चोराच्या उलटया बोंबा! | Chorachya Ultya Bomba Marathi Katha | Marathi Story

गुरू व शिष्यांचा कपटीपणा | चोराच्या उलटया बोंबा! | Chorachya Ultya Bomba 

Chorachya Ultya Bomba Marathi Katha: एका गावात एक गुरू व शिष्य असलेले दोन बैरागी बरोबरच रहात होते. एकदा ते दोन बैरागी एका हलवायाच्या दुकानात मिठाई खाण्यासाठी गेले. तेथे गेल्यावर त्यांनी आपल्याला हवी असलेली मिठाई हलवायाकडून मागून घेऊन खाण्यास सुरूवात केली. प्रथम त्यांच्यातील जो गुरू होता, त्याची मनसोक्त मिठाई खाऊन झाली व तो त्या हलवायाला त्याचे पैसे न देताच तेथून जाऊ लागला. गुरूला तसेच जाताना पाहून हलवायाने त्याला विचारले, “तुम्ही खाल्लेल्या पदार्थांचे पैस कोण देणार? तुम्ही देणार की तुमचा शिष्य?”

ते ऐकून गुरू बैरागी थोडयाशा रागाने व खोटेपणाने म्हणाला, “माझा त्याच्याशी काय संबंध? आम्ही दोघे फक्त योगायोगाने एकाच वेळी तुमच्या दुकानात शिरलो. परंतु मला कळत नाही की, तु माझ्याकडे कसले पैसे मागतो आहेस? कारण मी तुझ्या दुकानात खाल्लेल्या पदार्थांचे सर्व पैसे तुला अगोदरच दिलेले आहे.”

हलवाई त्याला म्हणाला, “तू पैसे अजिबात दिलेले नाहीस.”

तेव्हा तो बैरागी परत जोराने म्हणाला, “मी पैसे दिलेले आहेत.”

अशा प्रकारे त्या दोघांमध्येही खूप जोरदार भांडण सुरू झाले. दुकानाबाहेर लोकांची गर्दी जमू लागली. तेव्हा त्या जमलेल्या लोकांसमक्ष त्या बैराग्याने प्रत्यक्षात आपला शिष्य असलेल्या व आत बसून आपल्या पुढयातील बशीमधील दुधी हलवा संपवीत असलेल्या त्या तरूण बैराग्याला मुद्दाम विचारले, “काय रे बाबा, तूच सांग आता, तुझा माझा जरी काही संबंध नसला, तरी एक साधू म्हणून तू तुझ्या गुरूची शपथ घेऊन सांग, मी या हलवायाला त्याच्याकडील खाल्लेल्या पदार्थांचे पैसे आधीच दिलेले तू पाहिलेस ना?”

तो शिष्य साधू तेथे जमलेल्या लोकांना उद्देशून नाटकीपणे म्हणाला, “मी केव्हापासून या हलवायाने केलेलं भांडण पहात होतो परंतु मला काय, हे साधू महाराज देखील परके व हा हलवाईही देखील परका. मग त्यांचे ते पाहून घेतील. आपण का म्हणून त्याच्या भांडणात मध्ये पडायचे? परंतु आता या वृद्ध असलेल्या साधुमहाराजांनी स्वतःच मला विचारले म्हणून मी सांगतो, की, त्यांनी खाल्लेल्या पदार्थांचे पैसे विचारून, ते पदार्थ खाण्यापूर्वीच त्यांनी ते पैसे हलवायाला दिले होते.”

इतके बोलून तो तरूण साधू जोरात रडू लागला.

हलवाई रागाने त्याला म्हणाला, “एक तर तू खोटं बोलतोस, आणि रडतोस, काय झालं रे तुला रडायला?”

तेव्हा तो शिष्य बैरागी खोटे हुंदके देत संगळयांना ऐकू जाईल अशा आवाजात हलवायाला म्हणाला, “अरे, तू किती खोटे बोलतोस! या गरीब बिचाऱ्या म्हाताऱ्या बैरागीमहाराजांनी खायला घेतलेल्या सर्व पदार्थांचे पैसे तुला अगोदरच दिले आहे हे मी स्वतःच्या डोळयांनी पाहिले; असे असूनही जर तू परत त्यांच्याकडे पैसे मागतो आहेस, तर मग तू माझ्याकडून देखील परत पैसे मागशील व माझ्याशीही भांडशील, म्हणून त्या कल्पनेने मी रडत आहे.”

तो तरूण आणि खोटारडा बैरागी अतिशय खोटेपणाने रडत ओरडत त्या सर्व लोकांकडे बघत त्यांना उद्देशून म्हणाला, “बघा लोकांनो, तुम्हीच बघा. तुमच्या-सारख्या दयावंत असणाऱ्या लोकांच्या भिक्षेवर दिवस ढकलणारे आम्ही बैरागी; आम्ही याला एकदा पैसे दिलेले असताना परत कुठले आणि का म्हणून पैसे द्यावे?”

तेव्हा त्या तरूण खोटे बोलणाऱ्या बैराग्याचा प्रश्न ऐकून तेथे जमलेले सर्व लोक त्यांची बाजू घेऊन त्या हलवायाशी भांडू लागले आणि त्या संधीचा फायदा घेऊन त्या गर्दीतून ते दोघेही बैरागी तेथून पळून गेले. ‘चोराच्या उलटया बोंबा’ म्हणतात ना तेच खर असे म्हणून हलवाई बिचारा खूप दुःखी झाला.

मित्रांनो तुम्हाला Chorachya Ultya Bomba Marathi Katha हि कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.

Leave a Comment

x