Bhau Kadam Biography in Marathi | Bhalchandra Kadam | भाऊ कदम

भालचंद्र कदम, रंगभूमीपासून, छोट्या पडद्यापासून, अगदी मोठ्या पडद्यापर्यंत स्वतःचा दबदबा निर्माण करणारा हा विनोदी नट. ज्याचा अभिनय पाहिल्यानंतर लोकांनी दादा कोंडके, अशोक सराफ आणि लक्ष्याचा हाच विनोदाचा वारसा पुढे चालवणारा नट म्हणून संबोधलं. अश्या भालचंद्र कदम ला लोक प्रेमानं ‘भाऊ कदम’ ह्या नावानं ही ओळखतात.

याचा जन्म झाला तो १२ जून १९७२ रोजी मुंबईमध्ये. इथंच त्याचं बालपण गेलं. वडाळ्यात राहत असताना वडील ‘भारत पेट्रोलियम’ मध्ये काम करत होते आणि आई गृहिणी होती.

वडाळ्याच्या ज्ञानेश्वर शाळेमधून भाऊचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. विनोदाची उत्तम जाण असणारा हा नट अभिनयाकडे आणि नाटकाकडे हळूहळू आकर्षित होऊ लागला. पण ह्याच काळात त्यांच्या कुटुंबामध्ये एक दुखःद घटना घडली. त्याचा वडिलांचं अकाली निधन झालं. ह्यावेळेस संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर यशस्वीपणे पेलत भाऊ कदम यानं आपल्या कुटुंबाला डोंबिवली ला स्थलांतरित केलं. तिथे गेल्यानंतर मात्र त्यानं आपल्या कामालाच देव मानून स्वतःला झोकून दिलं. आपलं अभिनयाचं अंग रंगभूमीच्या माध्यमातून वेगवेगळ्या नाटकांमधून तो व्यक्त करीत रहीला.

कोरबा ३७ ह्या एका संस्थेच्या माध्यमातून सादर होणाऱ्या अनेक वेगवेगळ्या एकांकिकांमधून तो वेगवेगळ्या भूमिका साकारत राहिला. हळूहळू अनुभव वाढत गेला आणि बऱ्याच गोष्टी शिकायला ही मिळू लागल्या. वेगवेगळ्या लोकांशी ओळखी होऊ लागल्या. त्यातूनच त्याला एका दोन – अंकी नाटकासाठी अभिनय करायची संधी मिळाली. ज्यात एका सेवानिवृत्त माणसाची भूमिका करण्याचं ध्येय त्याला सकरायचं होतं. ही भूमिका ‘ब्लॅक कॉमेडी’ पद्धतीची होती. त्या दोन अंकी नाटकानं भाऊ कदमला अभिनयातच करिअर करण्याचं धाडस मिळवून दिलं. कारण ह्याच भूमिकेसाठी त्याला अभिनयाचं पारितोषक मिळालं ते महाराष्ट्र शासनाकडून.

त्याला अत्यानंद झाला, हुरूप वाढला आणि स्वतः वरचा विश्वासही वाढला. आता ठरवलं की अभिनयाकडे लक्ष केंद्रित करून ह्याच क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख आपण प्राप्त करावी. ह्या उद्देशाने रंगभूमीवर छोट्या-मोठ्या नाटकांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत असताना एव्हढंच ना? एक डाव भटाचा ह्यांसारख्या नाटकांमधून विनोदी भूमिका साकारणारा भाऊ विनोदी नट म्हणून लोकांच्या नजरेत आला. त्याचवेळेस झी मराठीच्या माध्यमातून फू बाई फू ह्या कार्यक्रमाची संकल्पना राबवली जात होती आणि ह्यात अनेक विनोदी नटांची निवड झाली. रंगभूमीवर अभिनय करून लोकांना थक्क करून हसायला भाग पाडणाऱ्या नटांमध्ये भाऊ कदम यांच्याही नावाची निवड झाली.

त्यांना पहिल्यांदा विचारण्यात आलं तेव्हा मात्र त्यांनी कॅमेरा समोर अभिनय करून विनोद निर्मिती कशी करावी ह्या प्रश्ना मुळे ह्या मालिकेला नकार दिला. त्यांना दुसऱ्यांदा ही विचारणा आली, पण तेव्हाही त्यांनी घाबरून नकार दिला. पण जेव्हा तिसऱ्यांदा त्यांना विचारलं गेलं, तेव्हा मात्र त्यांच्या मुलीनं त्यांना धीट केलं. “बाबा एकदा प्रयत्न करून तरी बघा” असं म्हणणाऱ्या मुलीच्या शब्दांवर विश्वास ठेवत भाऊ कदम अखेर फू बाई फू मध्ये येण्यासाठी तय्यार झाला. पण इथं तर त्याच्या नशिबात काही वेगळंच मांडून ठेवलं होतं. त्याच्या अभिनयातला निरागसपणा आणि सहज संवाद फेक ह्या गोष्टींमुळे त्याचं प्रत्येक स्कीट लोकांना थक्क करून सोडणारं ठरलं.

