सौरऊर्जा व्यवसाय कसा सुरू करायचा? | How To Start a Solar Panel business in Marathi

सौरऊर्जा व्यवसाय कसा सुरू करायचा? | How To Start a Solar Panel business in Marathi

भारतीय संस्कृतीत सूर्याला खूप महत्त्व दिले जाते, कारण पंचायतन पूजेमध्ये सूर्यदेवाला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. यावरून आपल्याला समजते की, प्राचीन काळीसुद्धा लोकांना सौर ऊर्जेचे महत्त्व समजले होते. ऊर्जेचा सर्वात मोठा, प्रथम व प्रमुख स्रोत म्हणजे सौर ऊर्जा. एका बाजूला औद्योगिक विकास व शहरीकरणामुळे वाढलेली ऊर्जेची मागणी व दुसर्‍या बाजूला जागतिक तापमानवाढ, प्रदूषण, नैसर्गिक आपत्तींमुळे अपारंपरिक ऊर्जेची गरज भासू लागली आहे. अपारंपरिक ऊर्जेमध्ये सर्वात योग्य आणि उपयोगी पर्याय म्हणजे सौर ऊर्जा.

भारताची भौगोलिक स्थिती पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, ह्या भूमीच्या बराच भागावर अशी सूर्यकिरणे मिळतात जिथे ऊर्जा उत्पादनाला वाव आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे भारत सरकारने सौर ऊर्जेला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. भारताची सध्याची ऊर्जानिर्मितीची क्षमता ३३० गिगावॉट् आहे. ह्यातील ६६% ऊर्जा ही पारंपरिक ऊर्जा स्रोतातून निर्मित केली जाते व ३१% ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून केली जाते.

सध्या भारत सरकारचे १७५ गिगावॉट् अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट २०२२ पर्यंतचे आहे. म्हणजे भविष्यात जवळपास ५३% ऊर्जानिर्मिती ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून करण्यात येणार आहे. त्यातही १०० गिगावॉट् निर्मिती सौर ऊर्जेपासून करण्यात येणार आहे.

जिथे मागील सरकारचे सूर्यापासून ऊर्जानिर्मितीचे २०२२ पर्यंतचे उद्दिष्ट फक्त २० गिगावॉट् होते तिथे ह्या सरकारचे १०० गिगावॉट् आहे. सरकारने १०० अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक सौर ऊर्जा निर्मितीमध्ये केलेली आहे. ही आकडेवारीच खूप काही सांगून जाते. ह्यामुळे एक मात्र निश्चित आहे की, पुढील पाच वर्षांमध्ये सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये अमाप संधी आहेत.

बिनभांडवली व्यवसाय कल्पना

सौर उर्जे मध्ये कोणकोणत्या प्रकारे व्यवसाय केला जाऊ शकतो?

भारत सरकारने जे १०० गिगावॉट्चे उद्दिष्ट ठेवले आहे त्यापैकी ४० गिगावॉट् हे रूफ टॉप सौर पॅनल इन्स्टॉल करून वीजनिर्मिती करायची आहे. त्यामुळे घराच्या छतावरती सौर पॅनल बसवून वीजनिर्मिती करायची व ती ग्रिडला जोडून घरात वापरायची. असे पॅनल बसवण्यासाठी सरकार सबसिडीदेखील देते. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे वीजनिर्मिती आपल्याच छतावरती करायची, वीजदेखील आपणच वापरायची; परंतु वापरलेल्या विजेचे पैसे प्रति युनिटप्रमाणे सरकारच आपल्याला देणार. ह्या अशा धोरणामुळे सौर पॅनल बसवण्यासाठी खूप मोठी चालना मिळत आहे. मोठी घरे, बँक, कॉलेज, हौसिंग सोसायटी, हॉस्टेल, हॉटेल इत्यादी ठिकाणी छतावरती मुबलक जागा असते. त्यामुळे हेच आपले ग्राहक बनू शकतात. कारण मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असेच लोक करू शकतात. सोलर यंत्रणा बसवण्यासाठी गुंतवणूक मोठी करावी लागते; पण ही गुंतवणूक कायमस्वरूपी असते. इथे सर्वात मोठा प्रश्न यक्ष बनून उभा राहतो तो म्हणजे ह्या व्यवसायाची सुरुवात कशी करायची?

सुरुवात कशी करावी?

सौर ऊर्जा व्यवसायाची सुरुवात मुख्यतः दोन गोष्टींवर अवलंबून आहे. ती म्हणजे आर्थिक क्षमता आणि तांत्रिक ज्ञान. सोलर बिजनेसची सुरुवात एजंट होण्यापासून ते डीलरशिप आणि डिस्ट्रिब्युटर घेण्यापर्यंत होऊ शकते. सोलर एजंट होण्यासाठी फक्त ८ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. मोठ्या सोलर कंपनीचे उत्पादन विकून कमिशन तत्त्वावर व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. दुसरा टप्पा म्हणजे अशाच कंपन्या आपल्याला फ्रेंचाईजी देतात. त्यामध्ये जर टियर १ सिटीमध्ये व्यवसाय करायचा असेल तर ३२,०००/-, टियर २ मध्ये २८,०००/-, टियर ३ मध्ये २५,०००/- व टाऊनमध्ये २,०००/- रुपये गुंतवून सुरुवात करू शकतो.

त्याचबरोबर आपले स्वतःचे २५० वर्गफिटमध्ये कार्यालय बनवावे लागेल. तिसरे म्हणजे सोलर ऊर्जा क्षेत्रातल्या मोठ्या कंपन्यांचे बिझनेस असोसिएट बनता येते. त्यासाठी फक्त १० ते १५ हजारांची गुंतवणूक करावी लागते. या सर्व प्रकारामध्ये व्यवसायासाठी लागणारे सर्व प्रशिक्षण कंपनीतर्फे दिले जाते. चौथी पद्धत डीलरशीप घेण्याची. ह्यामध्ये ५० हजार ते २ लाखांपर्यंतची गुंतवणूक करून डीलरशीप घेता येते; परंतु त्यासाठी एक निकष आहे तो म्हणजे आपली सेल्स व टेक्निकल टीम असावी लागते. पाचव्या प्रकारामध्ये डिस्ट्रिब्युटर होण्यासाठी ५ ते ६ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागते. जेवढी मोठी गुंतवणूक तेवढ्या मोठ्या स्तरावर व्यवसाय करण्याची संधी आहे. व्यवसाय करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सशक्त मार्केटिंग. ग्राहकांना जर सौर ऊर्जेचे महत्त्व पटवून देता आले, त्याचे फायदे समजावून सांगता आले, तर हा व्यवसाय नवीन उद्योजकांसाठी सोने की चिडिया आहे. सोलर यंत्रणा उभी करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट असते त्याची तांत्रिक बाजू. सोलर पॅनलचे डिझाईन करणे, त्याचे इंस्टॉलेशन करणे, असलेल्या जागेनुसार यंत्रणा बसवून घेणे इत्यादीसाठी स्वतःची टेक्निकल टीम असावी लागते. अशी एक टीम बनवूनसुद्धा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो.

5 thoughts on “सौरऊर्जा व्यवसाय कसा सुरू करायचा? | How To Start a Solar Panel business in Marathi”

Leave a Comment