उमा म्हणे यज्ञी माझे | Uma Mhane Yadni Maze Marathi Lyrics
गीत – ग. दि. माडगूळकर
संगीत – वसंत पवार
स्वर – सुमन कल्याणपूर
चित्रपट – मानिनी
मानभंग हाचि झाला मंडपी आहेर
उमा म्हणे, यज्ञी माझे जळाले माहेर
माहेरीच्या सोहळ्यांत,
नाहि निमंत्रिले जामात
चहू दिशी चालू होते संपदेचे थेर
लक्ष्मीचे जमले दास
पुसे कोण वैराग्यास
लेक पोटीचीही झाली कोपर्यात केर
आईबाप, बंधुबहिणी,
दारिद्र्यात नसते कोणी
दीन दानतीचे सारे धनाचे कुबेर
दक्षसुता जळली मेली,
नवे रूप आता ल्याली
पित्याघरी झाला ऐसा दिव्य पाहुणेर
परत सासुर्याशी जाता,
तोंड कसे दावू नाथा
बोल ईश्वराचे झाले सत्य की अखेर
प्राणनाथ करिती वास,
स्वर्गतुल्य तो कैलास
नाचतात सिद्धी तेथे धरूनिया फेर
असो स्मशानी की रानी,
पतीगृही पत्नी राणी
महावस्त्र तेथे होते सतीचे जुनेर