स्वराज्याचा झेंडा | Marathi Katha | Marathi Story

शिवरायांनी तोरणा गड घेतला आणि त्यामुळे प्रजेला स्वराज्य आता जवळ आले आहे असे वाटू लागले होते. लोकांना शिवराय आपलेसे वाटू लागले म्हणून लोक शिवरायांना ‘राजे’ असे म्हणू लागले होते.

राजगड स्वराज्याची राजधानी झाली असल्याची बातमी सगळीकडे पसरली. सर्व लोकांना खूपच आनंद झाला. परंतु काही लोकांना राजांचे हे कर्तृत्व सहन झाले नाही. काही परकीय जे सुलतानाच्यापुढे हाजी हाजी करणारे होते त्यांना राजांचा मत्सर वाटू लागला होता. आजपर्यंत जे कोणाला शक्य झाले नाही ते हा एवढासा मुलगा काय करणार? ही गोष्ट त्यांना रूचली नाही.

हे लोक तक्रार करण्यासाठी शिरवळला गेले व तेथे आदिलशाही ठाणे अंमलदार अमीन रहीम अहमद याला त्यांनी सांगितले, “शहाजीराजांच्या मुलाने तोरणा आणि मुरूंबगड ताब्यात घेतले आणि त्याने गडाची डागडुजी देखील केली आहे. तो तेथे स्वतःचे राज्य स्थापन करण्यासाठी हालचाल करतो आहे.”

अमीनमियाला या गोष्टीतील गांभीर्यच कळाले नाही. स्वराज्य स्थापणे म्हणजे पोरखेळ नाही. समजा गडाची डागडुजी केली तर ते चांगलेच आहे. आपल्या ताब्यात आयताच सज्ज झालेला गड आला तर चांगलेच आहे. तो एवढासा शिवाजी त्याला आवरणे काही कठीण गोष्ट नाही असे अमीनमियाला वाटले.

इकडे बारा मावळातील पाटील, देशमुख राजांना सामील झाले. त्यांनी शेतसारा स्वराज्याच्या खजिन्यात भरण्यास सुरूवात केली. ठाणे अंमलदार अमीनकडे कोणीही शेतसारा भरण्यास तयार नव्हते. हा प्रकार पाहून अमीन खूपच संतापला त्यामुळे त्याने एक सांडणीस्वार विजापुरला पाठविला, त्यात त्याने शिवाजीने गड कसा ताब्यात घेतला व त्यात कोण कोण सामील झाले, याची नावासह माहिती पाठविली. त्यात त्याने लोकांनी शेतसारा भरण्याचे देखील बंद केल्याचे सांगितले आणि म्हणून एखाद्या सरदारास शिबंदीसह शिवाजीचे पारिपत्य करण्यासाठी पाठवावे, असेही सांगतिले.

आदिलशहाला हे सर्व कळाल्यावर तो फार संतापला व त्याने शहाजीराजांना बोलवून त्याविषयी विचारले. तेव्हा शहाजीराजांनी शांतपणे सांगितले, “अहो, शिवाजी असे का व कशासाठी करेल? त्याने किल्ला घेऊन आपल्याच जहागिरीचे रक्षण केले आहे त्यामुळे आपण अजिबात चिंता करू नये.”

शिवाय त्यात भर म्हणून शिवरायांनी देखील आदिलशहाला पत्र पाठवून गोड शब्दात तेच सांगितले त्यामुळे आदिलशहा शांत झाला. परंतु त्याने बारा मावळातील पाटील व देशमुख यांना फर्मान पाठवून शिवरायांना मदत करू नये असे लिहिले होते, त्याचबरेाबर शेतसारा देखील आदिलशाही खजिन्यात भरण्यास सांगितले.

आदिलशाहाचे सरदार दक्षिणेतील लढाईत गुंतलेले असल्यामुळे शिवरायांचे पारिपत्य करण्यास कोणीही सरदार तेथे नव्हता. शिवरायांचे पारिपत्य म्हणजे अतिशय किरकोळ असेही त्याला वाटत होते.

पाटील-देशमुखांप्रमाणेच नरसू प्रभू यांना देखील आदिलशाही फर्मान आले त्यामुळे ते घाबरले. त्यांनी लगेच मुलाला शिवरायांकडे पाठविले. शिवरायांनी त्यांची समजूत घातली.

आपण सर्वांनी स्वराज्याची शपथ घेतली आहे. श्रींच्या इच्छेनेच ‘आपण स्वराज्य स्थापन केले आहे त्यामुळे यात घाबरण्यासारखे काही नाही. श्रींचा आशीर्वाद असल्यामुळे विजय आपलाच होणार आहे.’

शिवरायांचा हा निरोप त्याने वडीलांना सांगितला. त्यामुळे नरसू प्रभूंचे समाधान झाले. त्यांनी तेव्हापासून प्रतिज्ञा केली की, परक्यांच्या गुलामीत जगण्यापेक्षा राजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात जगू. त्यातच आमच्या जन्माचे सार्थक होईल.’

सर्व मावळ खोरे शिवरायांच्या पाठीशी उभे राहिले. शिवराय स्वतः सर्व कामांत लक्ष देऊ लागले. न्याय-निष्ठुरतेने निर्णय व्हायला लागले. तोरण्यावर स्वराज्याचा जसा झेंडा फडकला तसेच इतर ठिकाणी देखील स्वराज्याचे झेंडे फडकले.

Leave a Comment