कृत्रिम पाऊस कसा पाडला जातो?

कृत्रिम पावसाची प्रक्रिया म्हणजे ढगात मोठ्या आकाराचे बीजरोपण करून नैसर्गिकरित्या पडणाऱ्या पावसाची प्रक्रिया उत्तेजित करणे. त्यासाठी मेघबिजन केले जाते. उष्ण ढगांत १४ मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराचे मेघ-बिंदू जेव्हा नसतात त्यावेळेस ते तयार होण्यासाठी त्या ढगांत सोडियम क्लोराइड म्हणजेच मिठाच्या ४-१० मायक्रॉन त्रिजेच्या आकाराच्या पावडरचा ढगांच्या पायांमधील उर्ध्व स्रोत असलेल्या भागात फवारा करतात. मिठाला पाण्याचे आकर्षण असते. हे फवारलेले मिठाचे कण ढगात पसरतात. ढगातील बाष्प शोषून त्यांचा आकार १४ मायक्रॉनपेक्षा वाढतो. यामुळे ढगांतून पाऊस पडायला सुरवात होते. शीत मेघात जेंव्हा हिम कण तयार होण्यासाठी लागणाऱ्या केंद्र बिंदूंचा अभाव असतो त्यावेळेस त्या ढगावर वरून सिल्वर आयोडाइडच्या कणांचा फवारा केला जातो. या कणांचा आकार हिम स्फटिकासारखा असतो. त्यामुळे त्यावर हिम कण वेगाने तयार होवून वाढू लागतात. त्यांचा आकार पुरेसा वाढला की खाली जमिनीकडे झेपावतात. अशा रीतीने जो ढग पाऊस देण्यास असमर्थ होता, त्या ढगातून पाऊस पडता येतो.

ढगांत एका ठरावीक आकाराचे मिठाचे कण किंवा सिल्वर आयोडाइडचे कण फवारणे म्हणजे मेघबीजन. यासाठी डोंगर माथ्यावर जनित्र बसवून या पदार्थांचा फवारा ढगांत सोडला जातो. या प्रक्रियेत ढग हे जमिनीपासून फार उंच असतील तर फवारलेले पदार्थ ढगांच्या विशिष्ठ भागात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे ही पद्धत फारशी चांगली नाही. दुसऱ्या प्रकारात रॉकेटचा उपयोग केला जातो. रॉकेटमध्ये मेघबीजनाचे पदार्थ भरून त्याचा मारा ढगावर केला जातो. ही पद्धत चीन मध्ये सर्रास वापरतात. यामध्ये ढगांच्या विशिष्ठ भागात आपल्याला बीजरोपण करायचे याचे नियंत्रण राहत नाही म्हणून ही पद्धत फारशी वैज्ञानिक नाही.

तिसरी आणि पूर्णपणे वैज्ञानिक पद्धत म्हणजे प्रत्यक्ष विमानातून उष्णढगांच्या पायथ्याशी जावून जेथे उर्ध्व स्रोत आहेत तेथे रासायनिक नरसळ्या फोडून मिठाची फवारणी करणे किंवा शीत मेघात गोठण बिंदूच्या वर जाऊन सिल्वर आयोडाइड च्य रसायनाची नळकांडी फोडणे. यासाठी ढगांची निरीक्षणे रडारने केली जातात. ढगांचे आकारमान, असलेला मेघ बिंदूंचा साठा, ढगांची उंची यावरून कुठल्या प्रकारचे मेघबीजन करायचे आहे ते ठरवले जाते. त्याप्रमाणे वैमानिक त्या ढगांत जावून नळकांडी फोडून मेघबिजन करतात. त्यायोगे त्या ढगांत थांबलेली नैसर्गिकरित्या पाऊस पडण्याची प्रक्रिया उत्तेजित करतात.

Leave a Comment