सतीश तारे असोत किंवा सुप्रिया पाठारे ह्यांसारख्या बड्या विनोदवीरांसोबत त्याने अनेक बतवण्या केल्या. प्रत्येक बतावणी मधलं कॅरेक्टर जिवंत करत असताना त्याने घेतलेली मेहनत त्याच्या अभिनयातून व्यक्त होत होती. या मालिकेचं निवेदन करत होता डॉ. निलेश साबळे. त्यालादेखील भाऊचा अभिनय फारच आवडला. भाऊ,कुशल बद्रिके यांसारख्या काही कलाकारांना घेऊन त्यानं एका नव्या कार्यक्रमाची निर्मिती करण्याचं ठरवलं. तू कार्यक्रम होतात ‘चला हवा येऊद्या’. नवीन मराठी चित्रपटांचं प्रमोशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करावं असा या कार्यक्रमाचा मूळ उद्देश. पण या कार्यक्रमात डॉ. निलेश साबळेला सगळ्यात मोठा आधार दिला तो भाऊ कदमनंच. कोणाचेही अनुकरण न करता प्रत्येक भूमिका स्वतःच्या पद्धतीने लोकांच्या नजरेसमोर उभी करण्याचे सामर्थ्य या नटाला प्राप्त झालेलं आहे. कदाचित म्हणूनच चला हवा येऊ द्या च्या माध्यमातून साकारला जाणारा पप्पा असो किंवा ज्योतिषी या आणि अशा अनेक भूमिका गाजवतोय तो भाऊ कदम.

लहानांपासून ते थोरांपर्यंत प्रत्येक वयोगटात ला प्रेक्षक भाऊ कदम चा चहाता झाला. छोट्या पडद्यावरच्या या सगळ्यात जास्त टीआरपी मिळवणाऱ्या कार्यक्रमामुळे भाऊ कदमला इतकी लोकप्रियता मिळाली की पुन्हा रंगभूमीवर बड्या नाटकांसाठी त्याची निवड करण्यात आली. बाजीराव मस्तानी, करून गेले गाव यांसारख्या नाटकांव्यतिरिक्त बऱ्याच सिनेमांमधून भाऊ छोट्या-मोठ्या भूमिका साकारत राहिला. तुझं माझं जमेना ह्या मराठी मालिकेमधूनही भाऊ कदम एक अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होता. आजवर त्याने अनेक चित्रपटांमधून काम केलेलं आहे ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘टाइम बरा वाईट’, ‘सांगतो ऐका’, ‘आम्ही बोलतो मराठी’, ‘एक कटिंग चाय’, ‘पुणे व्हाया बिहार’, ‘चांदी’, ‘कुटुंब’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘नारबाची वाडी’, ‘कोकणस्थ’, ‘टाइमपास’, ‘टाइमपास २’, ‘बाळकडू’, ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ यांसारख्या अनेक सिनेमांमधून छोट्या-मोठ्या भूमिका साकारणारा भाऊ कदम मराठी सिनेमाचा नायकही झाला. सिनेमा होता ‘वाजलाच पाहिजे – गेम कि शिणेमा’.यानंतर २०१७ या वर्षाची दमदार सुरुवात झाली ती दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत साकारलेल्या ‘झाला बोभाटा’ या चित्रपटानं. मराठी सोबतंच ‘फेरारी की सवारी’ या हिंदी चित्रपटात भाऊ कदम अभिनय करताना दिसला आहे.

मराठीमध्ये भाऊ कदमनं स्वतःचं एक असं निराळं स्थान निर्माण केलंय की प्रत्येक कार्यक्रमात विनोद करायचा म्हणला की भाऊची उपस्थिती असणं गरजेचं ठरतं. मग तो कोणताही पुरस्कार सोहळा का असेना, प्रत्येक अवॉर्ड फंक्शन मध्ये भाऊ कदमच्या अभिनयाने सजलेल्या अनेक बतावण्या अजरामर ठरलेल्या आहेत.

असा हा आपल्या कर्तृत्वानं अतिशय महान ठरलेला अभिनेता स्वभावानं तितकाच शांत आहे. त्याला गाण्याची ही आवड आहे. त्याच्या आयुष्यामध्ये सहचारिणी म्हणून ‘ममता कदम’ यांची त्याला साथ लाभली. त्याला तीन मुली ही आहेत. ‘म्रृणमयी’, ‘संचिती’ आणि ‘समृद्धी’.

आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणाऱ्या या निरागस व्यक्तिमत्त्वाच्या विनोदी नटाला आमचा मानाचा मुजरा.

Leave a Comment