वीर अभिमन्यू | Veer Abhimanya Marathi Katha
Veer Abhimanya Marathi Katha: कुरुक्षेत्रावर कौरवपक्षाकडील रथी-महारथींशी प्राणपणाने झुंज देऊन वीरमरण पत्करणारा अभिमन्यू हा अर्जुन आणि सुभद्रा यांचा मुलगा होता. तो अर्जुनासारखाच शूर होता. त्याला सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचे सखोल ज्ञान होते. त्या बालवीराने दाखवलेल्या शौर्याची तुलनाच होऊ शकत नाही.
कौरव-पांडवांचे युद्ध झाले, त्या वेळी द्रोणाचार्य कौरवांचे सेनापती होते. पांडवांच्या सेनेकडून सतत पराभव पत्करावा लागल्यामुळे ते दु:खी होते. पांडवांचा पराभव करण्यासाठी द्रोणाचार्यांनी आपल्या सैन्याची चक्रव्यूह रचना केली. अर्जुन आणि श्रीकृष्ण यांविना कोणालाही हा चक्रव्यूह भेदून जाता येणार नाही, हे द्रोणाचार्यांना ठाऊक होते. श्रीकृष्णाने हाती शस्त्र धरणार नाही, अशी प्रतिज्ञा केली होती आणि अर्जुन युद्धभूमीपासून दूर लढाईत गुंतला होता. आता काय करावे ? पांडव चिंतेत पडले. एवढ्यात अभिमन्यू पुढे आला नि धर्मराजांना म्हणाला, ”काका, मला आज्ञा द्या, मी हा चक्रव्यूह भेदून आत प्रवेश करीन. आपण काळजी करू नये.”
धर्मराजांना अभिमन्यूचा पराक्रम ठाऊक होता; पण लहान मुलाला कशी परवानगी द्यावी, हे कळेना. अभिमन्यूच्या हट्टापायी मोठ्या नाईलाजाने त्यांनी त्याला परवानगी दिली. त्या वेळेला अभिमन्यू केवळ सोळा वर्षांचा होता.
धर्मराज आणि अन्य पांडव यांचा आशीर्वाद घेऊन अभिमन्यू कौरव सेनेने रचलेल्या त्या चक्रव्यूहात शिरला. त्याच्यासमवेत त्याचे सैन्य होते. लढत लढत तो फार पुढे गेला. त्याची आणि सैन्याची चुकामुक झाली, तरी तो सारखा पुढे पुढे जात राहिला. अभिमन्यूने हत्ती, घोडे, सैन्य यांचा नाश चालवला. त्याने द्रोणाचार्य आणि इतर वीरांना फार त्रासवून सोडले. त्याचे शौर्य पाहून कौरवही आश्चर्यचकित झाले. अभिमन्यू लढता लढता बेशुद्ध पडला. तशा अवस्थेत असतांना दु:शासनाने त्याच्यावर गदेचा प्रहार केला. तेव्हा अभिमन्यूचा अंत झाला.
अभिमन्यू मरण पावला असतांना जयद्रथाने त्याच्या डोक्यावर लाथ मारली. मोठमोठ्या वीरांना भारी पडणारा चिमुकला वीर अभिमन्यूच्या शवाला अनादराने लाथ मारल्यामुळे पांडवांना राग आला. त्याच क्षणी अर्जुनाने जयद्रथाला दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी ठार मारण्याची प्रतिज्ञा केली. त्याप्रमाणे प्रतिज्ञा पूर्ण करून अर्जुनाने आपल्या पुत्राच्या वधाचा सूड घेतला.
तात्पर्य :- शौर्य आणि धैर्य असावे, तर असे. अभिमन्यूने लहान वयातच अतुलनीय पराक्रम गाजवला. कुठलीही गोष्ट शौर्यानेच प्राप्त होते.
मित्रांनो तुम्हाला Veer Abhimanya Marathi Katha हि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.