Sharad Pawar Biography in Marathi | शरद पवार जीवनचरित्र | Sharad Pawar Political Life In Marathi

Sharad Pawar Biography in Marathi | शरद पवार जीवनचरित्र

कृषिप्रधान, धर्मनिरपेक्ष,संस्कृती आणि परंपरा जपणाऱ्या भारत देशाच्या राजकारातलं एक सोनेरी पान,म्हणजेच शरदचंद्रजी पवार साहेब.
राजकारण आणि समाजकारणाच्या माध्यमातून केवळ राज्य नव्हे,केंद्रीय पातळीवर एक महाराष्ट्रीय नेता म्हणून पवार साहेब अर्थातच “शरदचंद्र गोविंदराव पवार” यांनी आपला एक वेगळा ठसा उमटवला. कामातील व्यग्रता, सखोल नियोजन,शिस्तबद्ध दैनंदिनी, शांतपना, विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप झेलण्याची धीरोदात्त वृत्ती, मुत्सद्दीपणा अन दूरदृष्टी या व्यक्तिमत्व गुणांच्या जोरावर पवार साहेबांना काटेवाडी ते मंत्रालय हा मोठा पल्ला अल्पावधीतच गाठता आला. राज्यासह केंद्रात दबदबा निर्माण करणारा नेता म्हणून,राज्याचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नंतर पवार साहेबांचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.
त्यामुळंच शरद पवारांच्या रुपात संपूर्ण महाराष्ट्रासह, देशानं एक क्रीडाप्रेमी आधुनिक नेता अनुभवलाय.

शरद पवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी या छोट्याशा गावात झाला. गोविंदराव आणि आई शरदाबाई यांच्या पोटी शेतकरी कुटुंबात 12 डिसेंबर 1940 रोजी शरद पवारांचा जन्म झाला. राजकारण आणि समाजकारनाचे बाळकडू आई शारदाबाई पवार यांच्या कडुन मिळाले.

शारदाबाई पवार या स्वातंत्र्यपूर्वकाळात पुणे जिल्ह्यातील स्थानिक राजकारनात कार्यरत होत्या. गोविंदराव हे देखील सहकारी चळवळीतील एक अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते होते. त्यांचे बंधू वसंतराव शेतकरी कामगार पक्षात होते. अश्या कुटुंबात पवारांची लहानपणापासूनच राजकीय सामाजिक कार्याची जडण घडण झाली. त्यामुळेच शरद पवार यांचा कॉलेज जी.एस म्हणजेच जनरल सेक्रेटरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विविध खात्यांचे केंद्रीय मंत्री हा खडतर प्रवास थक्क करणारा आहे.

शिवाय कार्यकर्त्यांसाठी प्रेरणा देणाराय बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात शरद पवार यांचं शालेय शिक्षण झालं. त्यांनी पुढे पुण्यातील बृहनमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय येथे शिक्षण घेताना जनरल सेक्रेटरी म्हणून महाविद्यालयिन आणि विद्यापीठ स्तरावर नेतृत्व केलं. या काळात शरद पवार यांचा युवक काँग्रेसशी संबंध आला आणि तेथून त्यांनी पक्षीय राजकारणात प्रवेश केला. पवार साहेबांचा राजकीय प्रवास सर्वश्रुत आहे. परंतु त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल सर्वसामान्यांना माहीत नाही.

1 ऑगस्ट 1967 रोजी शरद पवार आणि प्रतिभा ताईंचा विवाह झाला. प्रतिभाताई या पुण्यातील सदु शिंदे या प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू यांच्या कन्या. पवार साहेबांना उत्तम प्रतिभेची साथ लाभल्याने त्यांच्या संसाररूपी वेलीला सुप्रिया नावाची एक कन्यारत्न प्राप्त झाली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन सुप्रिया पवार-सुळे यांनीदेखील स्वकर्तुत्वाचा ठसा उमटवला. सुप्रिया या बारामतीच्या खासदार आहेत. पवार साहेब आणि प्रतिभा गेली पाच दशकांपासून सोबत आहेत प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे सुभाषित शरद पवार आणि प्रतिभा पवार यांच्या बाबतीत तंतोतंत जूळते.

