बांधकामात सिमेंट बरोबर लोंखंडी गज का वापरतात? | why steel is used in construction in Marathi

जेव्हा सिमेंट, खडी, वाळू आणि पाणी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण केले की त्यापासून आपल्याला हव्या त्या ग्रेड चे काँक्रिट बनवता येते.

ज्याला आपण आर.सी.सी म्हणतो ते रेनफोर्सड सिमेंट काँक्रिट हे काँक्रिट आणि लोखंडी गज (रीबार) या दोन मुख्य घटकांपासून बनते. यातील काँक्रिट हे कॉम्प्रेशन फोर्स (दबाव) घेण्यात अतिशय उत्तम असते परंतु ते टेन्शन फोर्स (तणाव) घेण्यात अतिशय कमकुवत असते. तर रीबार हे कॉम्प्रेशन फोर्स (दबाव) आणि टेन्शन फोर्स (तणाव) घेण्यात अतिशय समर्थ असते. कुठल्याही इमारतीवर टेन्शन आणि कॉम्प्रेशन फोर्स हे सदैव येतच राहतात. जर आपण इमारतीचे बांधकाम नुसत्याच काँक्रिट मध्ये केले तर कल्पना करा की टेन्शन फोर्स आल्याबरोबर काँक्रिट चे ब्रीटल फेल्युअर होईल सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास काँक्रीटचा अक्षरशः भुगा होईल.तुम्ही अशा बांधकामात रहात असाल तर तुम्हाला काही समजण्याच्या आत तुमच्या डोक्यावरच्या बीमचा क्षणभरात भुगा होईल आणि त्यानंतर त्यावर असणारा स्लॅब तुमच्या अंगावर कोसळेल. हे सर्व इतक्या झटपट घडेल की तुम्हाला तुमचा जीव वाचविण्याची एक संधीही मिळणार नाही.

शिवाय जेव्हा कधी भूकंप घडतो तेव्हा इमारतीवर क्षितिजाला समांतर अशा भूकंपीय लहरी मुळे फोर्सेस येतात. त्या फोर्सेस मुळे इमारतीवर मोठ्या प्रमाणावर टेन्शन येते. टेन्शन फोर्सेस चा प्रतिकार करायचा झाल्यास त्या इमारतीत लवचिकता (डक्टीलिटी) असावी लागते. ही लवचिकता देण्याचे काम रिबार करते.

त्यामुळेच काँक्रिट आणि लोखंडी गज (रीबार) हे इमारत बांधकामाचा प्राणवायु आहेत. त्यातल्या त्यात लोखंडी गज (रीबार) न टाकणे अथवा आवश्यकतेपेक्षा कमी प्रमाणात टाकणे ह्या सारखा दुसरा गंभीर गुन्हा असूच शकत नाही कारण असे करणे म्हणजे सदोष मनुष्यवध करण्यापेक्षा कमी नव्हे.

Leave a Comment

x