गाढव आणि त्याचा निर्दय धनी | Gadhav aani Tyacha Nirdayi Dhani Marathi Katha
एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे. अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला.रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले.
हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला. त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला, ‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे. तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’
तात्पर्य :- कित्येक लोक असे कृतघ्न आणि निर्दय असतात, की आपली सेवा प्रामाणिकपणाने करणाऱ्या लोकांसही छळण्यास ते कमी करीत नाहीत.