प्रतिभा पवार यांनी शांतपणे घरची आघाडी सांभाळली. न बोलता पवार साहेबांच्या बरोबरीनं एक एक जबाबदारी उचलत गेल्या आणि बिनबोभाट पार पाडत असतात. निवडणुकीच्या काळात तर विचारायलाच नको. कामं कित्येक पटीनं वाढलेली असतात, कार्यकर्त्यांची वर्दळ वाढलेली असते, क्षणाक्षणाला फोन घनघनत असतात. आपली लाडकी कन्या सुप्रिया ताईंच्या विवाह सोहळ्यानिमित्त शरद पवारांना अगदी भावविवश होताना पाहिलंय. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना पवार साहेब आपले राजकीय गुरू मानतात. यशवंतरावांनीही शरद पवार यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण ओळखले होतेच. शरद पवार यांचा युवक काँग्रेस अध्यक्ष,प्रदेश काँग्रेस कार्यकारिणी प्रतिनिधी अस राजकीय प्रवास होत गेला, याच काळात त्यांनी महाराष्ट्रभर न थकता डोळसपणे प्रवास केला.राज्यातील विविध भागांतील सर्वसामान्य माणसांना ते भेटलेच,शिवाय साहित्य अन्य कला, क्रीडा समाजसेवा, उद्योग, पत्रकारिता आदी क्षेत्रातील दिगजांशी, मान्यवरांशी,अभ्यासकांशी त्यांचे स्वाभाविक संबंध प्रस्थापित झाले.

पवार साहेब हे वयाच्या अवघ्या सव्वीस-सत्तावीसाव्या वर्षी आमदार झाले. पुढे ते प्रदेश काँग्रेस सरचिटणीस झाले. 1974 मध्ये मंत्री झाले आणि 1978 मध्ये वयाच्या केवळ 38 व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. एवढेच नव्हे तर पवार साहेबांनी 1978, 1988, 1990, 1993 अशी चारवेळा त्यांनी विविध कालावधी साठी मुख्यमंत्री पद सांभाळलंय.दरम्यान केंद्रीय संरक्षण खात,तसेच कृषी खात्याची जबाबदारीही त्यांनी यशस्वीरित्या सांभाळलीये.सध्या ते त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

पवार साहेबांच्या यशामागे प्रचंड कष्टयत. प्रशासकीय कौशल्ये,कार्यकर्ते नेते शोधण्याची नेमकी दृष्टी, प्रचंड जनसंपर्क, कार्यकर्त्यांशी थेट संपर्कही गुणकौशल्येही जोडीला आहेतच. स्थानिक कार्यकर्ते नेते यांच्यामधील क्षमता ओळखून त्यांना राजकीय पटलावर मोठी संधी देण्याचं काम शरद पवार यांनी वेळोवेळी केलंय. त्यातून दिलीप वळसे पाटील,आर.आर पाटील, जयंत पाटील, पुतणे अजित पवार आणि कन्या सुप्रिया सुळे आदी नेते पुढे आले. शरद पवार साहेबांच व्यक्तीमत्व उलगडून दाखवणारी अनेक पुस्तकं आली, पवार साहेबांच्या काळात माजी सैनिकांच्या निवृत्तीवेतनात वाढ, फळबाग विकास योजना, पोलिसांची हाफ पॅन्ट जाऊन फुल पॅन्ट करण्याचा निर्णय, महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचा साधलेला विकास, साखर कारखाने क्षेत्रातील योगदान, मुंबईतील दंगली, किल्लारी भूकंप, या संकटानंतर हाताळलेली परिस्थिती, महिला आरक्षण विषयातली भूमिका आणि निर्णय महिला बचत गटांना बळ देण्याचं धोरण,राज्यातील वंचित घटकांसाठीच त्यांचं धोरण आणि त्यांचे निर्णय अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची अनेक ठळक वैशिष्ट्य सांगता येतील.

