सुरू झाले.

महाराज, महाराणीसाहेब आणि युवराज यांना राजवस्त्रे देण्यात आली. प्रथम महाराजांनी उच्चासनावर बसलेल्या माँसाहेबांना नमस्कार केला आणि महाराज सिंहासनावर बसले व त्यांच्या शेजारी युवराज आणि महाराणीसाहेब बसल्या. काही मंत्रोच्चार होताच गागाभट्टांनी महाराजांवर छत्र धरून गजर केला-

“क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती महाराजांचा विजय असो!”

घोषणा संपल्यावर महाराज, महाराणीसाहेब आणि युवराजांवर पुष्पवर्षाव करण्यात आला. तेव्हा गडाच्या बुरूजांवरील तोफा कडाडल्या. शिवप्रभू छत्रपती झाले याचा संदेश तोफांनी सगळया आसमंतात घुमविला. खरोखरच हा एक शुभदिन म्हंटला पाहिजे आणि हा शुभदिन म्हणजे ६ जून १६७४ होय.

शिवप्रभू ‘छत्रपती’ झाले अशी घोषणा होताच उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी महाराजांना नजराणे, भेटी पेश केल्या. या समारंभाला इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी परकीय देखील उपस्थित होते. त्यांनी देखील महाराजांना नजराणे दिले. यानंतर छत्रपतींनी देखील तेथील उपस्थित पाहुण्यांना मौल्यवान भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार केला. याच दिवसापासून शिवशक सुरू होऊन महाराज शककर्ते शिवछत्रपती झाले.

माँसाहेबांनी हा सगळा सोहळा पाहिला आणि त्यांना खूप आनंद झाला. आपल्या पोटी असा अलौकिक पुत्र जन्माला आला या भावनेने माँसाहेबांनी शिवरायांना आपल्या हृदयाशी धरून त्यांच्यावर आनंदाश्रूंचा अभिषेक केला. आपल्या पुत्राचा राज्याभिषेक झालेला पाहाताच त्यांना त्यांचे स्वप्न साकार झाल्याचे दिसले व खूप आनंद झाला.

Leave a Comment