युधिष्ठिराने जगाला दिलेला सत्याचा धडा | Marathi Katha | Marathi Story

युधिष्ठिराने जगाला दिलेला सत्याचा धडा

भीष्माचार्यांच्या सर्व काही लक्षात आले, म्हणून त्यांनी पांडवांची शिक्षणासाठी वेगळी व्यवस्था केली. सर्व राजपुत्रांसाठी त्यांनी शिक्षक ठेवले.

त्यांना सर्वांना एकदा धर्माचार्यांनी पाठ दिला- “सत्यं वद, धर्मं चर, स्वध्यायान्मा प्रमद।” म्हणजेच खरे बोला, धर्माने वागा, अभ्यासात कमतरता करू नका.

सर्वांचा तो दिलेला पाठ तयार झाला. परंतु युधिष्ठिराला मात्र तो पाठ करण्यासाठी तीन दिवस लागले. म्हणून गुरूजींनी त्याला विचारले, “तुला एवढयाशा साध्या धडयाला तीन दिवस लागले?”

युधिष्ठिर त्यांना म्हणाला, “तो धडा फारच कठीण आहे. मी मनाशी ठरवले असताना देखील खोटे बोललोच. पण कालपासून मात्र मी एकदाही खोटे बोललो नाही, आणि म्हणूनच मी माझा पाठ झाला आहे, असे आज म्हणू शकतो.”

गुरूजी त्याला म्हणाले, “युधिष्ठिरा! शाब्बास, मी तुझ्यावर फार खुश झालो आहे. तू आज मला व जगाला धडा शिकविला आहेस. शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची नाही, तर त्याप्रमाणे वागले पाहिजे.”

कौरव-पांडव एकदा खेळत असताना तेथे अचानक एक मोठा बैल आला. सगळेजण घाबरले व पळाले. भीमाने त्या बैलाला अडविले व खाली पाडले. ते पाहून सर्वांनी त्याचे कौतुक करण्यासाठी टाळया वाजविल्या. परंतु दुर्योधन दुशाःसनाला म्हणाला, “एका बैलाने बैलाला पाडले, त्यात काय मोठे नवल? या भीमाला नांगराला जुंपले पाहिजे.”
द्रोणाचार्य हे धनुर्विद्या शिकवित होते. ते अर्जुनावर अतिशय प्रसन्न होते. कारण अर्जुन कोणतेही काम करताना अगदी मन लावून करत असे.<br><br>

द्रोणाचार्यांनी एकदा एका उंच झाडावर पेंढा भरलेला भास पक्षी टांगला. सर्व शिष्यांना एका ओळीत उभे करून त्यांना आज्ञा केली. “सिध्द!”<br><br>

असे म्हटल्याबरोबर सर्वजण धनुष्यबाण सरसावून तयार झाले.

द्रोणाचार्य त्यांना म्हणाले, “तुम्हाला तो पक्षी दिसत आहे ना. त्याच्या डोळयात बाण मारायचा आहे.”

त्यांनी एकेकाला विचारले, “तुला काय दिसते?”

सगळयांनी त्यांना ढग, आकाश, पलीकडचे झाड, झाडाच्या फांद्या, रस्ता, रस्त्यावरची माणसे, दिसत आहे, अशी उत्तरे दिली.

तेव्हा गुरूजींनी त्यांना बाण मारायला सांगितला. त्यांचा सर्वांचा नेम चुकला.

नंतर गुरूजींनी अर्जुनाला विचारले, “तुला काय दिसते?”

अर्जुन त्यांना म्हणाला, “मला पक्ष्याचा डोळा व माझ्या बाणाचे टोक दिसते आहे, याव्यतीरिक्त काहीच दिसत नाही.”

गुरूजी म्हणाले, “मार बाण!”

अर्जुनाने बाण बरोबर त्या पक्ष्याच्या डोळयावर सोडला व त्याचा डोळा फोडला.

गुरूजी प्रसन्न होऊन त्याला म्हणाले, “शाब्बास, यालाच एकाग्रता असे म्हणतात. ज्याला ही एकाग्रता साधते, त्यालाच जीवनात यश मिळते. तू सर्वश्रेष्ठ असा धनुर्धर होशील, असा मी तुला आशीर्वाद देतो.”

ते ऐकल्यावर सूतपुत्र कर्ण म्हणाला, “अर्जुनाला गुरूजींनी कारण नसताना लाडावून ठेवले आहे. मी त्याच्यापेक्षा जास्त कुशल धनुर्धर आहे.”

कर्णाचे ते बोलणे दुर्योधनाला फार आवडले.

त्यामुळे लवकरच दुर्योधन, दुःशासन व कर्ण यांच्यात खूप घट्ट मैत्री झाली.

Leave a Comment

x