माध्यतरी पवार साहेबांना मोठ्या आजाराला सामोरं जावं लागलं होतं. अवघड operation आणि त्याहून अवघड विश्रांतीचा काळ, त्याला शरद पवार आणि प्रतिभाताई तसेच सुप्रिया सुळे यांनी मोठ्या धैर्यान सामना केला. बाळासाहेब ठाकरेंसारख समोरच्याना आपल्या कवेत घेईल इतकं अमोघ वक्तृत्व नाही, लाखालाखांच्या त्यांच्या सभा भरत नाहीत ते कार्यकर्त्यांना कधीही कोणता आदेश देत नाहीत, पण तरीही शरद पवार नावाच कारूड या महाराष्ट्रभर का असावं?

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला शरद पवार हे नाव माहीत असतं, लाखांच्या सभा भरत नसल्या तरी शरद पवार काय बोलतात याकडे मात्र सगळ्यांच जाणीवपूर्वक लक्ष असत. जीव ओवाळून टाकायचं म्हणाल, कायमस्वरूपी त्यांना निष्ठा बहाल करणारे निष्ठावंत कार्यकर्ते अवघ्या महाराष्ट्रभर त्यांनी निर्माण केले. खेडेगावातल्या एखाद्या कार्यकर्त्या पासूनसाहित्य, संस्कृतीया क्षेत्रातील मान्यवरांपर्यंत, स्वपक्षापासून विरोधी पक्षापर्यंत शरद पवारांच्या मैत्रीचं वर्तुळ विस्तारलेलं असतं.

एखाद्या माणसाचे एवढे पैलू असू शकतात? पवारांची स्मरणशक्ती हा अफलातून गुण. आयुष्यात त्यांना एकदा भेटलेली माणसं, पुढे दहा वर्षानि भेटली तरी त्यांच्या लक्षात राहतात आणि अस घडलेलही आहे. खेड्यापाड्यात सभेला गेल्यानंतर ते तेथील नेत्यांना जुन्या जाणत्याना अगदी नावानिशी हाक मारून त्यांच्याशी आदराने बोलतात. त्यांना मान देतात. समोरची व्यक्ती पवार आपल्याला ओळखतात एवढ्या आनंदातच त्यांची कधी होते हे कळत देखील नाही. अगदी तालुका स्तरावरच्या नेत्यांची नावंही पवारांच्या डोक्यात असतात. त्यांचे याबाबतीतचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. माणसं जोडण्याची कला त्यांना अवगत. कठीण परिस्थितीतुनही मार्ग काढतात, त्यामुळे कुणीच त्यांचा दीर्घकाळ शत्रू राहत नाही.बाळासाहेब ठाकरे हे तर मोठं उदाहरण. राजकारणापलीकडची त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. प्रत्येक क्षेत्रातील बड्या लोकांशी त्यांचे संबंध आहेत.

पवारांना वाचनाची आवड आहे,खेळाची आवड आहे, संस्कृती परंपरा जपण्याची आवड आहे, क्रीडाक्षेत्राची आवड आहे, कृषीक्षेत्र तर त्यांचा जिव्हाळयाचा विषय, म्हणूनच की काय शरद पवार साहेबांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुशाफिरी केलीये. त्यांच्या राजकारनाच्या चालीही त्यांच्या शांत व्यक्तीमत्वाला गूढ बनवतात. म्हणूनच अनेकदा ते काय करतील याचा थांग जवळच्यालाही लागत नाही.पवारांच्या व्यक्तिमत्वाचे असे अनेक पैलू आहेत. त्यांचा वेधही घेणं अवघडय पण एक बाब मात्र खरी की पवारांशीवाय महाराष्ट्राचच काय तर संपूर्ण भारत देशाचा इतिहास पूर्ण होऊच शकणार नाही! अश्या या प्रतिभासंपन्न नेत्याच्या महान कार्यास मानाचा मुजरा!!!

मित्र आणि मैत्रीणींनो मी पूजा शिंदे. मला लहान पानापासूनच लिहायला आवडते आणि इंटरनेट वर आल्यावर मला एक गोष्ट समजली कि इंटरनेट वर मराठी मध्ये जास्त कोणी माहिती अपलोड करत नाही आहे. मराठी ही आपली राज्यभाषा आहे आणि आपण मराठी असल्याचा आपल्याला गर्व असला पाहिजे म्हणूनच मी या वेबसाईट द्वारे मराठी भाषेचे जतन करण्याचा प्रयन्त करत आहे.

Leave a Comment